Mumbai News : सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काळात लवकरच होणार आहेत. विशेषता राज्यतील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महापालिका निवडणुका भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. भाजपने मुंबईसह ठाण्याचा बालेकिल्ला सर करण्यासाठी रणनीती आखली आहे. मुंबई पालिकेवर सातत्याने वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेत उभी फूट पडलयानंतर शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. तर, दुसरीकडे भाजपची राजकीय ताकद चांगलीच वाढली आहे.
या महापालिका निवडणुकीत मुंबई कोणाची याचा फैसला होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे येत्या काळात कोणाचे वर्चस्व टिकणार किंवा वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी करण्यास सरुवात केली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
गेल्या काही दिवसात राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली आहे. त्यामुळे राजकारणाचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. गेल्या तीन वर्षांत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शिवसेनेतील ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत आहे तर शिंदेचा गट महायुतीसोबत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे. तर अजित पवार यांचा गट सत्ताधारी महायुतीसोबत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस पाहवयास मिळणार आहे.
तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले होते. त्यामुळे आता मुंबई व ठाणे येथील महापलिका निवडणुका एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्यासाठी देखील महत्त्वाच्या आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता येत्या काळात एकनाथ शिंदे यांची कोंडी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या भाजप व शिंदे गटाचे लक्ष ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकेची सत्ता काढून घेणे हेच आहे. मात्र, दुसरीकडे दोन्ही ठिकाणी भाजपला सत्ता हवी आहे. त्यासाठी वेगाने हालचाली सुरु आहेत. त्यामुळेच येत्या काळात आता भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा पॉलिटिकल गेम होणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसाच्या राज्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेतला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबतही चर्चा झाली.
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे मुंबई महापालिकेतील 227 पैकी 107 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपल्याकडे 107 उमेदवार असल्याची माहिती शिंदे यांनी शाह यांना दिली. शाह यांनी शिंदे यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, त्यांना कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यानंतर भाजपकडून मुंबई, ठाणे आणि पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
भाजपने मुंबईसह ठाण्याचा गड सर करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाण्यातही भाजपने गेम प्लान करून एकनाथ शिंदेंच्या कोंडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात बळ देत शिंदे गटावर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील नगरसेवक आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप येत्या काळात मुंबईसह ठाण्यातही आपलाच महापौर बसावा यासाठीचे प्रयत्न करत आहे.
एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडित काढण्यासाठी भाजपने आखणी केली आहे. एकनाथ शिंदे यांची ठाणे महापालिकेतील सत्ता गेल्यास त्यांची राजकीय कोंडी होणार आहे. त्यामुळे मुंबईपेक्षा ठाण्याचा गड राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंंदेंचा नंबर असल्याच्या चर्चां रंगल्या आहेत.
विशेषतः आगामी काळात होत असेलल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला देखील राजकीय दबाव किंवा रणनीतीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजपने एकाच वेळी ठाकरे गट आणि शिंदे गटाची 'डबल कोंडी' करीत दोघांनाही अडचणीत टाकण्याची रणनीती आखलेली आहे. भाजपने मुंबई-ठाण्यात स्वतंत्र ताकद वाढविण्याची रणनीती आखली आहे, किंवा दोन्ही गटांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.