
Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर बीडसह अख्या राज्यात असंतोष पसरला आहे. यावरून राजकीयसह सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं असतानाच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर धरत आहे. अशातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी आज (ता.29) पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. धस यांनी मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना परळी आणि अंबाजोगाईत काम न करता बिलं उचलली असा आरोप केला आहे. तसेच अजित पवार यांना अशी बिले उचलणाऱ्यांवर इतकं प्रेम करू नयेत, अशी विनंती केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात भाजप आमदार सुरेश धस चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या निशान्यावर मंत्री धनंजय मुंडे यांना घेतले आहे. त्यांनी अनेकदा बडा आका आणि छोटा आका म्हणत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आता मुंडे यांच्यावर धस यांनी नव्याने काही आरोप केले आहे. ज्यात त्यांनी परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील काळाबाजर बाहेर काढला आहे. तर याकालावधीत मुंडे हेच सामाजिक न्याय तथा बीडचे पालकमंत्री होते. त्याच्या काळातच परळी आणि अंबाजोगाईत काम न करता बिलं उचलण्यात आल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.
धस यांनी पत्रकार परिषदेत मुंडे यांनी आपले पालकमंत्रीपद भाड्याने दिलं होतं का असा सवाल केला आहे. तर बीडमधील कार्यकारी अभियंता कोकणे याने पिस्तुल मागितल्या किस्सा सांगताना त्यावरून सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात टिप्पणी केल्याचे आठवण करवून दिली.
बीडच्या डीपीडीसी 2021 ते 2022 याकालावधीत पालकमंत्री धनंजय मुंडे होते. कोरोनाचा कालावधी. परळी आणि अंबेजोगाई येथे एका नव्या रूपयाचे काम झाले नाही. पण कामं न करता कोट्यवधी रुपयांची बिले उचलण्यात आली. सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाईने 2 कोटी 31 लाख उचलले. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग बीड 10 कोटी 98 लाख, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबेजोगाई 6 कोटी 59 लाख, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग (जिल्हा परिषद) 16 कोटी 48 लाख रुपये आणि कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग (जिल्हा परिषद) बीड 1 कोटी 34 लाख रूपये उचलल्याची माहितीच त्यांनी पत्रकार परिषदेत उघड केली.
जवळपास दोन वर्षांत बीडच्या परळी आणि अंबेजोगाई येथे 63 कोटी रुपये हे बोगस कामांच्या माध्यमातून उचलण्यात आल्याची धक्कादायक माहिती धस यांनी जाहीर केली आहे. संजय मुंडे यांना डेप्युटी इंजिनियर असताना कार्यकारी अभियंता दाखवून 25 जून 2022 त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळीचा अभियंता विभागाचा प्रभारी कार्यभार देण्यात आल्याचा दावा धस यांनी केला आहे. याच संजय मुंडे यांनी बिले उचलून दिली असा दावा धस यांनी केला आहे.
यावेळी धस यांनी या कारभारातील अनेक नावांचा उल्लेख करताना मोडस ऑपरेंडी कशी असते याची उकल करवून दिली. तर जिल्हाधिकारी पैसे जिल्हा परिषदेला डम्प करायचे आणि जिल्हापरिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला ते जमा होत असत. जे पैसे 31 मार्च 25 जून 22 रोजी उचलले. एकाच दिवशी 37 कोटी 70 लाख रुपये उचलले. मात्र एक रुपयाचेही काम करण्यात आले नाही, याचे आपल्याकडे पुरावे असून याची पीडीएफचे पत्रकारांना देता. जी माहिती पत्रकारांनी प्रसिद्ध करावी. जेणेकरून जिल्ह्यातील नागरीकांना तरी कळावे आपल्या पैसांचे नेमकं होतं तरी काय? असा टोला देखील मुंडे यांना लगावला आहे.
यावेळी अजित पवार यांनी धस यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून पत्रकारांनी त्यांना छेडले असता, अजितदादा मोठे आहेत. ते एकेरी उल्लेख करू शकतात. मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे. ते रागात कधी कधी एकेरी बोलतात. पण नंतर खूर प्रेम करतात. मात्र अशाप्रकारे 63 कोटी उचलणाऱ्यांवर एवढं प्रेम अजितदादांनी करू नये”, असेही सुरेश धस म्हणाले.
डीपीडीसी जिल्हाधिकारी बीड यांनी 25 मार्च 2020 रोजी परळी मतदारसंघातील ५७ कामाच्या प्रशासकीय रद्द केल्या. या कामांचे एकूण 14 कोटी 43 लाख 45 हजाराचे बिल उचलून मोकळे झाले. प्रशासकीय मान्यता रद्द केलेली असताना हे पैसे उचलले. हा गंभीर गुन्हा आहे. परळी मतदारसंघात 2021 ते 2023 पर्यंत मविआ सरकार असतानाच्या काळात पहिला कट्टा 37 कोटी 70 लाखांचा, दुसरा कट्टा 14 कोटी 46 लाख आणि तिसऱ्यांदा 16 कोटी 20 लाखांची बोगस बिले उचलण्यात आली. तर चौथ्यांदा 5 कोटी असे 73 कोटी 36 लाखांची बोगस बिल दाखवून पैशांची उचल करण्यात आल्याचा आरोप धस यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.