
वैद्यकीय व्यवसायाकडं जगभरात आदरानं पाहिलं जातं. असंही म्हटलं जातं की, डॉक्टर हे पृथ्वीतलावरील देव आहेत. भारतात दरवर्षी 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. ज्यांच्या सन्मानार्थ डॉक्टर्स डे साजरा केला जातो, ते अर्थातच एक उत्कृष्ट डॉक्टर तर होतेच, शिवाय संवेदनशील राजकीय नेतेही होते. आधुनिक पश्चिम बंगालची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली होती. होय, डॉ. बिधान चंद्र रॉय असं त्यांचं नाव. ते काँग्रेसचे नेते होते. पश्चिम बंगाल प्रांताचे दुसरे आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. सलग 12 वर्षे ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी राहिले. 'कार्डियॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया'चे पहिले अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं. आपल्या उत्पन्नातील बहुतांश वाटा ते सामाजिक कार्यासाठी दान करत असत.
'जे कोणतेही काम तुमच्या वाट्याला येईल, ते पूर्ण ताकदीने करा, झोकून देऊन करा...' असं एक वाक्य बिधान चंद्र रॉय यांच्या वाचनात आलं होतं. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी त्यांना कोलकाता येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. तेथे एके ठिकाणी हे वाक्य लिहिलेलं होतं. रॉय यांच्या मनावर ते विधान कोरलं गेल. त्यांनी पुढं आयुष्यभर त्याला अनुसरूनच काम केलं. रुग्णसेवा असो की राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा असो, त्यांना पूर्ण ताकदीनिशी स्वतःला झोकून देऊन काम केलं. ते महात्मा गांधीजींचे मित्र होते, तसेच त्यांचे खासगी डॉक्टरही होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरी हेही डॉ. रॉय यांचे आरोग्यविषयक सल्ले मानत असत.
बिधान चंद्र रॉय यांच्या जन्म 1 जुलै 1882 रोजी बिहारमधील पाटण्याच्या बांकीपूर येथे एका बंगाली कायस्थ कुटुंबात झाला. पाटण्याजवळचा हा भाग त्यावेळी बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये होता. त्यांचे वडील प्रकाश चंद्र रॉय हे बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक होते. त्यांच्या मातुःश्री अघोरकामिनी देवी या गृहिणी, सामाजिक कार्यकर्त्या होत्या. पाच भावंडांमध्ये बिधान चंद्र हे सर्वात लहान. रॉय कुटुंबीय ब्राह्मो समाजाचे पुरस्कर्ते होते. प्रकाश चंद्र रॉय हे महाराजा प्रदपादित्य यांचे वंशज, पण वारसाहक्कानं त्यांना फार संपत्ती मिळाली नाही. त्यांना चांगला पगार मिळायचा. त्यातून आपल्या अपत्यांसह अन्य अनेक गरजू मुलांच्या शिक्षणाची, पालनपोषणाचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली.
बिधान चंद्र रॉय यांचं इंटरमिजिएटचं शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झालं. पाटणा महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली. गणितात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बंगाल इंजिनीअरिंग कॉलेज आणि कलकत्ता मेडिकल कॉलेज या दोन्ही ठिकाणी पुढील शिक्षणासाठी अर्ज दाखल केले. रॉय हे हुशार होते, त्यामुळं दोन्ही ठिकाणी प्रवेशासाठी ते पात्र ठरले. त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाला पसंती दिली. जून 1901 मध्ये त्यांचं वैद्यकीय शिक्षण सुरू झालं. त्यांचा स्वभाव परोपकारी होता. अनोळखी लोकांनाही ते मदत करत असत.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केल्यानंतर बिधान चंद्र रॉय शासकीय सेवेत दाखल झाले. लंडनमधील बार्थोलोमिस हॉस्पिटलमध्ये त्यांना पुढील वैद्यकीय शिक्षण घ्यायचं होतं. त्यासाठी फेब्रुवारी 1909 मध्ये ते इंग्लंडला गेले. या हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळणे तितकं सोपं नव्हतं. डीननं त्यांना जवळपास दीड महिना ताटकळत ठेवलं, जेणेकरून ते कंटाळून परत जावेत, मात्र रॉय यांचा निर्धार पक्का होता. प्रवेशासाठी त्यांनी डीनची 30 वेळा भेट घेतली. अखेर त्यांना प्रवेश मिळाला. तेथे 2 वर्षं 3 महिन्यांत त्यांनी एआरसीपी आणि एफआरसीएस या दोन्ही पदव्या प्राप्त केल्या. ते 1911 मध्ये भारतात परतले आणि कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कॅम्पबेल मेडिकल कॉलेज आणि कारमाइकल मेडिकल कॉलेजमध्येही अध्यापनाचं काम केलं.
रुग्णसेवा करताना त्यांच्या सामाजिक जाणीवा जागृत झाल्या. लोक मन आणि शरीरानं तंदुरुस्त झाल्याशिवाय स्वराज्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही, असं डॉ. रॉय यांना वाटत असत. त्यामुळंच त्यांनी पुढं वैद्यकीय शिक्षण आणि उपचारांसाठी मोठं आर्थिक योगदान दिलं. जादवपूर टीबी इन्स्टिट्यूट, आरजी कर मेडिकल कॉलेज, चित्तरंजन सेवा सदन, चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल, व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशन आणि कमला नेहरू मेमोरियल हॉस्पिटलची उभारणी केली. वैद्यकीय सेवा देत असतानाच त्यांनी काही वेळा 'ब्रदर' बणून रुग्णांची सेवा केली. 1948 ते 1950 पर्यंत ते कार्डियॉलाजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते.
डॉ. रॉय यांनी 1925 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 1928 मध्ये त्यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर निवड झाली. त्यानंतर ते महात्मा गांधीजींचे अत्यंत निकवर्तीय मित्र बनले. 1929 मध्ये सविनय कायदेभंग चळवळीचं त्यांनी बंगालमध्ये नेतृत्व केलं. मोतीलाल नेहरू यांनी त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीवर घेतलं, मात्र इंग्रजांनी या कमिटीला बेकायदेशीर ठरवून रॉय यांच्यासह अन्य सदस्यांना 26 ऑगस्ट 1930 रोजी अटक केली. त्यांना अलीपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं. भारत छोडो आंदोलनादरम्यान 1942 मध्ये गांधीजी आजारी पडले, त्यावेळी डॉ. रॉय यांनीच त्यांच्यावर उपचार केले होते.
दांडी यात्रेदरम्यान कलकत्ता महापालिकेच्या अनेक नगरसेवकांना कारागृहात डांबण्यात आलं होतं. काँग्रेसनं डॉ. रॉय यांना बाहेर राहून महापालिकेचं कामकाज पाहण्याची सूचना केली. त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. त्यामुळं 1931 मध्ये त्यांची कोलकात्याच्या महापौरपदी निवड झाली. ते 1933 पर्यंत या पदावर राहिले. मोफत शिक्षण, मोफत वैद्यकीय उपचार, रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्ती, पाणीपुरवठा आदी योजनांसह विकासकामे युद्धपातळीर करण्यात आली, रुग्णालये आणि धर्मादाय औषध दुकानांसाठी निधी पुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था डॉ. रॉय यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात उभी केली. 1942 मध्ये ते कलकत्ता विद्यापीठीचे कुलगुरू बनले.
काँग्रेसनं पुढं 1948 मध्ये पश्चिम बंगाल प्रांताच्या पंतप्रधानपदासाठी डॉ. राय यांचं नाव पुढे केलं, मात्र ते यासाठी तयार नव्हते. रुग्णसेवा करण्याचीच त्यांची इच्छा होती. नंतर महात्मा गांधीजींच्या सल्ल्यानुसार त्यांनी 23 जानेवारी 1948 रोजी ते पद स्वीकारलं. त्यावेळी बंगालमध्ये विविध समस्यांनी डोकं वर काढलं होतं. जातीय हिंसाचार, अन्नधान्याची कमतरता, बेरोजगारी वाढली होती. पाकिस्तानच्या निर्मितीमुळं शरणागतांचे लोंढे बंगालमध्ये येत होते. एकजुटीनं काम केलं तर आपण या सर्व समस्यांवर मात करून समृद्ध पश्चिम बंगालची पायाभरणी करू, असा विश्वास डॉ. रॉय यांनी लोकांना दिला होता. काँग्रेसचे प्रफुल्ल चंद्र घोष यांच्यानंतर या पदावर काम करणारे डॉ. रॉय हे दुसरेच होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेची अंलबजावणी सुरू झाली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. रॉय पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 1952 आणि 1957 ची विधानसभा निवडणूक जिंकली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उच्च तांत्रिक शिक्षण संस्थांच्या उभारणीची तयारी सुरू झाली होती. देशात तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांची उभारणी करण्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्योजक नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली 22 सदस्यांची समिती स्थापन केली होती.
डॉ. रॉय यांना पंडित नेहरू यांच्याकडे सतत पाठपुरावा करून एक संस्था पश्चिम बंगालच्या पदारत पाडून घेतली, ती म्हणजे खरगपूर आयआयटी. डॉ. रॉय हे खरगपूर आयआयटीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे पहिले अध्यक्ष बनले. पश्चिम बंगालच्या विभाजनानंतर बिधाननगर, कल्याणी आणि दुर्गापूर या शहरांवर विपरित परिणाम झाला होता. या शहरांची अर्थव्यवस्था नष्ट झाली होती. पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेत या शहरांचं मोठं योगदान होतं. ही बाब लक्षात घेऊन डॉ. रॉय यांनी या शहरांची नव्यानं उभारणी केली. पश्चिम बंगालच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या शहरांचं पुनरुज्जीवन करण्याचं श्रेय डॉ. रॉय यांचंच. अशोकनगर आणि हावडा या शहरांची स्थापनाही त्यांनीच केली.
डॉ. रॉय यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला. बंगालचं विभाजन करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी ते कलकत्ता विद्यापीठात शिक्षण घेत होते. शिक्षण सुरू असताना त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला नव्हता. आधी शिक्षण पूर्ण कररण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावंर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. याचदरम्यान त्यांनी गांधीजींचे खासगी डॉक्टर म्हणून काम केलं. गांधीजींनी 1933 मध्ये आत्मशुद्धी उपोषण केलं. त्यादरम्यान त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता.
डॉ. रॉय यांनी त्यांची भेट घेऊन औषधोपचार घेण्याची विनंती केली. गांधीजी त्यांना म्हणाले होते, मी तुमची औषधे का घ्यावीत? तुम्ही काय देशातील 40 कोटी लोकांवर मोफत उपचार केले आहेत का? त्यावर डॉ. रॉय म्हणाले होते, नाही, मी सर्व रुग्णांवर मोफत उपचार करत नाही. मी येथे मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर नव्हे तर, देशातील 40 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गांधीजींवर उपचार करण्यासाठी आलो आहे. गांधाजींना अर्थातच हे उत्तर भावलं होत. ते डॉ. रॉय यांना मिश्किलपणे म्हणाले होते, तुम्ही एखाद्या थर्ड क्लास वकिलाप्रमाणे माझ्याशी वाद घालत आहात.
डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्याशी संबंधित असे अनेक किस्से आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू ज्या डॉक्टरांचा आरोग्यविषयक प्रत्येक सल्ला मानायचे, त्याचे काटेकोर पालन करायचे, त्यात डॉ. रॉय यांचा समावेश होता. याचा उल्लेख खुद्द पंडित नेहरू यांनी 1962 मध्ये 'वॉशिंग्टन टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. नेहरू एकदा खूप आजारी पडले होते. त्यांच्यावर उपचारांसाठी डॉक्टरांचे पॅनेल तयार करण्यात आले. त्यात डॉ. रॉय यांचा समावेश होता. याचा उल्लेख करत 'वॉशिंग्टन टाइम्स'नं लिहिलं होतं, की रॉय इतके मोठे डॉक्टर आहेत की पंडित नेहरू त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचे पालन करतात.
अमेरिकेत असताना डॉ. रॉय यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला. 1947 मधील ही घटना आहे. हॉटेलमध्ये त्यांना सेवा देण्यास नकार देण्यात आला. जेवण करण्यासाठी ते आपल्या पाच मित्रांसह गेले होते. हॉटेलमध्ये त्यांना सेवा दिला जाणार नाही. हवं असेल तर खाद्यपदार्थ घेऊन ते बाहेर जाऊ शकतात, असं हॉटेलच्या व्यावस्थापकानं त्यांना सांगितलं होत. त्यानंतर डॉ. रॉय आणि त्यांचे मित्र तेथून बाहेर पडले होते. हा घटनाक्रम 'न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाला होता.
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना अडचणीच्या काळात डॉ. रॉय यांनी मदत केली होती. 'पथेर पांचाली' या चित्रपटाची निर्मिती करताना त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या मातुःश्रींनी त्यांची डॉ. रॉय यांच्याशी ओळख करून दिली. डॉ. रॉय त्यावेळी मुख्यमंत्री होते. गरीबीशी दोन हात करणारा देश, समाज अशी या चित्रपटाची पटकथा होती. डॉ. रॉय प्रभावित झाले आणि त्यांनी या प्रकल्पासाठी सरकारकडून आर्थिक मदत देऊ केली. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर पंडित नेहरू यांच्यासाठी त्याचा खास शो त्यांनी आयोजित केला होता.
आरोग्य क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील योगदानामुळं डॉ. बिधान चंद्र रॉय यांना 4 फेब्रुवारी 1961 रोजी 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं. त्यांच निधन 1 जुलै 1962 रोजी झालं. योगायोग असा की त्यांचा जन्मही 1 जुलै रोजीच झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर मातुःश्री अघोरकामिनी देवी यांच्या नावानं त्यांच्या निवासस्थानात रुग्णालय सुरू करण्यात आलं. डॉ. रॉय हे अखेरपर्यंत अविवाहित राहिले. त्यांच्या स्मरणार्थ इंडियन मेडिकल कौन्सिलनं 1962 मध्ये बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केली. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार 1973 पासून दरवर्षी दिला जातो. वैद्यकीय क्षेत्रासह कला, विज्ञान, तत्त्वज्ञान या क्षेत्रातील उत्तुंग कामगीरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.
डॉ. रॉय यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेलं योगदान अतुलनीय असंच आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय स्तरावर डॉक्टर्स डे साजरा केला जातो. रुग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. याच दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते बी. सी. रॉय राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो. डॉ. रॉय यांच्या सन्मानार्थ 1967 मध्ये नवी दिल्लीत चिल्ड्रन बुक ट्रस्टमध्ये डॉ. बी. सी. रॉय मेमोरियल लायब्ररी आणि मुलांसाठी रिडींग रूम सुरू करण्यात आले. आधुनिक पश्चिम बंगालचे निर्माते म्हणून डॉ. रॉय यांच्या योगदानाची आजही आठवण केली जाते.