Nagpur News : हिंदी भाषिक, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाविरोधात सातत्याने वक्तव्य आणि परप्रांतीयांना मारहाण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत मुंबई व उपनगरातील दहा महानगरपालिका उद्धव सेनेला युती करणे परवडणार नाही असा सल्ला देऊन युती केल्यास हिंदी भाषिक, दलित व अल्पसंख्य मतदार शिवसेनेच्या विरोधात जाण्याची भीती उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
एका मीडियावरील डिबेटमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर तिवारी यांची उद्धव सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी पदाधिकारी या नात्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी मनेसोबतची युती उद्धव सेनेसाठी घातक ठरेल असाही इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा प्रमुख कणा असलेला हा मतदार वर्ग जर दुरावला, तर त्याचा थेट फायदा भाजपाला होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेची संधी धोक्यात येईल. ते पुढे म्हणाले, गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेला विजय हा अल्पसंख्य व हिंदी भाषिक मतदारांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला. मात्र, मनसेसोबत (MNS) युती केल्यास हाच मतदार वर्ग नाराज होऊन विरोधात जाऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा. भाषावाद आणि प्रांतवादावर आधारित राजकारण देशहितासाठी धोकादायक आहे
मनसेसोबत युती झाल्यास शिवसेना सैनिकांतही नाराजी वाढेल, असे स्पष्ट करून तिवारींनी या विषयावर उघड चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. मराठी बोलत नसल्याच्या कारणावरून गुजरात राजस्थान उत्तर प्रदेशच्या महाराष्ट्रातील व्यवसायिकांना बेदम मारहाण केली जात आहे. लाऊड स्पीकरवरील अजानच्या कारणावरून मुस्लिमांना धमकी दिली जात आहे.
शांतताप्रिय महाराष्ट्रात मनसे नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करत असतानाही त्यांच्यासोबत युती करणे म्हणजे स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. त्यामुळे ही युती टाळण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे.
किशोर तिवारी शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. विदर्भातील त्यातही यवतमाळ जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय त्यांनी सातत्याने लावून धरला होता. त्यांच्यामुळे तत्कालीन केंद्र सरकाराला याची दखल घ्यावी लागली होती. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत तिवारी यांचा खारीचा वाटा आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप-सेना युतीच्या कार्यकाळात ते पाच वर्षे वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष होते. भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर ते शिवसेनेत दाखल झाले होते. पक्षाचे प्रवक्ता म्हणून त्यांना विविध हिंदी बातम्यांच्या चॅनेलवरील डिबेटमध्ये सहभागी होत असत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.