Uddhav Thackeray News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं आता राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच विधानसभेनंतर पुन्हा राजकीय वारं 'इलेक्शन मोड'च्या दिशेनं धावू लागलं आहे. याचदरम्यान, पुढील काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेसाठी आपले राजकीय मतभेद विसरुन ठाकरे बंधूंच्या एकत्रिकरणासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले होते.
एकीकडे शिवसेना आणि मनसे पक्षाकडून युतीसाठी सकारात्मक पावले उचलली जात असतानाच गुरुवारी(ता.12) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानकपणे राज ठाकरेंची भेट घेत सगळ्यांनाच धक्का दिला. यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबई महापालिकेसाठी जुन्या एका मित्राला साद घालत नवा डाव टाकू शकतात,अशी चर्चा आहे.
मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युती करण्यासाठी अतिशय आग्रही भूमिकेत होती. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि त्यांची मनसे मात्र उद्धव ठाकरेंसोबत पुढे जाण्यास चाचपडत होती, सावध पावलं टाकत होती. याचं महत्त्वाचं कारण सगळी चर्चा पूर्ण होऊन अगदी ऐनवेळी 2014 आणि 2019 च्या निवडणुकांवेळी उद्धव ठाकरेंनी धोका दिल्याचं राज ठाकरेंनी यापूर्वी जाहीररित्या सांगितलं होतं. त्याचमुळे यावेळी मनसे जरा सावध होती.
उद्धव ठाकरे हेही राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्या मनसेसोबत अगदी शेवटचा पर्याय म्हणूनच कदाचित युतीसाठी तयार झाले असणार आहेत. कारण शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही थांबायचं नाव घेताना दिसून येत नाही. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेपर्यंत ही गळती थांबणार नाही अशीच चर्चा आहे. याचउलट म्हणावी तशी इन्कमिंगही पक्षात सुरू नसल्याचं पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कितपत एकजूट असेल याविषयी साशंकताच आहे. त्याचमुळे उद्धव ठाकरे किमान मुंबई महापालिकेसाठी तरी स्वबळाचाच विचार करण्याची दाट शक्यता आहे. पण त्यांना या निवडणुकीत कुणीतरी मतांचं बेरजेचं राजकारण करण्यासाठी नवा साथीदार हवा आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुंबई महापालिका निवडणुकीतील युतीसाठी सध्या दोन तगडे पर्याय समोर आहेत. एक म्हणजे राज ठाकरेंची मनसे आणि दुसरा प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हा आहे. भाजपनं गुजराती,परप्रांतिय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जोर लावला असतानाच मनसे हा मराठीच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंना चांगलाच फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि मनसे युती मुंबई महापालिकेत चांगला ऑप्शन म्हणून पुढे येऊ शकते.कारण मुंबईवरती अनेक दशकं दबदबा राखलेल्या आणि मराठी माणसाशी भावनिक नातं जोडले गेलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्या दोन नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी एकत्र यावं ही खूप वर्षांपासूनची महाराष्ट्रातील त्यातही मुंबईतील मराठी माणसाची मनापासूनची इच्छा आहे. पण मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चा भरात आल्या असतानाच दुसरीकडे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेत मोठा धक्का दिला.
फडणवीस आणि राज ठाकरे भेटीनंतर पुन्हा एकदा मुंबई महापालिकेसाठी भाजप (BJP) नवी रणनीती आखण्याची शक्यता आहे. मनसेला सोबत घेऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. याचमुळे मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांना सध्यातरी ब्रेक लागला आहे.
याचदरम्यान,उद्धव ठाकरे दुसरा पर्याय प्रकाश आंबेडकरांना मुंबई महापालिकेसाठी पुन्हा एकदा साद घालण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण यापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकरांची वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अधिकृत युतीही झाली होती.
पण ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीतील एन्ट्रीसाठी जोरदार प्रयत्नही केले होते. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पडद्यामागच्या विरोध,जागावाटपावरुन फिस्कटलेल्या चर्चा यामुळे महाविकास आघाडीतील वंचितची एन्ट्री होता होता राहिली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आपली स्वतंत्र वाट धरत लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्हीही निवडणुका स्वबळावर लढल्या. पण त्यात वंचितचा प्रभाव कमीच राहिला.
आता उद्धव ठाकरे यांच्याइतकीच प्रकाश आंबेडकरांसाठीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे ठाकरे पुन्हा एकदा आंबेडकरांना टाळी देण्याचा विचार करु शकतात. आंबेडकरांना सोबत घेतलं तर मुंबई महापालिकेत मराठी आणि दलित मतांचा मोठा टक्का लक्षात घेता बेरजेचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फायद्याचं ठरण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून इतर सर्वांसोबतच वंचित बहुजन आघाडी युती करण्यास तयार आहे. पण या संदर्भात प्रकाश आंबेडकर अंतिम निर्णय घेतील असेही सुजात आंबेडकर यांनी सांगितले. भाजप व भाजपबरोबर असलेले मित्रपक्ष वगळून इतर पक्षांसोबत जाण्यास वंचित आघाडी तयार आहे. मात्र, स्वाभिमान जपूनच युती किंवा आघाडी केली जाईल असेही ते म्हणाले.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात, ते मोठा भाऊ उद्धव ठाकरेंची साथ देणार की देवाभाऊंची हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. तसेच राज ठाकरेंनी समजा भाजप किंवा महायुतीसोबत महापालिका निवडणुकांसाठी युती केलीच तर प्रकाश आंबेडकरांचा दुसरा मोठा पर्याय उद्धव ठाकरेंसमोर येऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.