Buddhadeb Bhattacharjee : अखेरपर्यंत 2 बीएचकेमध्ये राहिलेले मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य

Buddhadeb Bhattacharjee Sarkarnama Podcast : बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनानं डाव्या राजकारणाचा एक अध्याय संपला. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर मिळणाऱ्या शासकीय सुविधाही नाकारल्या होत्या. साधेपणा हा त्यांचा अंगभूत गुण होता.
Buddhadeb Bhattacharjee
Buddhadeb BhattacharjeeSarkarnama
Published on
Updated on

मंत्री तर सो़डाच, आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या आमदारांच्या मुलांचाही रूबाब आजकाल पाहण्यासारखा असतो. लोकप्रतिनिधी हे लोकांच्या सेवेसाठी असतात की स्वतःची, कुटुंबीयांच्या प्रगती करण्यासाठी असतात, याबाबत कोणाच्याही मनात शंका नसण्याचा हा काळ आहे. अशा काळात जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे, साधी राहणी, उच्च विचार असलेले नेते दुर्मीळ होऊ लागले आहेत. देशातील असेच एक नेते, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला आहे.

आपल्या देशात माजी आमदारांनाही विशेष लाभ मिळत असतात, तसे ते माजी मुख्यमंत्र्यांनाही मिळत असतात. अनेक माजी गृहमंत्री पोलिसांच्या बंदोबस्तात फिरत असल्याचे आपण पाहिले आहे. भारतात असेही एक माजी मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांनी अशा प्रकारचा कोणताही लाभ घेतला नाही. मुख्यमंत्रिपद गेले आणि ते रायटर्स बिल्डिंगमधील पश्चिम बंगाल सरकारच्या तत्कालीन सचिवालयातून बाहेर पडले, त्या क्षणापासून त्यांनी राज्य सरकारची कोणतीही सुविधा स्वीकारली नाही, त्याला नम्रपणे नकार दिला. या सोयी-सुविधा मिळण्यासाठी ते पात्र होते. मुख्यमंत्री(CM) असतानाही त्यांनी शासकिय बंगला घेतला नाही. अखेरपर्यंत ते टू बीएचके फ्लॅटमध्येच राहिले. आपल्या वेतनातील बहुतांश रक्कम ते पक्षनिधीसाठी द्यायचे. साधेपणा हा त्यांच्या रक्तातच भिनलेला होता, मात्र याबाबत चर्चा करणे त्यांना अजिबात आवडत नसे.

डाव्या विचारसरणीचे पक्ष आणि नेत्यांबद्दल विचार करताना काही मतभेद जरूर असू शकतात, त्यांच्या धोरणांवर टीका होऊ शकते आणि होतेही, मात्र त्यांच्या प्रामाणिकपणावर फार कमी वेळा शंका घेतल्या गेल्या आहेत. सार्वजनिक जीवनात डाव्या नेत्यांनी अनेक आदर्श पायंडे पाडले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे नाव अशा नेत्यांच्या श्रेणीत अगदी वर येते. बुद्धदेव भट्टाचार्य यांचे वयाच्या 80 व्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ज्योती बसू यांच्यानंतर ते पश्चिम बंगालचे सर्वाधिक काळ म्हणजे 2000 ते 2011 अशी साडेअकरा वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिले. पश्चिम बंगालमध्ये उद्योग, गुंतवणूक यावी, यासाठी त्यांनी व्यावहारिक दृष्टीकोण अंगीकारला होता.

बुद्धदेव भट्टचार्य हे हाडाचे कम्युनिस्ट होते. पत्नी आणि मुलगा असा त्यांचा परिवार. मुख्यमंत्री असतानाही ते टू बीएचके फ्लॅटमध्ये राहायचे, कोलाकाता येथील कम्युनिस्ट कार्यकर्ते सिबू सिबेंदू सांगत होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या आठवणी सांगताना ते भारावून गेले होते. साध्या रहाणीमानावर त्यांचा विश्वास होता. ते अत्यंत प्रामाणिक राजकीय नेते होते, हे त्यांच्या पक्षाचेच लोक नव्हे तर त्यांचे विरोधकही मान्य करतात. प्रामाणिकपणा, साधी राहणीमान हे त्यांचे अंगभूत गुण होते. त्यामुळे सर्वचजण त्यांचा आदर करायचे. फुप्फुसांच्या आजारामुळं ते प्रदीर्घ काळापासून राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती, त्यातून ते वाचले होते. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांनी राज्य सरकारकडून कोणताही लाभ घेतला नव्हता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना काही सोयी-सुविधा देऊ केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या नाकारल्या होत्या. राजकारणातील योगदानासाठी त्यांना पद्मभूषण सन्मान जाहीर होता, मात्र तोही त्यांनी नम्रपणे नाकारला होता, असे सिबेंदू यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Buddhadeb Bhattacharjee
Keshubhai Patel : गुजरातेत केशुभाईंनी रचला भाजपचा पाया

असं सांगितलं जातं की, बुद्धदेव यांच्या पत्नी मीरा भट्टाचार्य या कोलकाता येथील ग्रंथालयात नोकरी करायच्या. पती मुख्यमंत्री असतानाही त्यांनीही कधीही बडेजाव मिरवला नाही. त्या आपल्या कामाच्या ठिकणी जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करायच्या. बुद्धदेव यांच्याप्रमाणेच मीरा भट्टाचार्य याही कधी व्हीआयपीसारख्या वागल्या नाहीत. अंत्यसंस्काराच्या वेळी बंदुकीची सलामीही पक्षाच्या नेत्यांनी नाकारली, कारण कोलकाता येथील पाम अव्हेन्यूमधील टू बीएचके अपार्टमेंटमध्ये अत्यंत साधेपणानं ते राहायचे. त्यांनी आयुष्यभर साधेपणा जपला, त्यांना दिखाऊपणा आवडत नव्हता. त्यामुळं त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीची सलामी न घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला. अंत्ययात्रेनंतर त्यांचं देहदान करण्यात आलं. त्यांनी नेत्रदानाचा संकल्प सोडला होता. त्यामुळं दोघांना दृष्टी मिळाली.

बुद्धदेव यांचा जन्म कोलकाता येथील एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा कृष्णचंद्र हे संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी पुरोहित दर्पण नावाची पुस्तिका लिहिली होती, ती पश्चिम बंगालमधील पुजाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. बुद्धदेव यांचे वडिल नेपालचंद्र हे पुरोहित बनले नाहीत. सरस्वती पुस्तकालय हे त्यांचं हिंदू धार्मिक साहित्यविक्रीचं दुकान होतं, ते त्यांनी चालवलं. नेपालचंद्र हे पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध कवी सुकांतो भट्टाचार्य यांचे चुलत बंधू होते. बुद्धदेव यांचं शिक्षण शैलेंद्र सरकार विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बंगाली साहित्यात बी.ए. ऑनर्स केलं.

Buddhadeb Bhattacharjee
Raj Thackeray : अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी

पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरीही केली होती. मीरा भट्टाचार्य यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मूल झाले. नंतर त्यांच्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया झाली असून, आता तो सुचेतन भट्टाचार्य या नावानं ओळखला जातो. मितभाषी असणाऱ्या बुद्धदेव यांनी कोलकाता (Kolkata) येथील टू बीएचके फ्लॅटमध्ये जीवन व्यतीत केले. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी याच दोन खोल्यांच्या फ्लॅमधून कामकाज पाहिलं होतं. बुद्धदेव यांचं कुटुंब पुजारी असलं तरी ते मात्र नास्तिक होते.

बुद्धदेव यांनी 1966 मध्ये राजकारणात (Politics) प्रवेश केला. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्राथमिक सदस्य बनले. 1968 मध्ये ते पक्षाची युवा शाखा डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशनचे अध्यक्ष बनले. ते 1981 पर्यंत या पदावर होते. याचदरम्यान ते पक्षाच्या राज्य समितीत गेले. 1977 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. काशीपूर-बेलगछिया मतदारसंघातून ते विजयी झाले. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. 1982 मध्ये याच मतदारसंघातून त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर पक्षाच्या केंद्रीय समितीत ते कायम निमंत्रित सदस्य बनले. पुढे ते सदस्यही बनले.

1987 मध्ये ते जादवपूर मतदारसंघातून विजयी झाले आणि मंत्रीही बनले. प्रशासनाची कामाची पद्धत, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्याशी मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांनी 1993 मध्ये मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. काही महिन्यांनंतर त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. ज्योती बसू यांच्या प्रकृती अस्वास्थामुळं बुद्धदेव यांना 1999 मध्ये उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं. ज्योती बसू यांनी नोव्हेंबर 2000 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडलं आणि बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री बनले. 2011 पर्यंत ते या पदावर राहिले.

पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाची सुरुवात बुद्धदेव भट्टाचार्य यांनी केली. राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी, तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या कार्यकाळात आयटी क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली होती. नंदीग्राममध्ये विशेष आर्थिक क्षेत्राच्या उभारणीसाठी 10 हजार एकर भूसंपादनाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. निदर्शनांना हिंसक वळण लागले. माओवाद्यांच्या नेतृत्वाखाली भूसंपादनाच्या विरोधात एकत्र आलेल्या आंदोलकांनी हिंसाचार सुरू केला होता. त्यामुळे पोलिसांनी निदर्शक शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. यात 14 जणांचा मृत्यू झाला. बुद्धदेव भट्टाचार्य मुख्यमंत्री होते. हे प्रकरण 2007 मधले. त्यानंतरच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये सत्तापरिवर्तन झाले. नंदीग्राम येथील गोळीबार सत्तापरिवर्तनाचे प्रतीक ठरले.

सर्वात स्वस्त कार अशी ओळख असलेल्या टाटा कंपनीच्या नॅनो कारच्या निर्मितीचा प्रकल्प सिंगूरमध्ये उभारण्यात येणार होता. तेथेही आताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली भूसंपादनाला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे तो प्रकल्प गुजरातेत गेला. या भूसंपादनावरूनही मोठं वादंग झालं होतं. प्रकल्प गुजरातला गेल्यामुळं पश्चिम बंगालनं गुंतवणुकीची मोठी संधी गमावली होती.

पश्चिम बंगालमधील बुद्धीजिवी, लेखक, कवी, चित्रपट आणि नाट्य कलावंतांमध्ये बुद्धदेव प्रचंड लोकप्रिय होते. बुद्धदेव या लोकांना नेहमी प्रोत्साहन देत असत. नंदीग्राम गोळीबारानंतर मात्र यातील बहुतांश लोकांनी बुद्धदेव यांच्यावर टीका केली होती. बुद्धदेव यांचे पोलिस गरीब शेतकर्‍यांवर गोळीबार कसा करू शकतात, असं महाविद्यालयीन जीवनातील त्यांच्या वर्गमित्र, अभिनेत्री अपर्णा सेन म्हणाल्या होत्या. लेखिका महाश्वेतादेवी, नाट्यकलांवत साऊली मित्रा यांनीही या प्रकरणी त्यांच्यावर टीका केली होती.

त्यानंतर 2011 च्या विधानसभा निवडणुकीत बुद्धदेव भट्टाचार्य यांचं सरकार गेलं. जादवपूर मतदारसंघातून ते स्वतःही पराभूत झाले. तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उदय झाला. या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 294 पैकी केवळ 62 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरच्या निवडणुकींमध्ये कम्युनिष्टांची आणखी दुर्दशा होत गेली.

Buddhadeb Bhattacharjee
Bangaru laxman : असा उघड झाला होता राजकारणातील निलाजरेपणा...

बुद्धदेव भट्टाचार्य हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील शेवटचे 'भद्रलोक' ठरले. सज्जन किंवा उत्तम व्यक्ती असा भद्रलोक या शब्दाचा अर्थ आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये या शब्दाचा वापर सुरू करण्यात आला होता, असं सांगितलं जातं. बुद्धदेव यांच्या निधनानं डाव्या विचारसरणीच्या राजकारणाचाही एक अध्याय संपला. ते मार्क्सवादी कमी आणि बंगाली अधिक वाटायचे. त्यांचा पेहेराव आणि संवादशैलीमुळे त्यांचे सहकारीही त्यांना भद्रलोक म्हणत. आर्थिक उदारीकरणाची धोरणं लागू करणं, भांडवलशाहीसोबत ताळमेळ बसवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे काहीजण त्यांना बंगाली गोर्बाचेव्ह म्हणत असत, अशीही आठवण सिबेंदू यांनी सांगितली.

राजकारणातील योगदानासाठी बुद्धदेव भट्टाचार्य यांना 2022 मध्ये पद्मभूषण सन्मान जाहीर करण्यात आला होता. मात्र त्यांनी त्यासाठी नकार दिला. पद्मभूषण पुरस्काराबाबत मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. याबाबत मला आधी माहिती देण्यात आली नाही, मला पद्मभूषण देण्याची घोषणा झाली असेल तर तो स्वीकारण्यासाठी मी नकार देत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. सामान्य लोकांच्या प्रगतीसाठी आमचा पक्ष काम करतो, पुरस्कार, मान-सन्मान स्वीकारण्यासाठी नाही, अशी प्रतिक्रिया नंतर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षानं व्यक्त केली होती.

बुद्धदेव यांना चित्रपट पाहण्याचा छंद होता. थिएटर, चित्रपट, संगीत या आवडीच्या क्षेत्रांत त्यांचा लीलया वावर असायचा. असं सांगितलं जातं की, बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत बुद्धदेव भट्टाचार्य यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. बांगलादेशातून कोलकाताला जाणाऱ्या आपल्या निकटवर्तीयांच्या हाती त्या बुद्धदेव यांच्यासाठी चवदार मासे पाठवत असत. बुद्धदेव यांच्या निधनाने डाव्या विचारसरणीच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री असूनही बडेजाव न मिरवणारे, शासकिय सोयी-सुविधांचा लाभ न घेणारे बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासारखे राजकीय नेते आता होणे नाही, असं म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com