Uddhav Thackeray and Eknath Shinde sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेना फुटीनंतर सहानुभूती मिळाली ठाकरेंना; पण मतांचं दान शिंदेंच्या पारड्यात..! काय आहे कारण ?

Eknath Shinde Shivsena Politics : एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या यशामागे अनेक गुपितं आहेत. त्यात शिंदे यांचा हात ‘मोकळा’ असल्याची उघडपणे चर्चा केली जाते. पण त्याव्यतिरिक्त ४० आमदारांच्या पाठबळावर बाहेर पडलेले शिंदे तेवढ्यावरच थांबलेले नाहीत....

सरकारनामा ब्यूरो

दीपा कदम

Shivsena News : शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून अद्याप एकनाथ शिंदेंनी स्वत:चा राज्याभिषेक केलेला नाही, मात्र पक्षाची ‘रेडीमेड’ बांधणी कशी करता येईल याची हातोटी त्यांना जमली आहे. मागील तीन वर्षांमध्ये सर्वाधिक निगेटिव्ह मार्किंग’ शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) वाट्याला आले आहे. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला मिळालेले यश हे ‘निगेटिव्ह मार्किंग’च्या विपरीत आहे.

शिवसेना फुटीनंतर सर्वाधिक सहानुभूती उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मिळाली, निवडणुकीत यशाचे दान मात्र एकनाथ शिंदेंना मिळाले आहे. यशाची ही चढती कमान कायम ठेवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असेल. मात्र, यापुढच्या काळात त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरेंसोबतच भविष्यात भाजप देखील आव्हान उभे करण्याची दाट शक्यता आहे.

‘राजकारणात कायम कोणी शत्रू नसतो’ याची प्रचिती शिंदेंना फडणवीस आणि ठाकरेंमध्ये वाढलेल्या संवादामुळे आली आहे. त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. म्हणूनच शिंदे यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत तर भाजपचे नऊ तर शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या कमी जागा निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात होती, प्रत्यक्षात 2019 मध्ये शिवसेनेने मिळवलेल्या जागांपेक्षा एक जागा जास्त जिंकलेली आहे. अर्थात या यशामागे भाजपची महाशक्ती होती, जी महापालिकांच्या निवडणुकीत असण्याची शक्यता नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप शिंदेंना निवडणूकपूर्व आघाडीत समावेश करून घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे या महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना शिंदेची खरी ताकद दिसून येणार आहे.

एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या यशामागे अनेक गुपितं आहेत. त्यात शिंदे यांचा हात ‘मोकळा’ असल्याची उघडपणे चर्चा केली जाते. पण त्याव्यतिरिक्त ४० आमदारांच्या पाठबळावर बाहेर पडलेले शिंदे तेवढ्यावरच थांबलेले नाहीत. त्यांच्यामागे आता नऊ खासदार आणि ५७ आमदारांचे बळही जमा झालेले आहे, जे त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. याच बळावर त्यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु केली आहे, याची नोंद घ्यावीच लागेल.

मागच्या आठवड्यात शिवसेना शिंदे गटामध्ये शिवसेना ठाकरे गटासोबतच काँग्रेस,आप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आम आदमी पार्टीतील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये ग्रामीण भागातील सरपंचांचाही समावेश आहे. ठाणे, पालघर, अकोला, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, नागपूर, धुळे शहर आणि धुळे ग्रामीण, साक्री, परभणी या भागातून माजी नगरसेवक आणि इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने सर्वसमावेशकतेवर भर दिला आहे. याविषयी त्यांचे विरोधक आमिष दाखवून पक्षप्रवेश केले जात असल्याची टीका त्यांच्यावर केली जाते. त्यात तथ्यांश असण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांची बेगमी मात्र मुबलक केलेली आहे. जी महापालिकेसारख्या निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

निवडणुकीचे व्यवस्थापन

शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीचे व्यवस्थापन नीट जमू लागले आहे. मात्र प्रत्येक वेळी त्यांना सोयीचे असणारे मैदान मिळणार नाही. या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर या महापालिका जिंकणे आवश्यक असणार आहे. शिवाय मुंबईचा महापौर भाजपचा करणे हे तर त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचेही असणार आहे. राज्यात सत्तेवर असल्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी भाजप कोणालाही सोबत घेण्यास उत्सुक नाही. मुंबईत शिंदेंना बाजूला करून मनसेला चुचकारण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी मनसेचे ओझेही भाजप पाठीवर घेण्याची शक्यता कमीच आहे. अशा परिस्थितीत मुंबईत स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मैदानात उतरावे लागणार आहे.

राजकारणाचे रंग

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला दुरावा कमी होणे ही यापुढच्या काळात शिंदेंसाठी तापदायक गोष्ट ठरू शकते. शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील प्रलंबित असल्याने शिंदेंच्या डोक्यावर टांगती तलवारच आहे. ठाकरे आणि फडणवीस यांच्यात गोडवा वाढल्याने शिंदे यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. एकतर तू राहशील नाही तर मी राहीन असे बोलले. मात्र आता काय जादू झाली ते आपण पाहिलंय. सरडे रंग बदलतात मात्र एवढ्या वेगाने बदलणारे सरडे मी पाहिले नाहीत…’

अर्थात शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंना टोले हाणलेत. पण हे बोलतंय कोण? मागच्या पाच वर्षांत महाराष्ट्राने राजकारणाचे इतके रंग पाहिलेत आणि अभिनयात निपुण असणारे राजकारणी पाहिलेत की नटसम्राटांनी देखील यांच्याकडे शिकवणी लावावी. त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे एकमेकांना पेढा भरवताना दिसले तर आश्चर्य वाटू नये इतकेच.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT