Kolhapur News : राज्यात दोन समांतर महामार्ग असतानाही शक्तिपीठ महामार्ग आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या माथी मारली जाण्याची शक्यता आहे.या प्रकल्पामुळे 12 जिल्ह्यांतील शेतकरी व्यथित झाले असून या प्रकल्पाला मोठा विरोध सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या विरोधाला न जुमानता महामार्गासाठी मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.कारण समृध्दी महामार्गालाही सुरुवातीला प्रचंड विरोध झाला होता, नंतर हा विरोध मावळल्याचा अनुभव फडणवीसांकडे असल्याचं बोललं जात आहे.त्यामुळे ते त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आग्रही भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर, सांगली आणि नांदेडमधील शेतकऱ्यांनीही शक्तिपीठ महामार्ग नकोच अशी भूमिका घेताना विरोध दर्शवला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाच्या काही गावांतील स्थिती अत्यंत दयनीय असून जर जमिनी गेल्याच तर त्या अन्नदात्यानं काय करायचं असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस देखील फक्त उद्योजकांची बाजू घेताना दिसत आहे.
हातकणंगले, कागल आणि आजरा तालुक्यातील काही शेतकऱ्यांशी बोलल्यावर सध्या स्थिती गंभीर आहे. पण महामार्गासाठी शेतजमीन गेलीच तर शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यासह चाकरी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
या प्रकल्पासाठी हजारो हेक्टर जमीन संपादन केली जाणार आहे.तर कागलच्या सांगवडे गावातील 110 शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी जाणार असून जवळजवळ 85 टक्के शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे.यावरून येथील शेतकरी प्रकाश पाटील यांनी सरकारला धारेवर धरत 20 वर्षांपूर्वीच्या नोंदीवरून सरकार आमच्या जमिनी काढून घेत असल्याचा आरोप केला आहे.त्यांनी पूर्वी येथे कसपट देखील उगवत नव्हते.
शेतकऱ्याने घाम गाळून जमिनी उपजाऊ केल्या आहेत. आता कुठे आमची मुलं-बाळं दोन घास खात असतानाच सरकार आम्हाला रस्त्यावर आणण्याचे काम करत आहे. आमची शेती पडीक असो किंवा ती उपजाऊ पण यातून येणाऱ्या उत्पादनाची गणती शासनाने पैशात करू नये. हा महामार्ग प्रगतीचा नसून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार असल्याचेही शेतकरी प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.
हातकंणगले मधील साजणी गावात तर या महामार्गामुळे 27 विहिरी, 6 कुपनलिकांचा बंदोबस्त होणार असून पाणी पाणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. या गावात पाणी कधी येते तर कधी नाही. अशामुळे शेतकरी माळरानं, शेतावर राहतात. आता त्यांचे शेतच महामार्गात जाणार असून तहान भागवणाऱ्या विहिरी बुजवल्या जाणार आहेत. यामुळे 275 शेतकरी महामार्ग नकोच अशी मागणी करत आहेत.
क्रिष्णात पाटील यांनी सरकारला जाब विचारला आहे. तर जगवणाऱ्या शेतकऱ्याला आता सरकार चाकरीला घालवतयं असे म्हटलं आहे. त्यांची 1 एकर शेती असून त्यात विहीर आहे. पण आता यातील 30 गुंठे जमीन महामार्गात जाणार आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोतच जाणार आहे.
असेच काहीसे कागल तालुक्यातील एकोंडी गावातील शेतकरी आनंदा पाटील यांच्याबरोबर होत आहे. आनंदा पाटील अल्प भूधारक असून त्यांच्यासह अनेकांची शेतं यात जाणार आहेत. आधीच काळाम्मावाडी प्रकल्पधारकांना त्यांनी 400 एकर जमीन दिली आहे.
आता उरलेल्या 1200 एकरपैकी 300 एकर महामार्गासाठी मागितली जात आहे. यामुळे गावाला खायला देखील जमीन उरणार नसल्याची खंत आनंदा पाटील यांनी मांडली आहे. सध्याच्या स्थितीला अशीच जमिन देत राहिलो तर संस्कृती जपण्यासाठी दसऱ्याला घट बसवण्यासाठी देखील माती मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक इंचभर देखील जमीन देणार नाही, अशी भूमीका घेतली आहे.
आजरा तालुक्यातील मोठे क्षेत्र हे पश्चिम घाटात येत असून येथे जैवविविधता पाहायला मिळते. पण आता राज्य शासन यावरच घाला घालण्याचे काम करत आहे.शेळप गावातील शेतकरी सुधाकर पाटील यांनी महामार्गाला आमचा खोडा नाही, मात्र शेतकऱ्याला कसायला तरी शेती राहू द्या अशी आर्तहाक सरकारला घातली आहे. त्यांनी, तालुक्यात सर्पनला प्रकल्प झाला. त्यावेळी आमच्या गावातील अनेकांच्या शेत जमिनी गेल्या. यातील काहींच्या शेती आता गुंठ्यावर आल्या आहेत ज्या प्रकल्पाजवळ आहेत. पण हा महामार्ग येथून जाणार असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होतील असे सांगितले आहे.
एकेकाळी त्यांचीच जमीन 15 एकर होती, मात्र 8 एकर सर्पनाला प्रकल्पात गेली. आता 7 एकरमध्ये भाऊ आणि ते आपला गुजराण करत असतानाच नव्या महामार्गाच्या भूसंपादनाची चाहूल लागली आहे. यामुळे त्यांची 4 एकर जमीन जाणार असून 3 एकरात भाऊ आणि मी तर पुढच्या पिढीने शेती गुंठ्यात करायची की फुटात असाही सवाल त्यांनी केला आहे. तर असेच होत राहिले तर शेतजमीन कसायला ही राहणार नाही, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.
दरम्यान शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी देखील शेतकऱ्यांच्या आपण आपल्या छातीचा कोट करू पण महामार्ग रेटायला देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.या निवडणुकीनंतर ते शक्तिपीठ महामार्ग सुरु केला आहे.ते या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे व इतर जिल्ह्यांतून विरोध नाही असे खोटे नरेटिव्ह वापरत आहेत.
पण इतर जिल्ह्यांमध्ये देखील आंदोलन सुरू होती व आता देखील आहेत.सरकारला कंत्राटदारांचे भले करण्यासाठी व उद्योगपतींना नैसर्गिक साधन संपत्ती,खनिज संपत्ती लुटीसाठी हा महामार्ग म्हणजे रेड कार्पेट आहे.पर्यावरण विभागांनी ग्राउंड सर्वे करणे गरजेचे असताना एक-दोन दिवसांमध्ये या महामार्गाच्या प्रस्तावास कशी मंजुरी दिली जाते हा देखील संशोधनाचा विषय असल्याचे फोंडे यांनी म्हटले आहे.तर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला तसेच पर्यावरणविरोधी शेतकरी विरोधी व जनविरोधी शक्तिपीठ महामार्ग रेटण्यासाठी जर शासन जिद्दीस पेटले तर रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकवू असाही इशारा गिरीश फोंडे यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.