Maratha Reservation News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या दीड वर्षांपासून आंदोलन करत आहेत. 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे त्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण हे त्यांचे सातवे आंदोलन आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रात्री उशिरा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
आतापर्यंतच्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर, शंभूराजे देसाई ही मंडळी शिष्टमंडळात असायची. संदिपान भुमरे हे पैठणचे आमदार होते, त्यामुळे त्यांचे आणि मनोज जरांगे पाटील यांचे चांगले संबंध आहेत. संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री म्हणून भुमरे यांनी या आधीच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
याशिवाय युती सरकारमधील (BJP) भाजपाचे गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील या नेत्यांनीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनात रोल निभावला होता. राज्यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीला जोरदार दणका बसला. महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता सातही मतदारसंघात महायुतीचे दिग्गज पराभूत झाले. मात्र सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यात सर्वाधिक जागा जिंकत बहुमताने सत्ता मिळवली.
दरम्यानच्या काळात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निवडणूक न लढवता पाडण्याचे धोरण स्वीकारले होते. मात्र त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. राज्यात सत्तांतर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या निशाणावर असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठीचे जरांगे यांचे हे तसे पहिलेच आंदोलन. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस याकडे कसे पाहतात किंवा मनोज जरांगे पाटील यांची नेमकी भूमिका काय? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो आंदोलक देखील सहभागी झाले आहेत. काल काही आंदोलकांची प्रकृती खालावल्याने त्यांना अंबडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीही बिघडली आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आतापर्यंत जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, भाजपाचे आमदार (Suresh Dhas) सुरेश धस तसेच घनसावंगीचे हिकमत उढाण यांनी अंतरवाली येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली.
सरकारचा एकही मंत्री, खासदार, पालकमंत्री या आंदोलनाकडे अद्याप फिरकलेला नाही. दरम्यान काल रात्री उशिरा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन ते आले होते, अशी चर्चा आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात सुरू झालेल्या जन आक्रोश मोर्चा च्या निमित्ताने सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील जवळीक आणि संवाद वाढला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात ओबीसींनी रस्त्यावर उतरत जेव्हा प्रति मोर्चे आणि आंदोलने सुरू केली तेव्हापासून मंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत थेट हल्ला चढवला होता. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घूणपणे हत्या झाल्यानंतर यात धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडचा सहभाग समोर येताच देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात उडी घेतली.
धस यांची विनंती अन् जरांगेंनी उपचार घेतले
राज्यभर काढण्यात येत असलेल्या जन आक्रोश मोर्चा मध्ये सहभाग नोंदवला होता. एकीकडे भाजपाचे आमदार सुरेश धस वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात किल्ला लढवत होते. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी जन आक्रोश मोर्चा च्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत ठाम राहिले. या जन आक्रोश मोर्चाच्या दरम्यान आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सुसंवाद आणि समन्वय वाढला.
हे हेरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन हाताळण्यासाठी सुरेश धस यांना 'मेडिएटर'म्हणून नेमले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. अन्न, पाणी त्याग केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या मातोश्री यांच्या आग्रहानंतर पाणी घेतले होते. तर सुरेश धस यांनी काल मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांचा निरोप तर सांगितलाच पण उपचार घेण्याची विनंतीही केली. जरांगे पाटील यांनीही धस यांच्या शब्दाला मान देत सलाईन लावून वैद्यकीय उपचार घेतले. या सर्व घडामोडी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सुरेश धस यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना संदर्भात महत्त्वाची भूमिका सोपवल्याचे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.