Sarkarnama Podcast : ज्या काळात महिलांच्या डोक्यावरील पदर ढळायला भाग नव्हता, महिलांना घराबाहेर पडणे अवघड होते, त्या काळात म्हणजे 1962 मध्ये एक महिला गावाची सरपंच बनते. पुढे आमदार, खासदारकी आणि राज्याच्या राजकारणातील वजनदार नेत्या, अशी ओळख निर्माण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. होय, केशरकाकू क्षीरसागरच त्या! महिला स्वातंत्र्याच्या बाबतीत फारशी जागरूकता नसल्याच्या त्या काळात केशरकाकूंना गावाच्या सरपंच बनवण्याचे धाडस त्यांचे पती सोनाजीराव क्षीरसागर यांनी दाखवलं, ही बाब साधीसुधी नव्हे, तर फार मोठी होती. मराठवाड्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा मान केशरकाकू क्षीरसागर यांना मिळाला.
राज्यात जी काही मोठी राजकीय घराणी आहेत, त्यात बीडच्या क्षीरसागर घराण्याचाही समावेश आहे. बीड तालुक्यातील नवगण राजुरी हे केशरकाकू क्षीरसागर (Kesharkaku Kshirsagar) यांचे मूळ गाव. कर्नाटकातील विजयपूर (आधीचे विजापूर) हे त्यांचे माहेर. राजकारणात सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. तसा तो केशरकाकूंच्या वाट्यालाही आला. महिला म्हणून तो थोडा अधिकच आला. काँग्रेस (Congress) पक्षातून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. आपल्या राजकीय कारकीर्दीत सरपंच, पंचायत समिती सभापती, आमदार, खासदार अशा पायऱ्या त्या चढत गेल्या. अल्पसंख्याक तेली समाजाच्या असलेल्या केशरकाकूंनी राजकारणात दबदबा निर्माण केला होता. लोकांच्या समस्या सोडवण्याची हातोटी आणि त्यांच्यासोबत वागण्याच्या पद्धतीमुळं केशरकाकूंनी लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे, तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते.
1962 मध्ये त्या नवगण राजुरीच्या सरपंच बनल्या. त्यानंतर 1967 मध्ये बीड पंचायत समितीच्या सभापती झाल्या. 1972 मध्ये काँग्रेसने त्यांना चौसाळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत विजय मिळवत केशरकाकूंनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्या तीनवेळा (1980,1984 आणि 1991) बीड लोकसभा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या. 1990 च्या निवडणुकीत मात्र जनता दलाचे बबनराव ढाकणे यांनी त्यांचा पराभव केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. इंदिरा गांधी यांची पक्षसंघटनेवर पकड होती, दबदबा होता. तसाच दबदबा केशरकाकू यांचाही बीड जिल्ह्याच्या राजकारणावर, पक्षसंघटनेवर होता.
घराबाहेर पडताना महिलांना विचार करावा लागायचा, डोक्यावरील पदर ढळू नये, याची काळजी घ्यावी लागायची, असा तो काळ होता. त्या काळात मराठवाड्यासारख्या भागातील बीड जिल्ह्यात एक महिला राजकारणात येते, गावची सरपंत बनते ही साधी बाब नव्हती. व्यवस्थेमुळे दबल्या गेलेल्या महिलांना केशरकाकूंच्या या रूपाने आशेचा किरण दाखवला. त्या काळात एक महिला राजकारणात येते, तिला पतीची साथ मिळते, यश मिळते... हे यश त्या महिलेपुरते मर्यादित नसते. अन्य महिलांवरही त्याचा परिणाम होत असतो, त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. त्या अर्थाने केशरकाकू यांचे समाजातील स्थान अत्यंत महत्वाचे मानावे लागेल. आपली राजकीय कारकीर्द सुरू होत असतानाच्या काळात सोनाजीराव यांनी पत्नी केशरकाकूंना राजकारणात पुढे आणले, हेही महत्वाचे आहे.
केशरकाकू यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या लहानपणी विजापूर येथे महात्मा गांधी आले होते. त्यावेळी केशरकाकूंनी गांधींजींच्या वाहनासमोर घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी गांधीजींनी त्यांच्या गळ्यातील एक हार फेकला तो थेट केशरकाकूंच्या गळ्यात पडला होता. त्यावेळेपासून केशरकाकूंच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ झाला. लग्नानंतर सासरी नवगण राजुरी येथे आल्यानंतर त्यांच्या संघटनकौशल्याची सोनाजीराव यांना ओळख झाली. नवगण राजुरी येथे त्या महिलांचे नाटक बसवायच्या. त्या काळी महिलांना घराबाहेर पडणे आजच्याइतके सोपे नव्हते. परवानगी घेऊनच बाहेर पडावे लागे. महिलांना नाटकाच्या सरावासाठी परवानगी द्यावी, यासाठी केशरकाकू घरोघरी जायच्या. यातून त्यांच्या संघटनकौशल्याची चुणूक दिसून आली, ती आयुष्यभर कायम राहिली.
केशरकाकू यांच्या अंगी मोठे धाडस होते. बीड जिल्ह्यात तेली समाजाची लोकसंख्या फार मोठी नसतानाही संघटनकौशल्य आणि धाडसाच्या बळावर त्यांनी राजकारणात यश मिळवले. त्या अल्पसंख्याक असल्या तरी समाजातील प्रत्येक घटकावर त्यांची पकड होती. त्या आमदार, खासदार म्हणून निवडून येत राहिल्या. त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, असे अनेक प्रसंग आले. दरवेळी त्यांनी त्या प्रसंगांवर मात केली. विरोधकांना त्यांनी अनेकदा आस्मान दाखवले. त्यांचे पती सोनाजीराव क्षीरसागर यांच्यावर खुनाचा आरोप झाला. न्यायालयात हे प्रकरण दीर्घकाळ सुरू होते. पुढे त्यांच्या एका मुलावरही खुनाचा आरोप झाला. या दोन्ही प्रकरणांतून केशरकाकूंचं कुटुंब सुखरूप बाहेर पडलं. याचा परिणाम असा झाला, की क्षीरसागर कुटुंबीयांची एक दहशत जिल्ह्यात निर्माण झाली. त्यातून अनेक दंतकथा जन्माला आल्या. जसे की केशरकाकू यांनी एका पोलिस अधीक्षकालाच गायब केले, केशरकाकू यांच्याकडे नोटा छापण्याचे यंत्र आहे. मात्र याचा कोणताही पुरावा कोणालाही मिळाला नाही. या दंतकथा बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात पसरल्या आहेत. कुठे केशरकाकूंचा विषय निघाला की लोक आजही या दंतकथांची चवीने चर्चा करतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बीड येथे आकाशवाणीचे केंद्र सुरू व्हावे, यासाठी केशरकाकू प्रयत्नशील होत्या. यासाठी त्यांनी इंदिरा गांधी यांची शिष्टमंडळासह भेट घेतली होती. त्या भेटीत घडलेल्या प्रसंगाची खूप चर्चा झाली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या मोहिमेत बीड जिल्ह्याने मोठे यश मिळवले होते. बीड जिल्ह्याचा पहिला क्रमांक आला होता. या भेटीत केशरकाकू यांनी बीडला आकाशवाणी केंद्र सुरू करण्याची मागणी इंदिरा गांधी यांच्याकडे केली. अकाशवाणी केंद्र सुरू करण्यासाठी बीड जिल्ह्याची लोकसंख्या पुरेशी नाही, असे इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोहीम राबवून आम्ही चूक केली, आता पुन्हा लोकसंख्यावाढीसाठी प्रयत्न करावे लागतील, असे उत्तर केशरकाकूंनी दिले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी बीड जिल्ह्यासाठी आकाशवाणी केंद्र मंजूर केले होते. केशरकाकू या साखर कारखान्याचा परवाना मिळवण्यासाठी इंदिरा गांधी यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी तर इंदिरा गांधी यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याला कारणही तसेच होते. त्याकाळी साखर कारखान्याची एकही महिला प्रवर्तक नव्हती. त्यामुळे केशरकाकूंच्या मागणीचे इंदिरा गांधी यांना आश्चर्य वाटले होते. केशरकाकूंनी ते आव्हान यशस्वीरित्या पेलून दाखवले होते.
एकदा रशियाला गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळात केशरकाकूंचा सहभाग होता. त्या दौऱ्यातील एक किस्साही बीड जिल्ह्यात अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतो. त्यावेळी त्यांच्या अंगी असलेल्या व्यावहारिक ज्ञानाची प्रचीती आली होती. त्या ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या त्याच हॉटेलमध्ये शिवराज पाटील चाकूरकर आणि अन्य खासदारांच्याही निवासाची सोय होती. एक खासदार खोलीतून बाहेर आले, मात्र चावी आतच विसरून आले. त्यामुळे त्यांच्या खोलीचा दरवाजा लॉक झाला. त्यामुळे ते हैरान झाले. त्यांनी मदतीसाठी शिवराज पाटील चाकूरकर यांना बाहेर येण्याची विनंती केली. चाकूरकर बाहेर आले, मात्र तेही चावी आतच ठेवून आले. त्यामुळे त्यांचाही खोली लॉक झाली. बाहेरचा हा आवाज केशरकाकूंच्या कानावर पडला. त्यामुळे त्या बाहेर आल्या. बाहेर कशाला आलात, तुमच्याही खोलीचा दरवाजा आता लॉक होईल, असे बाहेर उभे खासदार त्यांना म्हणाले होते. मात्र केशरकाकूंनी चावी सोबत आणली होती. केशरकाकूंचे व्यावहारिक शहाणपण पाहून चाकूरकर आणि त्यांच्यासोबतचे अन्य खासदार थक्क झाले होते.
मराठवाड्यातून लोकसभेत पाय ठेवणाऱ्या केशरकाकू या पहिल्याच महिला. त्यांना चार मुलगे आणि चार मुली अशी एकूण आठ अपत्ये. संकटकाळात लोकांच्या मदतीला धावून जाणे हा काकू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा स्थायीभाव. त्यामुळे नवगण राजुरी गावात सोनाजीराव क्षीरसागर यांचा दबदबा होता. गाव त्यांच्या शब्दाच्या बाहेर नसायचे. 1989 मध्ये राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. त्यात बीड जिल्ह्याचाही समावेश होता. रात्रभर मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदीला पूर आला होता. बिंदुसरेच्या पुराने बीड शहराला वेढा घातला होता. अनेकजण वाहून गेले होते. घरे पडली होती. झाडे उन्मळून पडली होती. लोकांना मदतीची गरज होती. त्यावेळी केशरकाकू आपल्या कुटुंबीयांसह मदतकार्यात उतरल्या होत्या.
इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच केशरकाकू या यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार आदी दिग्गज नेत्यांच्या निकटवर्तीय होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि केशरकाकू यांनी काँग्रेस सोडली. त्या अगदी सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्या. साखर कारखान्यासह केशरकाकूंनी बीड जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. वयाच्या 79 व्या वर्षी 4 ऑक्टोबर 2006 रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. आजारपणामुळे त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
केशरकाकू यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र जयदत्त क्षीरसागर यांनी पुढे चालू ठेवला. जयदत्त क्षीरसागर हे माजी मंत्री आहेत. केशरकाकूंचे पुत्र भारतभूषण हे बीडचे नगराध्यक्ष होते. यानंतर केशरकाकूंचे नातू संदीप क्षीरसागर हेही राजकारणात सक्रिय झाले. सध्या ते आमदार आहेत. आता क्षीरसागर कुटुंब विविध पक्षांत विभागले गेले असले तरी त्यांचा दबदबा कायम आहे.
केशरकाकूंच्या चारपैकी जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर हे दोन मुलगे प्रत्यक्ष राजकारणात आहेत. रवींद्र क्षीरसागर हे पडद्यामागे असतात. नवगण राजुरीची ग्रामपंचायत ताब्यात ठेवणे, दोन्ही बंधूंना राजकारणासाठी पडद्यामागून मदत करणे ही कामे रवींद्र करायचे. रवींद्र यांचे पुत्र संदीप हे प्रत्यक्ष राजकारणात आले. 2007 मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. नंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य बनले. 2019 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर आमदार बनले. सध्या ते शरद पवारचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत.
राज्यातील राजकारणात काका-पुतण्यांचे वाद नवीन नाहीत. तसाच वाद बीडच्या क्षीरसागर कुटुंबीयांत झाला. गेल्या अनेक वर्षांपासून बीड नगरपालिका भारतभूषण क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर हेही पालिकेत लक्ष घालू लागले होते. पालिका निवडणुकीत आपल्या कार्कर्त्यांनाही उमेदवारी मिळावी, असा संदीप क्षीरसागर यांचा आग्रह होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातून 2017 च्या निवडणुकीत दोन भावांचे पॅनेल समारोसमोर आले. भारतभूषण क्षीरसागर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल तर संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी काकू-नाना विकास आघाडी या नावाने पॅनेल उभे केले. नगराध्यक्षांची निवड जनतेतून होती. त्यात भारतभूषण क्षीरसागर विजयी झाले, मात्र रवींद्र क्षीरसागर यांच्या आघाडीचे अधिक नगरसेवक निवडून आले.
संदीप यांना राष्ट्रवादीकडून ताकद मिळत गेली. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर विरुद्ध जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) अशी काका-पुतण्यांची लढत झाली. त्यात संदीप यांनी विजय मिळवला. चारवेळा आमदार आणि राज्याचे ऊर्जामंत्री राहिलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्याकडून पराभव झाला.
संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्या राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे काका जयदत्त आणि भारतभूषण यांची राजकीय पीछेहाट झाल्याचे दिसत आहे. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे साधारण तीन वर्षे शिवसेनेत राहिले. पक्षसंघटनेत निष्क्रियता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक या कारणांवरून त्यांना शिवेसेनेतून (ठाकरे गट) काढण्यात आले. त्यानंतर त्यांची राजकीय घडी अद्याप बसलेली नाही. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती, मात्र त्याला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. केशरकाकूंच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात फूट पडली. राज्यातील राजकीय परिस्थितीत अभूतपूर्व असा बदल झाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे केशरकाकूंच्या राजकीय वारसदारांचे भवितव्य काय राहील, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.