Uddhav Thackeray Raj Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Thackeray brothers election loss : बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा घात का झाला? 'ही' रणनीती ठरली धोकादायक

BEST Patsanstha election 2025 News : या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळेच बेस्टच्या या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूला का घात झाला? हे स्पष्ट करीत राजकीय विश्लेषकांनी पराभवाचे नेमके कारणच सांगितले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : बेस्ट पतपेढीची निवडणूक उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेने एकत्र येत लढवली होती. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते. आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. मनसे- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या पॅनेलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. या निवडणूकीत शशांक राव यांच्या पॅनलने मोठे यश मिळवले. तर दुसरीकडे या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळेच बेस्टच्या या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूला का घात झाला? हे स्पष्ट करीत राजकीय विश्लेषकांनी पराभवाचे नेमके कारणच सांगितले आहे.

बेस्ट पतपेढीची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले होते. विशेषतः त्यांनी मुंबईत मेळावा घेतला होता. त्यासोबतच राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आल्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. राजकीय दृष्टया येत्या काळात एकत्र येणार का याविषयी चर्चा सुरु आहेत. त्यातच बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत हे पॅनेल उभे केले होते, त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. बेस्ट पतपेढीच्या 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.

या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि महायुतीच्या पॅनेलमध्ये मुख्य लढाई होईल, असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकवत शशांक राव यांच्या पॅनेलने 21 पैकी 14 जागा जिंकत बाजी मारली. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने 7 जागांवर विजय मिळवला. तर ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही. त्यासाठी ठाकरे गटाची गेल्या काही वर्षातील बेस्टमधील निष्क्रियता कारणीभूत असल्याची चर्चा आता रंगली आहे.

या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वांचा अंदाज चुकवत 14 जागा जिंकल्या. शशांक राव यांचे वडील शरद राव हे कामगार नेते होते. मुंबई महानगरपालिकेत 25 वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता असताना आणि बाळासाहेब ठाकरे व गोपीनाथ मुंडे हयात असतानाही पालिकेच्या अंतर्गत कामगार संघटनेत शरद राव यांचे वर्चस्व कायम राहिले होते. शशांक राव यांनीही त्यांच्या वडिलांप्रमाणे कामगार संघटनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत. त्यांनी बेस्टमध्ये अनेक आंदोलनं केली. त्यामुळे बेस्टचा कर्मचारी वर्ग त्यांच्यासोबत राहिला असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट दिसत आहे.

शशांक राव भाजपमध्ये (BJP) असले तरी त्यांनी या निवडणुकीत स्वत:चे स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. त्यांना 14 जागांवर विजय मिळाला. त्यासोबतच या निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या प्रसाद लाड, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किरण पावसकर आणि नितेश राणे यांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या सहकार समृद्धी पॅनेलला 7 जागा मिळाल्या. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचे या निवडणुकीत पानिपत झाले आहे.

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गटाने बेस्ट प्रशासनातील जुनी माणसे बदलणे आणि नवीन माणसांना पुढे आणण्यात कमालाची निष्काळजीपणा दाखवला. बेस्टमध्ये मनसेचे अस्तित्व फार नव्हतेच. या सगळ्याचा फटका ठाकरे बंधूंना बसला आहे. त्यासोबतच संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या कामांचा नियमित आढावा घेणे, याबाबत उद्धव ठाकरे यांनी हलगर्जीपणा केला. त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळेच बेस्टमध्ये ठाकरे बंधूला पराभव स्वीकारावा लागला आहे. दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्कांसाठी भांडणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या शशांक राव यांना साथ दिली. मात्र, बेस्ट आणि मुंबईचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यामुळे या निकालाच महापालिका निवडणुकीवर विशेष परिणाम होणार नाही. त्याठिकाणी वेगळे चित्र पाहायला मिळू शकते.

आगामी काळात मुंबई महानगरापलिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचे निकाल पाहता या निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक ही प्रत्यक्षात कामगार संघटनांच्या ताकदीचा कस लावणारी निवडणूक मानली जाते. कारण बेस्ट कर्मचारी हे मुंबईतील एक मोठा आणि प्रभावी मतदार वर्ग आहे. त्यांचे कल कोणत्या पक्षाकडे झुकले आहेत याचा अप्रत्यक्ष अंदाज या पतपेढीच्या निकालावरून घेतला जातो.

आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे काही मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत. मुंबई महानगरापलिकेच्यादृष्टीनेही ठाकरे बंधूंना विचार करावा लागणार आहे. महानगरपालिका निवडणुकीत प्रचार कसा करायचा, हे ठरवावे लागणार आहे. बेस्टच्या निवडणुकीत गाफील राहिल्याने ठाकरे बंधूना या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले. त्याशिवाय बेस्ट पतपेढीची निवडणूक व मुंबई महानगरापलिकेची निवडणूक या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम महापलिका निवडणुकीवर होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT