Uttam Jankar Sarkarnama
विश्लेषण

Uttam Jankar: आमदारकीचा राजीनामा नाहीच,दिल्लीतलं आंदोलनही गुंडाळलं; 'ईव्हीएम' विरोधातल्या लढाईत जानकरांचा फुसका बार...?

Uttam Jankar Vs EVM : विधानसभा निवडणकीतील निकालालाही दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे पुन्हा जानकर आणि महाविकास आघाडीच्या ईव्हीएम विरोधातील लढाईला पहिल्यासारखीच आक्रमक धार येईल का नाही याविषयी राजकीय विश्लेषकांच्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकते आहे.

Deepak Kulkarni

Uttam Jankar Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चांगलेच चर्चेत आले होते. निकालानंतर जानकर यांच्या माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावाचं नाव राज्यातच नव्हे तर देशपातळीवर गाजलं होतं. ईव्हीएमवर संशय घेऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी या गावानं मोठ्या लढ्याचा पायाही रचला. मात्र, सोलापूर जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारली .

त्यानंतरही आमदार जानकरांसह महाविकास आघाडीकडून पुढचे काही दिवस ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरण्यात आला. पण आता दिवसागणिक महाविकास आघाडीची ईव्हीएमविरोधातील लढाईत चार दिशेला चार तोंड अशी अवस्था झाल्यानं उत्तम जानकर (Uttam Jankar) चांगलेच बॅकफूटला गेले आहेत. राजीनाम्याची वल्गनाही हवेत विरली,तसेच त्यांच्यावर दिल्लीतील आंदोलनही गुंडाळण्याची वेळ आली.

आता महाविकास आघाडीची ईव्हीएम (EVM) विरोधातील लढाई धारदार करण्यात माळशिरसचे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरांचा मोठं योगदान होतं. पुढच्या एकाही निवडणुकीत ईव्हीएम मशीनवर मतदान करणार नाही. तसेच ईव्हीएमवर निवडणुक असेल तर लढणारच नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वीच 25 जानेवारीपासून दिल्लीतील जंतरमंतरवर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाविरोधात मोठं आंदोलन छेडण्याची घोषणाही केली होती. पण अखेर ते आंदोलनही महाविकास आघाडीचं म्हणावं तसं पाठबळ न मिळाल्यामुळे मागं घ्यावं लागलं.

माजी मंत्री बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी दिल्ली येथे 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा निवडणूक आयोगाकडे सादर करणार असंही जानकरांनी सांगितलं होतं.

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावानंतर धानोरे गावातून देखील ईव्हीएमला विरोध होत आहे. माळशिरस तालुक्यातील धानोरे गावात हात उंचावून पुन्हा मतदान घेण्यात आलं.यावेळी उत्तम जानकर यांना EVM मध्ये 963 मते धानोरे गावात पडली होती, तर हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर त्यांना 1206 मते पडली.त्यामध्ये 243 मतांचा फरक पडला.

लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांच्या पक्षात असलेल्या उत्तमराव जानकरांनी देवेंद्र फडणवीसांनी मध्यस्थी करुनही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अजित पवारांना टार्गेट करत धैर्यशील मोहिते पाटलांच्या खासदारकीत मोठा वाटा उचलला होता. पण याच जानकरांनी विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या बंपर विजयावरच शंका उपस्थित करत ईव्हीएमवरुन मोठा लढा उभारला होता. आता याच उत्तमराव जानकरांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीची साथ मिळत नसल्याचं समोर येत आहे.

जानकरांच्या लढाईत सुरुवातीला सावध भूमिका शरद पवार,उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांनी इंटरेस्ट दाखवला होता. त्यामुळे जानकरांच्या बालेकिल्ल्यातील मारकडवाडी हे गाव ईव्हीएम विरोधातील लढ्याचं केंद्रस्थान होईल असं बोललं जात होतं. पण आता हेच जानकर या ईव्हीएम विरोधातील लढाईत एकाकी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राज्यातलं महायुती सरकार तीन महिन्यात पडणार आहे, त्याचे पुरावे मी सादर केल्यावर देश गडबडून जाईल. सरकार शंभर टक्के जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्यावा लागणार’ असा दावा करत आमदार उत्तम जानकर यांनी खळबळ उडवून दिली होती.

याचशिवाय ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नसेल तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा, अजित पवार दहा हजार मतांनी पराभूत होतील. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आव्हानही मी स्विकारतो. या देशाची आणि राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,असंही जानकर यांनी म्हटलं होतं.

मारकडवाडी हे ईव्हीएमविरोधातील भूकंपाचे मुख्य केंद्र असणार आहे. ज्या प्रमाणे पोखरण हे अणुशक्ती चाचणीचे केंद्र होतं, तसं मारकवाडी हे लोकशाही आणि बॅलेट पेपर मतदानाचे केंद्र होणार असल्याचं ठणकावत आमदार उत्तमराव जानकर यांनी आपण 23 जानेवारीला दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाला हा राजीनामा देणार होते.

धानोरच्या 1200 लोकांनी याआधीच प्रतिज्ञापत्र करुन इलेक्शन कमिशननी येऊन आमच्या गावाची पडताळणी करावी असं म्हटलं होतं.माझ्यावर या तालुक्यातून प्रचंड असा दबाव आहे. त्याचमुळे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जानकर यांनी जाहीर केलं होतं.

जर 25 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं माझी पोटनिवडणूक जाहीर केली नाही. ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीव्हीपॅट मधून चिठ्ठी काढून व्हावं, असं पारदर्शी पद्धतीनं निवडणूक आयोगानं निवडणूक घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी जानकरांनी यावेळी व्यक्त केली होती.

जर निवडणूक आयोगानं योग्य निर्णय आयोगानं नाही घेतला तर हा देशव्यापी विषय असून, दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन सुरू आहे.तिथेही अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचा हाच ईव्हीएमचाच मुख्य विषय आहे. त्यांना दिल्लीच्या निवडणुकीतही हेराफेरी होऊ शकते. हीच भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

पण याच काँग्रेसच्या नाना पटोलेंनी आता आमचे आंदोलन ईव्हीएमच्या विरोधात नाही,तर 60 लाख अतिरिक्त मतदार आणले कुठून यावर आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 9 कोटी 54 लाख मतदारसंख्या निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. निवडणूक झाल्यावर आयोगाने मतदारांचा आकडा बदलला. 60 लाख अधिकचे मते कुठून आली. त्याची माहिती आम्ही मागितली आहे. मात्र, आयोग सांगण्यास नकार देत असल्याचंही पटोले यांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही आक्षेप असल्यास ते 45 दिवसांच्या आतमध्ये दाखल करणे आवश्यक असते. त्यानुसार महाविकास आघाडीकडून शेवटच्या दिवसांपर्यंत तब्बल 65 ते 70 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात या सर्वाधिक याचिका असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे.

सध्यातरी महायुतीच्या विरोधातील ईव्हीएमचा मुद्दा महाविकास आघाडीच्या हातून निसटला असल्याचं दिसून येत आहे. कारण वास्तविक पाहता राज्यात 288 पैकी 237 जागा जिंकून महायुती प्रचंड बहुमतासह सत्तेत असल्यामुळे ईव्हीएम विरोधातल्या लढाईसाठी आता महाविकास आघाडी आणि जानकरांना पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

विधानसभा निवडणकीतील निकालालाही दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे पुन्हा जानकर आणि महाविकास आघाडीच्या ईव्हीएम विरोधातील लढाईला पहिल्यासारखीच आक्रमक धार येईल का नाही याविषयी राजकीय विश्लेषकांच्या मनात थोडी शंकेची पाल चुकचुकते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT