
Mumbai News : गेल्या महिन्या दीड महिन्यापासून महाराष्ट्राचं राजकारण उद्धव आणि राज ठाकरे या दोन बंधूंभोवती फिरत असल्याचं पाहायला मिळाला. गेल्या 20 वर्षांचं राजकीय हाडवैर विसरुन 'मातोश्री' आणि 'शिवतीर्था'ला एकत्र येण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. नेहमी टीकेच्या एकापाठोपाठ एक तोफ डागणाऱ्या खासदार संजय राऊतांकडून कधी नव्हे ते राज ठाकरेंचं कौतुकावर कौतुक सुरू होतं. पण एकीकडे संजय राऊतांना राज ठाकरेंवर किती बोलू आणि किती नाही असं झालं असतानाच दुसरीकडे चाणाक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) हॉटेल ताजमधील 2102 रुममध्ये अवघ्या 30 मिनिटांत गेमच पलटवला.
विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर तिकडे महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली. यानंतर खडबडून जागे झालेल्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका हातातून जाऊ न देण्यासाठी मोठी खेळी रचली. आणि विधानसभा निवडणुकीत दीडशेच्या वर उमेदवार देऊन,तगडा प्रचार करुन एकही आमदार निवडून येण्याची नामुष्की ओढवलेल्या राज ठाकरेंशी जुळवुन घेण्यासाठी पावलं टाकण्यास सुरुवात केली.
मराठी माणसाची नव्हे तर महाराष्ट्राची इच्छा पूर्ण होणार यांसारख्या वक्तव्यांनी भावनिक राजकारणाला उधाण आलं. कधी नव्हे तर इतकं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंसाठी पायघड्या घालण्याची तयारी सुरू झाली होती. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबाबतचा मागचा अनुभव लक्षात घेता मनसेकडून सावध पावलं टाकतानाच मोजकीच विधानं केली जात होती.
पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या लढवय्या नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयी प्रचंड आशावादी आहेत. त्यांनी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील युतीविषयी सकारात्मक वक्तव्य केले होते.
संजय राऊतांनी गुरुवारी(ता.12) पत्रकार परिषदेत शिवसेना-मनसे युतीवर सकारात्मक वक्तव्य केले होते. पण वांद्रे येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील भेटीनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली.ही भेट फक्त ठाकरेंच्या स्वप्नांवर पाणी फेरणारी नव्हती, तर या भेटीनं महायुतीतील शिवसेना आणि राष्टवादीलाही हादरा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका रात्रीत गनिमी कावा करत उद्धव ठाकरेंची शिवसेना-मनसेच्या युतीच्या चर्चांनाच खीळ बसल्याचं दिसून येत आहे.
वांद्रे येथील हॉटेल 'ताज लँड्स एंड'मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुरुवातीला दाखल झाले होते. त्यानंतर पुढच्या 20 मिनिटांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही तिथे पोहोचले. ताजमधील 2102 या क्रमाकांच्या रुममध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली. आता या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील जरी समोर आला नसला तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही फडणवीस-ठाकरे भेट नक्कीच महत्त्वाची मानली जात आहे.
विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गुरुवारच्या अधिकृत दौऱ्यांमध्ये ताज लँड्स एंड हॉटेलमधील राज ठाकरेंसोबतच्या कोणत्याही भेटीचा संदर्भ नव्हता.महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वट असलेल्या फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहेत. आगामी काळात मनसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणार का, की महायुतीत भाजप मनसे युती होणार याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत यांनी मनसे-शिवसेना युतीच्या चर्चांवर भाष्य करतानाच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. मुक्त विद्यापीठात कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतो. ते ओपनच आहे. तसेच संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्या मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक प्रस्ताव मांडला होता. आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत आहोत. फक्त आमची अट आणि भूमिका एकच आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्रात द्रोहाच्या भूमिका घेतल्या, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये. हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये, ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.
खासदार संजय राऊतांनी मी राज ठाकरे आणि नारायण राणे या दोन नेत्यांचं आपण नेहमीच कौतुक करत असल्याचं म्हटलं होतं.या दोन्ही नेत्यांनी पक्ष न चोरता शिवसेना सोडल्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला. माझी शिवसेना, मीच खरा शिवसेनाप्रमुख,असा दावा नारायण राणे यांनी केला नाही आणि तर राज ठाकरेंनी पक्ष फोडला नाही. स्वतःचा पक्ष काढून या दोन्ही नेत्यांनी राजकारण केल्याचंही राऊत म्हणाले होते.
याचदरम्यान, संजय राऊतांनी शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढेल की मनसेसोबत निवडणूक लढेल? या प्रश्नांवर याबाबत लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या भूमिका मांडतील, असं स्पष्ट केलं होतं.आजही महाविकास आघाडी आता एकत्रित काम करते.पण,मुंबईमध्ये वेगळा निर्णय काही लोकांना घ्यावा,असं वाटतंय, या संदर्भात पूर्ण आमचं काम विचार आणि भूमिका ठरल्यावर लवकरच जाहीर केलं जाईल.असं सांगितलं होतं.
तर उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीवर ठीक आहे, बघुया, जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल असं म्हणत मोठे संकेत दिले होते. तसेच मी तुम्हाला फक्त एका वाक्यात सांगितलं, याबाबत जे काही बारकावे आहेत ते आम्ही पाहात आहोत. याचवेळी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की संदेश वगेरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ”, असं सूचक भाष्य ठाकरे यांनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.