Tesla First Showroom Mumbai Sarkarnama
विश्लेषण

Tesla Mumbai Showroom: टेस्लानं भारतातलं पहिलं ऑफिस मुंबईतच का थाटलं? महाराष्ट्रासह देशाला काय होणार फायदे? जाणून घ्या सविस्तर

Tesla Makes India Debut With First Showroom At Mumbai's BKC : पण नेमका काय फायदा होऊ शकतो तसंच टेस्ला कंपनीला याचा काय फायदा होऊ शकतो याची सविस्तर माहिती घेऊयात.

Amit Ujagare

Why Tesla Chose Mumbai: इलॉन मस्क यांच्या बहुचर्चित टेस्ला इलेक्ट्रिक कारचं पहिलं ऑफिस आणि शोरुम हे मुंबईत असणार आहे. पण याचा महाराष्ट्राला आणि पर्यायानं देशाला मोठा फायदा होणार आहे. पण नेमका काय फायदा होऊ शकतो तसंच टेस्ला कंपनीला याचा काय फायदा होऊ शकतो याची सविस्तर माहिती घेऊयात.

टेस्लाच्या अडचणी!

टेस्लाला बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीनं सध्या जगभरात अनेक अडचणी येत आहेत. यामध्ये त्यांचं प्रॉफिट मार्जिन कमी झालं आहे, विक्रीचा दर घटला आहे तसंच त्यांना चीनी इलेक्ट्रिक कार्सच्या कंपन्यांसोबत मोठी तगडी स्पर्धा आहे. यापार्श्वभूमीवर भारत सध्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी महत्वाचं उदयास येणारं मार्केट असल्यानं टेस्लानं आता भारतात शिरकाव करण्याचा किंवा संधी सोधल्याचं म्हणता येईल.

त्यातही इलॉन मस्क यांच्यासाठी अनेक राजकीय अडथळे, उच्च आयात शुल्क आणि मस्क यांचे सहयोगी त्यातही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनही संशयी परिस्थिती निर्माण केली तरी सध्या त्यांची गाडी मार्गावर लागली आहे.

भारतात टेस्ला का आणायची होती?

भारत हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं ऑटो मार्केट आहे. यामध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन मार्केटनंतर भारतात टेस्लाला चांगली संधी आहे. इलेक्ट्रिक वाहनं विकत घेण्यामध्ये भारत सध्या प्राथमिक पातळीवर आहे.

त्याचबरोबर भारत सरकारनं प्रदुषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीनं धोरणंही आखलं आहे. त्यामुळं अद्याप या मार्केटमध्ये शिरकाव करण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत.

भारताच्या या मार्केटची क्षमता मर्सडीज आणि बीएमडब्लू सारख्या प्रिमियम ब्रँडनं आधीच ओळखली आहे. त्यामुळं त्यांनी भारतात आपल्या इलेक्ट्रिक गाड्या असेंबल करणं सरु केलं आहे.

यापार्श्वभूमीवर टेस्ला देखील आता भारतात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासंदर्भात टेस्लाचे मालक इलॉन मस्क आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात १३ तारखेला एक बैठक पार पडली होती.

यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, भारतात आठवड्याभरात विविध पदांसाठी टेस्ला कर्मचारी भरती सुरु करणार आहे. त्यासाठी टेस्लानं आधीच दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांमध्ये शोरुमसाठी ठिकाणं निश्चित केले आहेत.

स्थानिक ब्रँडचं आव्हान

दरम्यान, टेस्लानं भारतीय मार्केटमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत. कारण भारत सरकारनं परदेशी ब्रँडसाठी मोठं आयात शुल्क लागू केलेलं आहे. भारतानं हे धोरण यासाठी आखलंय कारण टाटा मोटर्स आणि महिंद्रासारखे स्थानिक ब्रँडचं संरक्षण व्हावं.

इलॉन मस्कनं (Elon Musk) यापूर्वीच भारताच्या या टेरिफ धोरणावर टीका केली होती. त्यामुळं टेस्लाची इलेक्ट्रिक कार जरी भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली तरी टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा तसंच मारुती सुझुकी या भारतीय ब्रँडच्या इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत टेस्लाच्या कारची किंमत खूपच अधिक असणार आहे.

महाराष्ट्रासाठी, देशासाठी काय फायदा?

टेस्लानं भारतीय मार्केटमध्ये प्रवेश करताना सर्वात आधी मुंबई शहराची निवड केली. कारण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी तसंच एक मोठं आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिझनेस फ्रेंडली शहर आहे. अनेक उद्योगांची मुख्यालयं ही मुंबईत आहेत.

त्यामुळं सहाजिकच या बिझनेसच्या संस्कृतीक वातावरणात आपलंही अस्तित्व असावं यासाठी टेस्लानं मुंबई शहराची निवड केली आहे. त्याचबरोबर टेस्लाच्या कारसाठी आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईत उपलब्ध असल्यानं आणि प्रिमियम ग्राहकही उपलब्ध असल्यानं कंपनीची सुरुवात चांगली होऊ शकते.

मुंबई शहरात आपल्या कारला कसा प्रतिसाद मिळतो याचा अभ्यास करुन नंतर टेस्ला पुढीलं धोरणात्मक निर्णय घेऊ शकते. चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर पुढे दिल्ली, चेन्नई, कोलकाता या मेट्रो सीटीजनंतर बंगळुरु, हैदराबाद यांसारख्या आयटी इंडस्ट्रीजसाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरांमध्येही टेस्लाच्या शोरुमचा विस्तार होऊ शकतो.

पण पहिल्यांदाच महाराष्ट्राला ही संधी मिळाल्यानं अमेरिकेसारख्या देशात ज्या टेस्लाच्या कारची चलती आहे तोच अनुभव मुंबईतील ग्राहकांना अनुभवता येईल. तसंच यामुळं महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीतही चांगली भर पडेल.

याची व्याप्ती भारतभरात वाढल्यानंतर सहाजिकच त्याचा इतर शहरांना आणि त्या संबंधित राज्यांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे. केंद्र पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांबाबत आणि त्याच्या बॅटरीच्या धोरणाबाबत अमुलाग्र घोषणा झाल्यास त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना आणि टेस्लालाही होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT