Eknath Shinde, Rahul Narvekar, Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray : नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड,शिवसेनेचा पुनर्जन्म…; जनता न्यायालयाचा 'मास्ट्रर स्ट्रोक' यशस्वी

सरकारनामा ब्यूरो

सचिन देशपांडे-

Uddhav Thackeray PC on MLA Disqualification : राहुल नार्वेकर यांच्या निकालाची जाहिर चिरफाड आज शिवसेनेच्या जनता न्यायालयात झाली. ही चिरफाड करताना आज आक्रमक शिवसेनेचा पुनर्जन्म झाल्याचे चित्र होते. यापूर्वीच्या अनेक बंडानंतर आक्रमक शिवसेना समोर आली होती. शिंदेच्या बंडात ही आक्रमक शिवसेना दिसली नाही, कुठे गेली, असा प्रश्न होता. आज शिवसेनेने आक्रमकतेबरोबर अचुक टायमिंग साधले. ही आक्रमकता वकिली भाषेत समजवून सांगण्यात शिवसेनेच्या वकिलांना यश आल्याचे दिसले.

राजकीय लोकशाहीत जनतेच्या न्यायालयातील निकाल हाच सर्वोच्च असतो. त्याचा योग्य वापर शिवसेना थिंक टँकने केल्याचे चित्र होते. हे करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच बरोबर दोन वकील अॅड. राहूल नार्वेकर, अॅड.देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट वकिल असिम सरोदे यांनी केलेल्या वकिली भाषेत गंभीर आरोप केल्यानंतर या विषयावर शिंदे, फडणवीस आणि नार्वेकर यांना जाहिरच उत्तर देण्यास बाध्य केले आहे.

अचूक टायमिंगचा 'मास्टर स्ट्रोक'

अयोध्येतील राम मंदिर उदघाटनाचे देशभर वातावरण आहे. देशात सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नुकतीच सुरु झालेली न्याय यात्रा. राहूल नार्वेकर यांचा आलेला निकाल, अशा तीन महत्वाच्या गोष्टींना समोर ठेवत शिवसेनेने देशात पहिल्यांदाच जनता न्यायालयात एखाद्या लवादाच्या निकालाची जाहिरपणे चिरफाड केली. अशा प्रकारे न्यायालयाच्या निकालाची चिरफाड करण्याचे अस्त्र आज असिम सरोदे यांनी लोकशाहीत सामान्य जनतेला असल्याचे सांगितले.

इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांची दावोस वारी, शिंदे गटाच्या आमदारांचा नार्वेकर विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणे आणि सर्वोच्च न्यायालयात मुळ प्रकरण प्रलंबित असताना व या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापुर्वी साधलेले हे अचुक टायमिंग शिवसेनेच्या राजकीय खेळीचा महत्वाचा भाग ठरेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस, शिंदे, नार्वेकरांचा कायदा इंटरेस्टिंग

असिम सरोदे यांनी आजच्या जनता न्यायालयात महत्वाचे मुद्दे सांगताना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांनी कायदा इंटरेस्टींग केल्याचा आरोप केला. मुळ राजकीय पक्षाद्वारे नियुक्त गटनेता अजय चौधरी यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविली होती. त्याच बरोबर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नियुक्त राजकीय पक्षाद्वारे न झाल्याने त्यावर ताशेरे ओढले होते. इतकेच नाही फुटलेल्या गटाद्वारे भरत गोगावले यांची गटनेता पदाची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविली असताना त्या आधारे दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अपात्रतेचा दिलेला निर्णय वैध कसा असा प्रश्न असिम सरोदे यांनी उपस्थित केला.

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस च्या निकालानंतर अशाच प्रकारे चिरफाड होण्याचे ट्रेलर आज दाखविण्यात आले. इतकेच नाही तर मुळ राजकीय पक्ष आणि विधीमंडळ राजकीय पक्ष यांची भूमिका विषद करत क्लिष्ट विषय आज सोपा केला. त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होतील.

शिंदे गटाचे आमदार अपात्र कसे

मुळ राजकीय पक्षच व्हीप काढू शकतो. पक्षात फूट पडल्यानंतर दूसऱ्या राजकीय पक्षात विलीनीकरणाची गरज होती. त्यांनी गट स्थापन करण्याची आवश्यकता होती. ती न केल्याने ते शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतात. शिंदे गट टप्प्या टप्यात फुटला, दोन तृतीयांश आमदारांची एकत्रित फुट नव्हती. त्याच बरोबर विधानसभा अध्यक्ष पदावर असताना राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी भाजपा सदस्य पदाचा राजीनामा दिला नसल्याचा दावा सरोदे यांनी केला. पक्षांतर बंदी कायद्यात पक्षांतर थांबविणे हा मुळ उद्देशच पाळला गेला नाही.

एकनाथ शिंदे लिडर म्हणून अपात्र असताना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरविण्यात आले नाही. ही नार्वेकरांची मोठी चूक असल्याचा दावा सरोदे यांनी केला. न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार वाढल्याचे, त्याच बरोबर लोकशाही आणि संविधानाची ही हत्या असल्याचा आरोप सरोदे यांनी केला. याचे सविस्तर उत्तर नार्वेकर आणि शिंदे यांना द्यावे लागेल. केवळ तोंडी उत्तर नाही तर ज्या प्रकारे शिवसेना (उबाठा) यांनी वेगवेगळ्या मुद्यांची चिरफाड केली. अगदी त्याचे उत्तर पुराव्यानिशी द्यावे लागतील.

राष्ट्रीय कार्यकारिणी आणि निवडणूक आयोग

अॅड.अनिल परब यांनी थेट शिवसेनेच्या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारणीचा व्हिडीओ समोर आणत त्याच बरोबर त्यानंतर निवडणुक आयोगाने स्विकारलेले कार्यकारणीचे पत्रव्यवहार मांडला. इतकेच नाही तर निवडणुक आयोगाने उध्दव ठाकरे यांना वेळोवेळी पाठविलेले पत्र, त्याच बरोबर पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांचा मोदी सरकारला दिलेला पाठिंबा,पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनी त्या त्या निवडणूकीत वाटलेले एबी फार्म याचा उल्लेख करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच कसे योग्य आहेत याचा पुराव्यानिशी सादरीकरण केले. कायदेशीर बाजू भक्कम असल्याने हे सादरीकरण देखील प्रभावी होते.

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लबाड म्हणत लवादावर उपस्थित केलेला प्रश्न आणि विदर्भातील गझलसम्राट सुरेश भटाच्या ओळी ‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्याविना मढ्याला आता उपाय नाही…’ या सांगितलेल्या ओळींनी विद्यमान लोकशाही, राजकीय व्यवस्थेची चिरफाड करणारी ठरली.

दावोस दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री हे तिथून या प्रश्नांची उत्तरे देतील की, महाराष्ट्रात परत आल्यावर उत्तर देतील हा कळीचा मुद्दा आहे. इतकेच नाही तर पुढील काळात अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळा असताना आजच्या जनता न्यायालयातील प्रश्नांची उत्तरे देण्याचे धाडस शिंदे गट दाखविणार का हे पाहण्यासारखे ठरेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT