Uddhav Thackeray action mode News : हिंदी सक्तीच्या विरोधात 20 वर्षानंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी वरळीत विजयी मेळावाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येईल, असे आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केल्यास चित्र वेगळे दिसणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.
दोन्हीकडील कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरु असतानाच दुसरीकडे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महत्त्वाचा आदेश काढला आहे. 'पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही.' अशा सूचना प्रवक्त्यांना दिल्या आहेत. अशास्वरूपाचे फर्मान राज ठाकरे यांनी काढल्याने संभाव्य युतीबद्दल संभ्रम वाढलेला आहे. त्यामुळेच आता उद्धव ठाकरेंनी युती झाली नाही तर बी प्लॅन तयार ठेवला आहे.
राज व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या चार महिन्यापासून सुरु होत्या. मात्र, चर्चा पुढे सरकत नव्हती. त्यातच राज्य सरकारने हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याच मुद्द्यांवरून आक्रमक झालेल्या ठाकरे बंधूनी हिंदी सक्तीच्या विरोधात स्वतंत्रपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत दोन आंदोलने करण्यापेक्षा एकत्र रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे महायुती सरकारने हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सर्वच पक्ष एकत्र येत असल्याचे पाहून जीआर रद्द केला होता. त्यामुळे सरकार विरोधात ठाकरे बंधूकडून काढण्यात येणारा मोर्चा रद्द करून वरळी येथील डोममध्ये विजयी मेळावा घेण्याचे ठरले. त्यानुसार 20 वर्षानंतर एकत्र येत राज व उद्धव ठाकरेंनी मेळाव्याला हजेरी लावली. दोघांनीही एकत्र येणार असल्याचे सांगत विरोधकांवर जोरदार टीका केली.
संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरे यांना साद घातली. युतीबद्दल स्पष्ट संकेत दिले. पण राज यांच्याकडून अद्याप तरी उद्धव ठाकरेंना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच मनसैनिक, अनेक नेते युतीसाठी आग्रही असताना राज यांनी त्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे धाकधूक वाढली असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या पक्षात महत्त्वाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
राज ठाकरेंनी युतीसाठी टाळी न दिल्यास काय करायचे, यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काम करण्यास सुरुवात केली आहे. स्वबळावर लढल्यास आणि काँग्रेसला सोबत घेतल्यास मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये काय चित्र दिसेल, याची चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळेच जर ऐनवेळी राज ठाकरे यांनी युती न केल्यास बी प्लॅन उद्धव ठाकरे यांनी तयार ठेवला आहे.
गेल्या तीन वर्षांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मुंबईसह आसपासच्या महापालिका क्षेत्रांमध्ये हादरे दिले आहेत. अनेक माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेल्याने उद्धव ठाकरे यांचा पक्ष कमकुवत झालेला आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्यास उद्धवसेनेची अवस्था बिकट होऊ शकते. त्यामुळेच सोबत कोणाला तरी घ्यावे लागणार असल्याने तयारी सुरु केली आहे.
येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या साथीने मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीत उतरल्यास काय होईल, याची चाचपणीदेखील सुरु केली आहे. ठाकरेंना अद्याप मुंबईत जनाधार आहे. विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 20 जागा जिंकल्या होत्या.
त्यापैकी विधानसभेच्या 10 जागा मुंबईतील आहेत. मुंबईत असलेला मुस्लिम मतदार गेल्या दोन निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. काँग्रेस सोबत असल्यास हा मतदार पुन्हा एकदा ठाकरेंच्या पाठीशी राहू शकतो. त्यामुळे काँग्रेसला सोबत घेतल्यास काय होऊ शकतं, याची चाचपणी केली जात आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं बी प्लॅनची चाचपणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.