uddhav thackeray raj thackeray narayan rane sarkarnama
विश्लेषण

Narayan Rane : उद्धव अन् राज ठाकरेंवर नारायण राणे नेमके का संतापले?

Uddhav Thackeray controversy News : माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. त्यामुळे राणे नेमके का संतापले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत असल्याने वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांना टार्गेट करीत टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उद्धव अन् राज ठाकरे हे दोघेजण एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. त्यामुळे राणे नेमके का संतापले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

नारायण राणे (Narayan rane) यांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजिबात पटत नाही. दोघांमध्ये आडवा विस्तवही जात नसल्याने दोघेही एकमेकांवर टीका करण्याचे निमित्त शोधत असतात. तर दुसरीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत राणेंचे चांगले संबंध राहिले आहेत.

विशेषतः राज ठाकरेंनी त्यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सभा घेतली होती. त्यामुळे राणे विजयीही झाले होते. मात्र, त्यानंतर या दोघातील संबंध का बिघडले ? याची चर्चा जोरात सुरु आहे. राणे यांनी राज ठाकरेंवर टीका केली असल्याने मनसेकडून या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

2004 साली नारायण राणे यांनी शिवसेना (Shivsena) सोडली. त्यानंतरही ते आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त करतात. त्यांच्याविषयी जर राणे यांनी आदर व्यक्त केला नाही तर राजकारणाच करता येणार नाही, याची कल्पना त्यांना आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याठिकाणी राज्य मंत्रिमंडळात ते काही काळ कॅबिनेट मंत्री देखील राहिले.

त्यानंतर काँग्रेस सोडून त्यांनी स्वतःच्या स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली होती. त्यातच मधल्या काळात संबंध ताणले गेल्यांनतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिले होते. सध्या ते भाजपचे खासदार आहेत. तर त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे मंत्री आहेत तर दुसरे चिरंजीव नीलेश राणे हे देखील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून ते सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत.

आपण कोणाशीही युती करताना ताकद पाहावी. कोणाचे किती आमदार आहेत. कोणाचे किती खासदार आहेत, हे आपण पाहतो. आमचे भाजपचे 132 आमदार आहेत तर शिंदे यांच्या शिवसेनेचे 51 तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आहेत. जर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज व उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर ते काय म्हणून मते मागणार ? असा सवालही यावेळी राणे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार आहेत तर मनसेचा एकही आमदार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षाची मिळून ताकद किती होणार याची मोजणी करा, असे म्हणत टीका केली. तर काही चुकीचे संदर्भ त्यांनी या पत्रकार परिषदेवेळी दिले. त्याचवेळी राणेनी महापालिकेत उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्यासोबतच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत यांनी पीएम मोदी, अमित शाह यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत जोरदार टीका केली.

भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे, कारण दोघांच्या संभाव्य युतीबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. त्यामुळेच राणे यांनी या युतीची खिल्ली उडवली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजप, शिंदेंची शिवसेना व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळेच या संभाव्य युतीच्या शक्यतेवरून नारायण राणे यांनी टीका केली आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा प्रभाव आगामी काळात होता असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT