Keshubhai Patel : गुजरातेत केशुभाईंनी रचला भाजपचा पाया

Sarkarnama Podcast : गुजरातमध्ये भाजपचा पाया कोणी रचला, असा प्रश्न पडला की उत्तरा दाखल ढोबळमानाने सर्वात आधी जे नाव समोर येते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. पण असे म्हणताना थोडी घाई होईल. गुजरातेत भाजपचा पाया रचला तो केशुभाई पटेल यांनी.
Keshubhai Patel is the Chief Minister of Gujarat in 1995 and again from 1998 to 2001.
Keshubhai PatelSarkarnama
Published on
Updated on

गुजरातमध्ये भाजप अत्यंत मजबूत स्थितीत आहे. गावखेड्यापर्यंत या पक्षाचं संघटन रुजलेलं आहे. गेल्या जवळपास तीन दशकांपासून या राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवता आलेली नाही. हे कुणामुळे झालं असेल? असा प्रश्न पडला की उत्तरा दाखल ढोबळमानाने सर्वात आधी जे नाव समोर येते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे. पण असे म्हणताना थोडी घाई होईल. गुजरातेत भाजपचा पाया रचला तो केशुभाई पटेल यांनी. गुजरातेत 1995 मध्ये भाजपला पहिल्यांदाच बहुमत मिळाले आणि केशुभाई पटेल मुख्यमंत्री बनले. केशुभाई दोनवेळा मुख्यमंत्री बनले, मात्र त्यांना एकदाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

केशुभाई यांनी गुजरातमधील भाजप नेत्यांची एक पिढी तयार केली. त्यांना संधी दिली, पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अशा नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचाही समावेश होतो. मोदी हे केशुभाईंना आपले राजकीय गुरू मानतात. केशुभाई 1995 मध्ये मुख्यमंत्री बनले त्यावेळी त्यांची राजकीय कारकीर्द शिखरावर होती. मात्र पक्षात बंडखोरी झाल्यामुळे त्यांच्या राजकीय कार्कीर्दीला ब्रेक लागला. 1998 ते 2001 या दरम्यान ते दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले, मात्र यावेळीही त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांना बाजूला सारून नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रि‍पदी बसवण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी आणि गुजरात भाजपनेही मागे वळून पाहिलेले नाही.

केशुबाई यांचा जन्म 24 जुलै 1928 रोजी जुनागढ जिल्ह्यातील विसावदार या गावात लेवा पाटीदार कुटुंबात झाला. राजकोट येथील मोहनदास गांधी शाळेत त्यांचं शिक्षण झालं. जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात झाली. देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर केशुभाई यांनी गुजरातेत पक्षाचा पाया रचण्याचं काम सुरू केलं. त्या काळात सर्वत्र काँग्रेसचा बोलबाला होता. अशा परिस्थितीत नवीन पक्ष, नवीन विचारधारेशी लोकांना जोडण्याचे काम तितकं सोपं नव्हतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे त्यांच्याविरोधात लोकांमध्ये मोठी नाराजी होती. केशुभाई पटेल यांना पक्ष, विचारधारा रुजवण्यासाठी जणू ही एक संधीच मिळाली होती. दिवसरात्र एक करून त्यांनी तरुणांना भाजपशी जोडण्याचं काम केलं.

आणीबाणीच्या काळात अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्यात केशुभाई पटेल यांचाही समावेश होता. राजकोट विधानसभा मतदारसंघातून (Vidhansabha Election) 1977 मध्ये ते पहिल्यांदा विजयी झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली 1995 मध्ये पहिल्यांदाच गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळालं. मात्र पक्षात बंडखोरी झाली. भाजपचे अन्य एक दिग्गज नेते शंकरसिंह वाघेला यांनी केशुभाईंच्या विरोधात दंड थोपटले. भाजपला 1998 मध्ये पुन्हा बहुमत मिळालं आणि केशुभाई दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात गुजरातला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. चक्रि‍वादळामुळे 1998 मध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. 1999-2000 मध्ये राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण झालं होतं. 2001 मधील प्रलयंकारी भूकंपामुळे गुजरात हादरून गेला होता. त्यात हजारो लांकाचा मृत्यू झाला होता.

Keshubhai Patel is the Chief Minister of Gujarat in 1995 and again from 1998 to 2001.
Krishna Desai News : कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या अन् शिवसेनेवर न सिद्ध झालेले आरोप

त्यानंतर भाजपच्या (BJP) केंद्रीय नेतृत्वानं गुजरातेत खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. केशुभाईंना बाजूला सारून नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. केशुभाई भाजपमध्ये बाजूला पडले, त्यांची उपेक्षा सुरू झाली. त्यामुळे 2012 मध्ये ते भाजपमधून बाहेर पडले. त्यांनी गुजरात परिवर्तन पक्षाची स्थापना केली, मात्र त्यांच्या पक्षाला विधानसभेच्या केवळ दोन जागा मिळाल्या. अखेर 2014 मध्ये त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला. श्री सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.

केशुभाई पटेल यांचं कुटुंब मूळचे खेडा जिल्ह्यातील नडियाद तालुक्यातील वासो गावाचं. पटेल कुटुंबीय सौराष्ट्रात स्थलांतरित झाले आणि राजकोट येथे त्यांनी पिठाची गिरणी सुरू केली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आणि केशुभाई यांचा परिचय 55 वर्षांचा होता. उदरनिर्वाह भागवण्यासाठी पटेल कुटुंबानं राजकोटच्या हातीखाना भागात पिठाची गिरणी सुरू केली होती, असं वाघेला एकदा म्हणाले होते. केशुभाई हे स्वयंभू नेते होते आणि त्यांनी गुजरातेत शून्यातून भाजपची उभारणी केली, असेही वाघेला त्यावेळी म्हणाले होते.

अमरेली आणि जुनागढ येथील बहुसंख्य पटेलांना देसाई म्हणून ओळखले जायचे, कारण ते शेतकऱ्यांकडून सरकारचा कर वसूल करण्याचे काम करत असत. शालेय जीवनात केशुभाई यांच्या नावासमोर देसाई लिहिलेलं असायचं. जुनागढ येथील भाजपचे माजी खासदार सूर्यकांत आचार्य यांनी पहिल्यांदा केशुभाई पटेल असा उल्लेख केला. त्यानंतर ते केशुभाई देसाईंचे केशुभाई पटेल झाले. ही आठवण केशुभाई यांनीच एका दैनिकाशी बोलताना 2015 मध्ये सांगितली होती.

केशुभाईंनी सुरुवातीला राजकोट नगरपालिका, राजकोट महापालिकेची निवडणूक लढवली. 1972 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. राजकोट मतदारसंघातून 1975 मध्ये ते विजयी झाले. बाबूभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील जनता मोर्चा सरकारमध्ये 1978-1980 दरम्यान त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले. चिमणभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी 1990 मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी, आणीबाणीनंतर 1977 मध्ये राजकोट लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. नंतर राजीनामा देऊन ते बाबूभाई पटेल यांच्या सरकारमध्ये मंत्री बनले होते. केशुभाई हे जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक.

Keshubhai Patel is the Chief Minister of Gujarat in 1995 and again from 1998 to 2001.
Bangaru laxman : असा उघड झाला होता राजकारणातील निलाजरेपणा...

केशुभाईंच्या अंगी कमालीचे धाडसही होते. अहमदाबाद येथील कुख्यात डॉन लतीफ याच्या पोपटियावाड या भागात जाण्यासाठी पोलिसही धजावत नसत, इतकी त्याची दहशत होती. केशुभाईंनी ही दहशत मोडित काढली. लतीफच्या दहशतीमुळे अन्यधर्मीय नागरिकही त्या भागात जायला घाबरत. ही दहशत मोडू काढण्यासाठी केशुभाई यांच्या नेतृत्वाखाली पोपटियावाड भागात भाजपने लोकदरबार आयोजित केला होता. डॉन लतीफला काँग्रेसचे पाठबळ आहे, असा प्रचार भाजपने विधानसभा निवडणुकीत केला होता. त्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता.

केशुभाई पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले 1995 मध्ये. त्यावेळी त्यांचे सहकारी शंकरसिंह वाघेला यांच्या बंडखोरीमुळे वर्षभराच्या आतच त्यांचे पद गेले. दुसऱ्यांदा ते 1998 मध्ये मुख्यमंत्री बनले, मात्र यावेळीही ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. राष्ट्रीय स्वंयसेवक संघात त्यादरम्यान नरेंद्र मोदी यांचा वेगाने उदय सुरू झाला होता. राजकीय शक्ती प्राप्त करण्यासाठी मोदी यांना आरएसएसमधून बाहेर पडून भाजपमध्ये जायचे होते. 1987 मध्ये ते गुजरात भाजपचे संघटन सचिव बनले, त्यावेळी या प्रक्रियेची सुरुवात झाली होती. संघटन सचिव हे पद भाजप आणि आरएसएस यांच्यातील दुवा असते. मोदी यांनी या पदावर आठ वर्षे काम पाहिले. भाजपचा जनाधार वेगाने वाढत होता. 1985 मध्ये गुजरात विधानसभेत भाजपचे 11 आमदार होते, दहा वर्षांनंतर ते वाढून 121 झाले. गुजरातेत केशुभाई आणि शंकरसिंह वाघेला हे भाजपचे दोन दिग्गज नेते होते. तिसरे दिग्गज नेते म्हणून नरेंद्र मोदी समोर आले होते.

Keshubhai Patel is the Chief Minister of Gujarat in 1995 and again from 1998 to 2001.
Raj Thackeray : अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी

गुजरातला धार्मिक दंगलींचा इतिहास आहे. त्याचदरम्यान तीन दंगली झाल्या होत्या. प्रत्येक वेळी मृतांचा आकडा वाढलेलाच होता. राज्यातील वाढत असलेल्या या धार्मिक तणावाचा फायदा अर्थातच भाजपला झाला. हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने पुरेपूर प्रयत्न केले. हिंदू राष्ट्रवादाचा उदय होत गेला आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांची शक्ती वाढत गेली. त्यावेळी गुजरातेत भाजप विरोधी पक्ष होता. एकता यात्रेत मोदींना आपल्या नेतृत्वगुणांची झलक दाखवली होती. यात्रेहून परतल्यानंतर त्यांनी दुप्पट वेगाने काम सुरू केलं होतं. मोदी यांनी पक्षसंघटनेवर पकड निर्माण केली आणि मुख्यमंत्रि‍पदाचा दुसरा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच केशुभाईंना बाजूला होऊन मोदींसाठी मार्ग मोकळा करावा लागला होता.

गुजरातेत भाजपची पायाभरणी करण्यात सर्वात मोठा वाटा केशुभाई पटेल यांचा होता, हे कोणालाही नाकारता येणार नाही. रामजन्मभूमी आंदोलनानंतर 1995 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने केशुभाईंचा चेहरा समोर केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसचा सफाया झाला आणि त्यावेळेपासून पटेल समुदाय भाजपकडे आकर्षित झाला. त्यावेळेपासून गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता आहे. केशुभाई जमिनीवरचे नेते होते, लोकनेते होते. त्यांची कारकीर्द बहरली ती रस्त्यावर उतरून लोकांत मिसळल्यामुळे, त्यांचे प्रश्न समजून घेतल्यामुळे.

कोरोना महामारीनं जगभरासह भारतातही हाहाःकार माजवला होता. या महामारीनं अनेकांचे आप्त हिरावून घेतले. अनेक दिग्गजांचा मृत्यू झाला. गुजरातेत भाजपचा पाया भक्कम रचणारे केशुभाई पटेल यांचंही कोरोनामुळं 29 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय 92 वर्षे होतं. लोकसभेवर एकदा, गुजरात विधानसभेवर सहावेळा निवडून गेलेले आणि दोनवेळा मुख्यमंत्री बनलेले केशुभाई पटेल हे लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले होते.

केशुभाई यांना सहा अपत्ये, त्यापैकी पाच मुलगे आणि एक मुलगी. गांधीनगर येथील त्यांच्या घरात 2006 मध्ये शॉर्टसर्किटने आग लागली होती. त्याच त्यांच्या पत्नी लीला पटेल यांचा मृत्यू झाला. त्यांचे पुत्र प्रवीण यांचा 2017 मध्ये मृत्यू झाला. अन्य एका मुलाचा 2019 मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या एका मुलाने संन्यास घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com