
स्थळ होतं बिहारची राजधानी पाटण्यातील एका हॉटेल आणि प्रसंग होता 2010 मधील बिहार विधानसभा निवडणूक. निवडणुकीसंदर्भात यूपीएची प्रेस कॉन्फरन्स होती. शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. प्रचारात असल्याने लालूप्रसाद यादव अनुपस्थित होते. पत्रकार परिषदेच एका पत्रकारानं लालूप्रसाद यादव यांच्याबाबत विषमतामूलक विधान केलं. त्यामुळं शरद पवार प्रचंड रागावले होते. त्यांनी पत्रकाराला सुनावलं आणि बाहेर जाण्यास सांगितलं होतं. लालूप्रसाद यांचं राजकारण समजून घेताना हा किस्सा लक्षात ठेवायला हवा.
बिहारचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे देशभरातील घराघरांत पोहोचलेलं राजकीय व्यक्तीमत्व आहे. सरंजामी समाजाच्या बिहारमध्ये त्यांनी मागास जातींना, गरीबांना आवाज मिळवून दिला, त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. संसदेतील त्यांची भाषणं गाजली. मिश्किल शैलीतून विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचं अफलातून कसब त्यांच्याकडं आहे. भ्रष्टाचाराचे, घराणेशाहीचे आरोप झाले, कारागृहात जावं लागलं, तरीही त्यांची लोकप्रियता कायम आहे, बिहारच्या राजकारणात त्यांचं महत्व अबाधित आहे. लालूप्रसाद हे 1990 ते 1997 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते.
लालूप्रसाद यादव यांच्याबद्दल मतमतांतरं असू शकतात. तुम्ही त्यांचे कट्टर विरोधक, टीकाकार असू शकता. त्यांना जंगलराज आणि भ्रष्टाचाराचं प्रतीक म्हणू शकता, मात्र त्यांच्याकडं तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. हे मत आहे बिहारची राजधानी पाटणा येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'प्रभात खबर' या हिंदी दैनिकाचे संपादक अजय कुमार यांचं. अजय कुमार जे सांगताहेत त्यामागे मोठा अर्थ दडलेला आहे. लालूप्रसाद बिहारसह देशभरात प्रचंड लोकप्रिय आहेत, ते त्यांच्या खास शैलीमुळं.
बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील फुलवारिया गावात एका यादव परिवारात लालूप्रसाद यांचा 11 जून 1948 रोजी जन्म झाला. त्यांच्या मातुःश्रींचं नाव मरछिया देवी तर वडिलांचं नाव कुंदन राय. लालूप्रसाद यांना आठ भावंडं. त्यांच्या वडिलांकडं केवळ एक गुंठा शेती होती. त्यामुळं त्यांचं बालपण हलाखीत, संघर्षात गेलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना पोट भरून खायलाही मिळत नसे. धड कपडेही मिळायचे नाहीत. लहानपणी त्यांनी गुरं राखण्याचंही काम करावं लागलं होतं. ते खूप खोडकर होते. अशाच एका खोडीमुळे त्यांचं जीवन बदललं. एका व्यक्तीची पिशवी त्यांनी विहिरीत फेकून दिली होती. त्यामुळं त्या व्यक्तीनं प्रचंड गोंधळ घातला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी लालूप्रसाद यांना पाटण्याला पाठवण्याचा निर्णय घेतला.
लालूप्रसाद हे पाटणा येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाकडे आले. त्यांचे मोठे बंधू एका महाविद्यालयात शिपाई होते. लालूप्रसाद यांनी पाटणा विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर राज्यशास्त्रात एमए केलं. शिक्षण सुरू असताना त्यांचा विद्यार्थी चळवळीशी संबंध आला. पाटणा युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनचे सरटचिटणीस म्हणून 1970 मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. 1974 मध्ये बिहार आंदोलन आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनात ते सहभागी झाले. अनुसूचित जाती-जमातींचे अधिकार, हक्कांसाठी हे आंदोलन सुरू झालं होतं.
आंदोलनामदरम्यान ते सत्येंद्र नारायण सिन्हा यांच्या संपर्कात आले. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत छपरा मतदारसंघातून सिन्हा यांनी जनता पार्टीकडून लालूप्रसाद यांना उमेदवारी दिली. जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सिन्हा यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला. लालूप्रसाद विजयी झाले. त्यावेळी त्यांचं वय होतं 29 वर्षे. त्यावेळी ते सर्वात तरुण लोकसभा सदस्य होते. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून देशाला अनेक नेते मिळाले. लालूप्रसाद यादव हे त्यातील एक प्रमुख नाव.
आणीबाणीच्या दरम्यान लालूप्रसाद यांच्याबाबतीत एक धक्कादायक अफवा पसरली होती. तोपर्यंत ते राजकीय नेते म्हणून नावारूपाला आले होते. आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या आंदोलनात लालूप्रसाद यांचा सक्रिय सहभाग होता. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी लष्कराच्या जवानांनी त्यांना काही ठिकाणी बेम मारहाण केली होती. यात लालूप्रसाद यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आणि बिहारमध्ये एकच गोंधळ उडाला होता. नंतर लालूप्रसाद यांनी स्वतः समोर येऊन सुखरूप असल्याचं सांगितलं होतं.
देशात 1977 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच बिगरकाँग्रेस सरकार, म्हणजे जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं होतं. ते सरकार 1980 मध्ये कोसळले. त्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लालूप्रसाद यांचा पराभव झाला. त्यानंतर 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत बिहार विधानसभेत पोहोचले. 1985 मध्येही ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या निधनानंतर 1989 मध्ये ते विरोधी पक्षनेते बनले.
बिहारमध्ये 1990 च्या निवडणुकीत जनता दलाची सत्ता आली आणि लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री बनले. सलग पाच वर्षे ते या पदावर राहिले. मुला-मुलींनी शिक्षण घ्यावं, असा त्यांचा आग्रह राहायचा. 'पढो या मरो' अशी घोषणाच त्यांनी दिली होती. बालपणी त्यांना गुरं राखावी लागली होती. त्यामुळं मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी बिहारमध्ये गुराख्यांसाठी जवळपास दीडशे गुराखी शाळा सुरू केल्या होत्या. गुरे चरत असताना मुला-मुलींनी शिक्षण घ्यावं, अशी ती संकल्पना होती. शेतमजुरांची किमान मजुरी त्यांनी 16.50 रुपयांवरून 21.50 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. ताडी विक्रीवरील कर आणि उपकरही त्यांनी हटवले होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री बनल्यानंतरही जवळपास चार महिने लालूप्रसाद हे त्यांच्या बंधूंच्या शासकीय घरातच राहायला होते.
बिहारमध्ये 1990 च्या दशकात अस्पृश्यता, जातीभेद, विषमता शिखरावर होती. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री बनलेल्या लालूप्रसाद यांनी मागास जाती-जमातींना. पीडित, शोषितांना ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळं कुणी काहीही म्हटलं, त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी बिहारमधील मागास जाती-जमातींचे लोक मोठ्या संख्येनं लालूप्रसाद यांच्या पाठिशी असतात.
असं म्हटलं जातं की राजकारणात जाणाऱ्यांचे हात हात काळे होतच असतात. लालूप्रसाद यादव यांच्यासोबतही असंच घडलं. त्यांच्यावर चारा घोटाळ्याचा आरोप झाला. त्यामुळं 25 जुलै 1997 रोजी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री बनल्या. दिग्गज नेत्यांना डावलून त्यांनी पत्नीला मुख्यमंत्री बनवलं होतं. पक्षावर त्यांची पकड किती घट्ट होती, हे यावरून दिसून येतं. चारा घोटाळ्यात जामीनअर्ज फेटाळला गेल्यानंतर अटक होणार, मुख्यमंत्रिपद जाणार, हे निश्चित होतं. जनता दलाच्या अध्यक्षपदी कायम राहण्याची त्यांची इच्छा होती, मात्र ती पूर्ण झाली नव्हती. त्यामुळं त्यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली.
लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळा, कोषागार घोटाळ्यात कारागृहात जावं लागलं होतं. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. रेल्वेमंत्रिपदाची त्यांची कारकीर्द गाजली होती. त्यांच्या काळात प्रवासी भाडेवाढ न करताही रेल्वेला मोठा आर्थिक नफा झाला होता. लालूप्रसाद यांच्या कन्या मिसा भारती या लोकसभेच्या खासदार आहेत. त्यांचे पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री राहिले आहेत. अन्य एक पुत्र तेजप्रताप माजी मंत्री आहेत. देशाच्या राजकारणात आता घराणेशाही काही नवीन राहिलेली नाही. कोणताही पक्ष याला अपवाद राहिलेला नाही. मात्र घराणेशाहीवर टीका करताना काही ठरावीक राजकीय नेत्यांची नावं घेतली जातात. त्यात लालूप्रसाद यांच नाव हमखास असतं.
लालूप्रसाद यादव यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, या मताचा विस्तार करताना अजय कुमार म्हणतात, बिहारच्या राजकारणाचा विषय आला की तुम्हाला लालूप्रसाद यांची दखल घ्यावीच लागते. विरोधक, टीकाकार लालूप्रसाद यांची प्रतिमा अकुशल प्रशासक अशी करू शकतात, त्यांचं राजकारण म्हणजे मौजमस्ती, अशीही टिपण्णी करू शकतात, मात्र बिहारचा मागास समाज, बिहारमधील गरीब जनता मोठ्या संख्येनं त्यांच्यावर जीवापाड प्रेम करते. हे लोक त्यांचा आदर करतात. ताजीच घटना आहे, आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी पाटणा येथे येऊन लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. पत्रकारांनी याबाबत विचारलं असता, आरिफ मोहम्मद खान म्हणाले, की गेल्या पाच दशकांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. एकाच वैचारिक प्रवाहातून आम्ही राजकारणात आलो आहोत. लालूप्रसाद माझ्यासाठी अस्पृश्य नाहीत.
भ्रष्टाचाराचे विविध आरोप झाले, आता लालूप्रसाद यादव राजकराणात फारसे सक्रिय नाहीत. तरीही त्यांचं महत्व टिकून आहे, ते का टिकून आहे, या प्रश्नाचं उत्तर अनेकांना सापडलेलं नाही. आजारपणामुळं लालूप्रसाद सध्या घरातच असतात. ते फारसे बाहेर पडत नाहीत. खरंतर, त्यांचं महत्व टिकून असण्यामागे बिहारचा समाज आहे, ज्यात विविध प्रकारचे भेद, उच्च-नीच ही भावना घट्ट रुजलेली आहे. जाती-जातींमध्ये मोठी दरी तर आहेच, जातीच्या आधारावर एखाद्याचा अपमान करण्याचे विशेषाधिकार काही खास जातींना प्राप्त झाले आहेत. संसाधनांचा 95 टक्के वाटा अशा खास जातींकडेच राहिला आहे. बिहारचा समाज सरंजामी मानसिकतेचा आहे. सर्व क्षेत्रांत विकास झालेला असला तरी सरंजामदारीची पाळंमुळं अजूनही घट्ट रुजलेली आहेत, ती नष्ट झालेली नाहीत, अजय कुमार सांगत होते.
अशा परिस्थितीत 1990 मध्ये लालूप्रसाद यांच्याकडं बिहारची सत्ता आली. ते मुख्यमंत्री बनले. जातीभेद, टोकाच्या विषमतेमुळं निर्माण झालेल्या गहिऱ्या सामाजिक अतंर्विरोधाला त्यांनी प्रखर आवाज मिळवून दिला. मागास जातींमध्ये त्यांनी आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी मंडल आयोगाचं जाहीर समर्थन केलं. राम रथयात्रा काढलेले भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांना त्यांनी अटक केली. या घटनांनंतर ते मुस्लिमांसह मागास वर्गाचे 'चॅम्पियन' बनले. मागास जातींच्या एकजुटीची तटबंदीच त्यांच्यामागं उभी राहिली. मागास जातींच्या या एकजुटीनं लालूप्रसाद यांना मजबूत नेता बनवलं. बिहारच्या राजकीय इतिहासात लालूप्रसाद यादव यांना मिळालं तसं समर्थन अन्य कोणत्याही नेत्याला मिळालेलं नाही. भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांनाही असं समर्थन मिळालं नव्हतं. विशेष म्हणजे, कर्पूरी ठाकूर यांनी बिहारचे मुख्यमंत्री बनल्यानंतर 1977 मध्ये मागास जातींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केलं होतं. या आरक्षणाला उच्च जातींनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळं कर्पूरी ठाकूर यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं, असं अजय कुमार म्हणतात.
अजय कुमार पुढं सांगतात, सामाजिक पातळीवर असं मोठं समर्थन मिळाल्यानंतरही लालूप्रसाद यादव यांना राजकारणात आपली वेगळी रेष ओढता आली नाही. चारा घोटाळ्यात त्यांना शिक्षा झाली. त्यांना कारागृहात जावं लागलं. कारागृहात गेल्यानंतरही सत्तेच्या चाव्या आपल्याच हातात राहाव्यात, यासाठी त्यांनी आपल्या पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवलं. आता ते आपले मुलगे तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांना राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या एक कन्या मिसा भारती या खासदार आहेत. एकूणच काय तर घराणेशाहीतून ते बाहेर पडू शकलेले नाहीत. पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळी अशी रेष त्यांना ओढता आलेली नाही. अनेक समाशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की सामाजिक अंतर्विरोधांमुळे लालूप्रसाद यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत अडकवण्यात आलं आहे. ते मुख्यमंत्री बनले खरे, पण व्यवस्थेचा गाडा हाकणारे लोक अन्य जाती, समाजांचे होते. त्यांनीच लालूप्रसाद यादव यांना कारागृहात पोहोचवलं.
लालूंच्या व्यक्तीमत्वाची पारख कशी करायची? अनेकांना असं वाटतं की ते मिश्किल, थट्टामस्करी करणारे नेते आहेत. अनेक लोक त्यांना गरीबांचा, मागास समाजाचा आधारवड मानतात. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि भाजप त्यांना खलनायक म्हणतात, 2005 च्या आधी बिहार कसा होता, याची ते आठवण करून देतात. लोक रस्त्यावर येत नव्हते. विकासाएेवजी लूटमार आणि कायदा सुव्यवस्थेएेवजी गुन्हेगारांचा बोलबाला होता, अशा आरोपांनंतरही बिहारचे मतदार लालूप्रसाद यादव यांना नाकारू शकत नाहीत. अजय कुमार यांची ही मतं लालूप्रसाद यादव यांचं बिहारच्या राजकारणातील महत्व अधोरेखित करणारी आहेत.
सुरुवातीला सांगितलेला पाटण्यातील 2010 मधील पत्रकार परिषदेतील प्रकाराचा तुम्हाला काही संदर्भ लागतो का? जातीभेद, उच-नीच, विषमता अद्यापही तेथे कायम आहे. शरद पवार यांनी ज्या पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्यास सांगितलं होतं, त्यानं लालूप्रसाद यांच्याबद्दल केलेलं विधान द्वेषमूलक, भेदभाव, उच-नीच मानसिकता दर्शवणारं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.