Maharashtra Politics : राजकारणात काहीही होऊ शकतं, कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हा समज खरा ठरवणाऱ्या घडामोडी गेली काही वर्षे महाराष्ट्र अनुभवतो आहे. गेली पाच वर्षे राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथीची ठरली. राजकीय क्षेत्रात धक्क्यांमागून धक्के बसत गेले, प्रचंड घडामोडी घडल्या. ही मालिका 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही सुरू आहे.
2019 ची विधानसभा निवडणूक झाली आणि शिवसेना - भाजपची अभेद्य वाटणारी युती प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून तुटली. त्यावेळेपासून प्रचंड उलथापालथी सुरू झाल्या. राजकारणाचा, राजकीय नेत्यांच्या भाषेचा स्तर नको तितका घसरला. सकाळ-संध्याकाळ एकमेकांची उणीदुणी काढली जाऊ लागली. एकमेकांची उणीदुणी काढण्याची मालिका आजही सुरू आहे. यामुळे राजकीय नेत्यांचा एकमेकांप्रति आदर संपला की नाही माहीत नाही, कारण ते सत्तेसाठी कधीही एकत्र येऊ शकतात, मात्र राजकारणाबद्दलचा लोकांच्या मनातील आदर संपुष्टात आला, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. काही महिन्यांपूर्वी अभिनेते रितेश देशमुख यांनी लातूर येथील कार्यक्रमात याबाबत खंत व्यक्त केली होती. ती अगदी योग्य होती.
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. हा देशाच्या राजकारणात एक अनोखा प्रयोग होता. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले होते. हे सरकार किती दिवस टिकेल किंवा भाजप किती दिवस त्याला टिकू देईल, अशी शंका निर्माण झाली होती आणि ती खरी ठरली. अडीच वर्षांत सरकार पडलं. शिवसेनेतील फूट त्याला कारणीभूत ठरली. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपसोबत गेले. सर्वांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, मात्र भाजपने धक्का दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. भाजपचे सर्वाधिक आमदार असूनही फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. कालांतराने शिवसेना पक्ष, चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले. याच्या एक वर्षानंतर अजितदादा पवार 40 आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांनाच मिळाले. या दोन्हीप्रसंगी फुटून बाहेर पडलेल्या नेत्यांनी मूळ पक्षाच्या नेत्यांवर केलेली टीका लोकांना तोंडात बोट घालायला लावणारी होती.
तत्पूर्वी, एकनाथ शिंदे आणि 40 आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी 50 खोके एकदम ओके ही घोषणा शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून देण्यात आली होती. ती राज्यातील घराघरांत पोहोचली. त्यामुळे संबंधित आमदारांची पुरती नाचक्की झाली. काही आमदारांच्या तोंडावर लोकांनी अशा घोषणा दिल्या. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन राजकीय कारकीर्द पणाला लावलेल्या अनेकांना मंत्रिपदे मिळाली नाहीत. त्यातूनही नाराजीनाट्य घडले. अपक्ष आमदार बच्चू कडू यांची तर पुरती गोची झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. ते शिंदेंच्या बंडात सामील झाले, मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. उलट आता ते महायुतीच्या विरोधात गेले आहेत. काही आमदारांनी मंत्रिपदासाठी अगदी बालिश प्रकार केल्याचे राज्यातील लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही या राजकीय धक्क्यांची मालिका सुरूच आहे. याच्या केंद्रस्थानी आता ज्येष्ठ नेते शरद पवार हे आहेत. गेल्या निवडणुकीतही त्यांनी निसटलेली बाजी जिंकून दाखवली होती. महायुतीतील अनेक जागांचा आणि उमेदवारांचा प्रश्न मिटलेला नसताना शरद पवार यांनी मुतत्सद्दीपणाच्या जोरावर महायुतीच्या नाकीनऊ आणले आहेत. बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे उभ्या आहेत. त्यांच्यासमोर अजितदादा पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार आहेत. नणंद-भावजयीच्या या लढतीकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलं आहे. शरद पवार यांनी या मतदारसंघात सुरू केलेलं बेरजेचं राजकारण हे नवोदित राजकीय नेत्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरावा असंच आहे. अजितदादांनीही शरद पवार यांची काही माणसे फोडून त्यांना मात देण्याचा प्रयत्न केला, मात्र शरद पवार यांनी त्यावर लागलीच उपाय शोधला.
शरद पवार यांनी सर्वात मोठा डाव टाकला तो अकलूजच्या मोहिते घराण्याच्या माध्यमातून. माढा मतदारसंघातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinha naik nimbalkar यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधकांची जुळवाजुळव सुरू केली होती. त्यामुळे मोहिते पाटिल डिवचले गेले होते. त्यामुळेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी या मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती, अर्थातच ती मिळाली नाही. त्यामुळे धैर्यशील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांना उमेदवारीही मिळाली. या घटनेचा अर्थ इतकाच मर्यादित नाही. भाजप अख्खे पक्ष फोडत आहे, अन्य पक्षांतील माजी मुख्यमंत्र्यांसाऱख्या दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात घेत आहे. केंद्रात पुन्हा भाजपचीच सत्ता येणार, अशी हवा निर्माण करण्यात आली आहे.
सर्व दिग्गज नेते महायुतीकडे एकवटले आहेत. असे असतानाही मोहिते पाटील यांनी भाजप सोडल्यामुळे समाजात वेगळा राजकीय संदेश गेला आहे. तो भाजपला निश्चितच परवडणारा नाही. खरी गंमत तर यानंतर झाली. माळशिरस तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजात प्रभाव असलेले महत्वाचे नेते उत्तम जानकर यांनाही आपल्या पक्षात घेण्यात शरद पवार यांना यश आले. याची चाहूल लागताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी खास हेलिकॉप्टर पाठवून जानकर यांना बोलावून घेतले, त्यांच्याशी चर्चा केली, मात्र काहीही उपयोग झाला नाही. तेथून परतताच जानकर यांनी मोहिते पाटील, शरद पवार यांच्यासोबत राहण्याचे संकेत दिले. मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यातील गेल्या अनेक वर्षांचे राजकीय शत्रुत्व संपवण्यात शरद पवार Sharad Pawar यांना यश आले. जानकर हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
आता महायुतीचे नेते बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा प्रचार ते पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील परिस्थिती नेमकी याच्या उलट आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आणि शरद पवार विरुद्ध अजितदादा पवार, असे चित्र बहुतांश लोकांच्या मनात निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि भाजपला हेच नको आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला लोकांची सहानुभूती मिळाली नाही किंवा पक्षांतर करणाऱ्या नेत्यांबाबत एका मर्यादेपलीकडे चर्चा झाली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीने मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सहानुभूती मिळवून दिली. पक्ष फोडून चूक केली नाही ना, कदाचित असा विचार आता भाजप नेत्यांच्या मनात येत असेल. भाजपची ही चूक होती की नाही, हे कळण्यासाठी निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजितदादा पवार बाहेर पडल्यानंतर शालिनीताई पाटील काय बोलल्या होत्या, याचे स्मरण अनेकांना असेल. शरद पवार हे अजितदादा पवार यांचा हिशेब लगेच चुकता करतील, ते कोणालाही सोडणार नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्याची प्रचीती आता काही प्रमाणात का होईना येऊ लागली आहे. अहमदनगरमध्ये आमदार नीलेश लंके यांना आपल्याकडे खेचून शरद पवार यांनी अजितदादा पवार, भाजपचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का दिला आहे. नीलेश लंके हे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे मुलाच्या म्हणजे सुजय विखे यांच्या मतदारसंघात अडकून पडले आहेत.
जागावाटप आणि उमेदवार निश्चितीवरून महायुतीत झालेले नाराजीनाट्य महाविकास आघाडीच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी जाहीर केलेला लोकसभेचा उमेदवार भाजपच्या दबावापुढे झुकून बदलावा लागला, हाही एक मोठा राजकीय धक्का होता. हिंगोली मतदारसंघातून खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी शिंदे यांनी जाहीर केली होती. भाजपने त्याला आक्षेप घेतला. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून पाटील यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे अखेर शिंदे यांनी पाटील यांची उमेदवारी रद्द केली. खासदार पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी या पाचवेळा विजयी झालेल्या आहेत. तिकडे त्यांचीही उमेदवारी कापण्यात आली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचीही उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावालाही भाजपकडून विरोध होत आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांचे नाव समोर आले होते, मात्र तो प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या सर्व प्रकारांना कंटाळून मुख्यमंत्री शिंदे काही दिवसांपूर्वी नॉट रीचेबल झाले होते. यावरून प्रकरणाचं गांभीर्य लक्षात यायला हवं.
महाविकास आघाडीतही सर्वकाही आलबेल आहे, असं नाही. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद पेटला आहे. ही जागा काँग्रेसची, मात्र ती सुटली शिवसेना ठाकरे गटाला. शिवसेनेनं येथून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या जागेसाठी अखेरपर्यंत लढा दिला. दिल्ली गाठून राहुल गांधी यांची भेट घेतली, मात्र काँग्रेसला ही जागा सुटली नाही. सांगलीतून काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. हा मोठा धक्का सहन करणाऱ्या महाविकास आघाडीला लातूर मतदारसंघातून आनंदाची बातमी मिळाली. लातूरचे देशमुख सक्रिय झाले, ही ती आनंदाची बातमी. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख, बंधू, माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी लातूर मतदारसंघातून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. डॉ. काळगे यांना उमेदवारी हा देशमुखांचा मास्टरस्ट्रोक ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे
पक्षफुटी आणि नेत्यांच्या पक्षांतरामुळे गलितगात्र झालेले महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या निवडणुकीत इतक्या जोमाने उतरतील, असे कोणालाही वाटले नव्हते. महाराष्ट्रात प्रचारासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नकली आहेत, अशी टीका केली होती. काँग्रेसही अर्धीच आहे, अशीही टीका त्यांनी केली होती. उद्धव ठाकरे संपले, शरद पवार संपले, काँग्रेस संपली असा प्रचार तर भाजपने फार पूर्वीपासूनच सुरू केला होता. मात्र जमिनीवर वेगळीच परिस्थिती होती. आपण संपलेलो नाहीत, हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी सध्याच्या घडीला तरी दाखवून दिलेले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत सहभागी न होणे हे अनपेक्षित नसले तरी धक्काच होता. गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने लक्षणीय मते मिळवली होती. त्यावेळी ही आघाडी सोबत असती तर काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जवळपास आठ ते नऊ जागा वाढल्या असत्या. त्यामुळे या निवडणुकीत वंचितला सोबत घेण्याचा महाविकास आघाडीने अखेरपर्यंत प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी याचे खापर महाविकास आघाडीवर फोडले आहे. आता या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला किती जागांवर धक्का देणार, याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागलेले आहे.
राजकारण, निवडणुकीच्या या लगिनघाईत राज ठाकरे यांना विसरून कसे चालेल? गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरे हे अनाकलनीय भूमिका घेऊ लागले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याविरोधात रान पेटवले होते. विशेष म्हणजे, 2019 ला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेची एकही जागा लढवली नव्हती. भाजपविरोधात प्रचार मात्र जोरात केला होता. आता 2024 च्या निवडणुकीत मात्र त्यांना वेगळाच साक्षात्कार झाला आहे. मोदी, शाह यांना देशाच्या राजकीय पटलावरून दूर करा, असं म्हणणारे राज ठाकरे यांनी आता मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष असे की यावेळीही ते लोकसभेची एकही जागा लढवणार नाहीत. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना नको तितके गृहीत धरले आहे. राज ठाकरे यांच्या आताच्या निर्णयानंतर त्यांच्या काही बिनीच्या शिलेदारांनी त्यांची साथ सोडली आहे.
अशा राजकीय घडामोडी, उलाढाली गेली पाच वर्षे महाराष्ट्र अनुभवतो आहे. विकासकामांवर याचा अर्थाच परिणाम झाला आहे. सामान्य लोकांचे जीवनमरणाचे प्रश्न बाजूला पडले आहेत. राजकीय कुरघोड्यांचा सुकाळ झाल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी ना सत्ताधाऱ्यांना पुरेसा वेळ मिळाला ना विरोधकांना लोकांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ मिळाला. अशा राजकारणाला विटेलेले मतदार आता कोणाला धडा शिकवणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.