Sakarnama Podcast : झुंजुमुंजू व्हायच्या वेळी म्हणजे सकाळी सहा वाजताच लोक त्यांच्या दरबारात विविध प्रकारच्या तक्रारी घेऊन येत असत. समस्याग्रस्त अडचणींच्या सामना करणाऱ्या नागरिकांसाठी दररोज भरणारा हा दरबार एक आशेचा किरण होता. कारण त्यांच्या कामाची पद्धत नंतर बघू, पुन्हा या, या तक्रारीत दम नाही.... अशी नव्हती. ते लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे. तक्रार योग्य असेल तर संबिधत अधिकाऱ्याशी लागलीच फोनवर संपर्क साधायचे. सांगूनही अधिकाऱ्यांनी काम नाही केले तर मात्र ते प्रसंगी आक्रमक व्हायचे, संबंधितावर हातही उगारायचे. त्यामुळे पोलिस, प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या नावाची एक प्रकारची दहशतच निर्माण झाली होती.
शिवसेनेच्या इतिहासात या वादळी व्यक्तिमत्वाने आपली खास जागा निर्माण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते राजकीय गुरू. प्रारंभीच्या काळात राजकारणात जम बसवण्यासाठी शिंदे यांना त्यांनीच मदत केली होती. एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांच्यासारखे शिवसेनेचे नेते त्यांच्या छत्रछायेखालीच घडले.
शिवसेनेचा इतिहास माहीत असणाऱ्या हे वर्णन कुणाच्या दरबारातील आहे, हे राजकीय नेते कोण आहेत, याचा एव्हाना अंदाज आला असेल. होय आनंद दिघेच...... धर्मवीर आनंद दिघे.... ठाणे येथील कट्टर शिवसैनिक असलेल्या आनंद दिघे यांनी आनंदआश्रमाची स्थापना केली होती. तिथंच त्यांचा रोजचा दरबार भरायचा..... देवा-धर्माच्या बाबतीतही ते अत्यंत आक्रमक होते. टेंभी नाका येथे त्यांनी मोठ्या प्रमाणात नवरात्र महोत्सव सुरू केला.
त्यांनी अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला. ठाणे महापालिकेने बससेवा सुरू केल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना तिथं नोकरीला लावलं. यामुळे पुढे जाऊन ते धर्मवीर आनंद दिघे बनले. धर्मवीर म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांची तुलना बाळासाहेब ठाकरे यांच्याशी होऊ लागली. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरणं साहजिक होते. आनंद दिघेंमुळं शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय तयार झाला होता. दिवसेंदिवस त्यांची प्रसिद्धी वाढत होती. ते जड होतात की काय अशी भावना शिवेसेनेत निर्माण झाली होती, असं राजकीय जाणकार सांगतात.
राज्यात २०१९ मध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.... त्या सरकारमध्ये आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होते. त्यावेळी मंत्रिपदाची शपथ घेताना शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह धर्मवीर आनंद दिघे यांचंही स्मरण केलं होतं. यावरून शिंदे यांची आनंद दिघे यांच्याशी किती जवळीक होती असं लक्षात येतं. शिंदे हे आनंद दिघे यांना गुरू मानायचे. मध्यंतरी आनंद दिघे यांच्यावर आधारित धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्रिपद मिळवलं.....
आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजीचा..... ठाणे येथील टेंभी नाका परिसरात त्यांचं घर. टेंभी नाक्याच्या परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या..... तरुण असताना त्या सभांना दिघे आवर्जून उपस्थित राहायचे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तीमत्व आणि वक्तृत्वाची भुरळ दिघे यांना पडली होती. त्यातूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी काम सुरू केलं. शिवसेनेच्या कामासाठी त्यांनी स्वतःला इतकं वाहून घेतलं की त्या व्यापामुळे त्यांनी विवाहही केला नव्हता.....
......त्यांना मानणारा मोठा वर्ग अद्यापही ठाण्यात आहे. दिघेंच्या निधनाला २२ वर्षे झाली आहेत, तरीही ठाण्यात त्यांचं नाव अजूनही आदरानं घेतलं जातं. त्यांच्या रूपाने शिवसेनेला ठाण्यासारख्या जिल्ह्यात धडाडीचा पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला होता. त्यामुळे शिवसेनेने जिल्हाप्रमुखपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. आई, भाऊ, बहीण असा दिघे यांचा परिवार होता. जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी घर, कुटुंबीयांना दूर सारले. शिवसेनेच्या कार्यालयातच ते रहायला लागले...... झोपायचेही तिथंच...... त्यांच्या जेवणाची सोय कार्यकर्ते करायचे. त्यांच्या कामाचा धडाका सतत वाढतच होता. आनंदाश्रमातील दरबाराद्वारे त्यांनी पोलिस आणि प्रशासनावर आपला धाक निर्माण केला होता. देव, धर्माबाबत दिघे अत्यंत कठोर होते. टेंभी नाक्यावर नवरात्र महोत्सव त्यांनीच सुरू केला होता. दहीहंडीही पहिल्यांदा त्यांनीच सुरू केली होती. अशा प्रकारच्या धार्मिक कामांमुळे त्यांची ख्याती 'धर्मवीर' अशी झाली.
ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत अनेक शिवसैनिकांना त्यांनी नोकरीला लावले. अनेकांना रोजगारासाठी स्टॅाल उभे करून दिले. परिणामी, लोकांच्या मनावर ते अधिराज्य गाजवू लागले. दिघे यांची ओळख ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी होऊ लागली होती. दिघे यांच्या रूपाने शिवसेनेत समांतर व्यवस्था तयार होऊ लागली होती. मात्र शिवसेनेत असं नसतं.......
बाळासाहेब ठाकरे सांगतील तो अंतिम शब्द, इतरांनी फक्त त्याचं पालन करायचं, अशी व्यवस्था होती. अशा परिस्थितीत ठाण्यात आनंद दिघे यांना मोठी प्रसिद्धी मिळत होती. त्यांचं वलय वाढत होतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे अस्वस्थ होते, असं त्यावेळी ठाण्यात बोललं जायचं. बाळासाहेब एकदा म्हणालेही होते, की आनंदच्या पक्षनिष्ठेवियी, हिंदुत्व निष्ठेविषयी शंका घेण्याचं कारण नाही, मात्र ज्या पद्धतीने तो काम करतो त्याबाबत प्रश्न आहे...... त्यावर दिघे म्हणाले होते, की मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीनेच काम करतो. आनंद दिघे यांना कोणत्याही पदाची आस नव्हती. शिवसेना वाढवणं, लोकांची, कार्यकर्त्यांची कामं करणं हाच त्यांचा ध्यास होता.
शिवसेनेला पूर्णपणे वाहून घेतलेल्या आनंद दिघे यांचं पक्षात वेगळं स्थान होतं. कार्यकर्ते, लोकांमध्ये ते लोकप्रिय होते. त्यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून झेप घेतली होती. वादांचंही त्यांच्यासोबत नातं राहिलं..... १९८९ मध्ये झालेल्या ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीत ते राज्यभरात प्रकाशझोतात आले. शिवसेनेनं महापौरपदासाठी आनंद परांजपे यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.
दिघे जिल्हाप्रमुख होते, त्यामुळे परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण निकाल धक्कादायक, अनपेक्षित असा लागला. परांजपे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला. शिवसेनेची मतं फुटली होती. परांजपे यांच्या पराभवानंतर बाळासाहेब ठाकरे संतप्त झाले. फुटणारा गद्दार कोण, असा प्रश्न उपस्थित करत दगाफटका करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही, असं बाळासाहेबांनी जाहीरपणे सुनावले होतं.
अर्थातच हा पराभव दिघे यांच्याही जिव्हारी लागला होता. परांजपे यांचा पराभव कुणामुळे झाला, याची चर्चा काही दिवसांनी सुरू झाली. संशयाची सुई शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्याकडे वळली. महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांनी दगाफटका करत विरोधी उमेदवाराला मत दिलं होतं, त्यामुळे परांजपे यांचा पराभव झाला, असं सांगितलं जाऊ लागलं. महिनाभरानंतर श्रीधर खोपकर यांचा खून झाला. या खुनाचा आरोप दिघे यांच्यावर झाला. त्यांच्याविरुद्ध टाडा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अटक झाली. ते जामिनावर सुटले. ते हयात असेपर्यंत हा खटला सुरू होता. ठाण्यात एखादा वाद झाला की, तुझा खोपकर करू का? असं त्यानंतर म्हटले जाऊ लागलं.
आनंद दिघे जिल्हाप्रमुख असताना ठाणे महापिलकेवर शिवसेनेची सत्ता होती. महापालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे, कंत्राटे देताना नगरसेवक कमिशन खातात, असा आऱोप दिघे यांनी आपल्याच नगरसेवकांवर केला होता. या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं सचिव दर्जाचे अधिकारी नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीचा अहवाल आला, त्यात दिघे यांच्या आरोपांत तथ्य असल्याचं उघड झालं होतं, मात्र तोपर्यंत दिघे यांचा मृत्यू झाला होता. नंतर त्या अहवालाचे काहीही झाले नाही, तो गुंडाळण्यात आला.
२४ ऑगस्ट २००१ ची पहाट उजाडली आणि ती समस्त ठाणेकर, शिवसेनेसाठी वाईट बातमी घेऊन आली. आनंद दिघे यांच्या वाहनाला अपघात झाला होता. गणेशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरोघरी भेटी देत होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला, डोक्याला दुखापत झाली. त्यांना ठाणे येथील सिंघानिया हॉस्पिटलमध्येभरती करण्यात आलं. त्यांच्यावर २६ तारखेला शस्त्रक्रिया झाली. सायंकाळपासून त्यांची तब्येत बिघडत गेली. रात्री सव्वासात वाजता त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर २५ मिनिटांनी पुन्हा एक मोठा हार्ट अॅटॅक आला. रात्री साडेदहा वाजता वयाच्या पन्नासाव्या वर्षी धर्मवीर दिघे यांचं निधन झालं.
त्यांचा मृत्यू झाला, हे सांगायचं कुणी असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली. शिवसैनिकांचे लोंढे सिंघानिया हॅास्पिटलवर धडकू लागले. दिघे यांच्या मृत्यूचा शोक त्यांना अनावर झाला होता. दिघे यांच्यावर उपचार करताना हॅास्पिटलकडून निष्काळजीपणा करण्यात आला, त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाहीत, त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. यामुळे संतप्त झालेल्या दिघे यांच्या जवळपास दीड हजार चाहत्यांनी हॅास्पिटलला आग लावली.
हॅास्पिटलमधील दोनशे बेड, रुग्णवाहिका, अन्य साहित्य खाक झाले. तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर ३४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आलं होतं. त्यावेळी या हॅास्पिटलचे मालक विजयपत सिंघानिया यांनी याप्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांनी आमची माफी मागावी, अशी मागणी केली होती. आपण पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणतो, मात्र ठाणे त्यापेक्षा वेगळं आहे का, अशी संतप्त प्रतिक्रियाही सिंघानिया यांनी व्यक्त केली होती.
२०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी दिघे यांच्या हत्येप्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केला होता. आनंद दिघे यांच्यासोबत प्रत्यक्षात काय झालं, कट कसा रचण्यात आला आणि त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयात घडलेलं दाखवण्यात आलं, असे निलेश राणे म्हणाले होते. दिघे यांच्या मृत्यूला बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते, असं त्यांना म्हणायचं होतं. या आरोपामुळे मोठा गदारोळ उडाला.....
..... शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही निलेश राणे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते, की चुकीच्या वक्तव्यांचे मी समर्थन करणार नाही, दिघें यांच्या मृत्युमागे कोणताही कट नव्हता. दिघे रुग्णालयात असताना त्यांना भेटणारा मी शेवटचा होतो. मी तेथून आल्यानंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं. मी भेटायला गेलो त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर, चिंताजनक होती. त्यांना वाचवण्यासाठी डॅाक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. बाहेर आल्यानंतर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क साधून प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॅा. नीतू मांडके यांना पाठवण्याची विनंती केली होती. नीतू मांडके यांनी माझ्याशी संपर्कही साधला होता. मांडके रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी दिघे यांचा मृत्यू झाला होता, असंही राणे म्हणाले होते....
आनंदच्या दाढीत हुकूमत होती. त्याच्या नादाला लागण्याची हिम्मत कोणातही नव्हती, असं दिघेंच्या मृत्यूनंतर ठाण्यात झालेल्या शोकसभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. यावरून दिघे यांना प्राप्त झालेल्या वलयाची प्रचीती येते. त्यांच्या जीवनावर धर्मवीर नावाचा चित्रपट १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतरच शिंदे आणि ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. या चित्रपटाद्वारे शिंदे यांनी स्वतःचे प्रमोशन करवून घेतले, अशी चर्चा त्यावेळी झाली होती.
राज ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याला आणि त्यांची आनंद दिघे यांच्याशी असलेल्या जवळीकीचा संदर्भ देत शिंदे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर अनेकवेळा निशाणा साधला आहे. निधनाच्या २२ वर्षांनंतर ठाण्यात आनंद दिघे यांचा उल्लेख अत्यंत आदराने केला जातो. त्यांच्याशी जवळीक सांगणारे नेते मात्र दिघे यांना फोटोपुरते वापरून घेत आहेत. दिघे यांच्या वलयामुळे त्याकाळी मातोश्रीवर अस्वस्थता होती, असं सांगितलं जातं, मात्र दिघे यांनी कधीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधात बोलल्याचे ऐकिवात नाही. मी बाळासाहेबांच्या संमतीनेच काम करतो, असे दिघे म्हणाले होते. त्यांना राजकीय गुरु मानणार्या शिंदेंना मात्र दिघे यांच्या त्या गुणाचा विसर पडल्याचं सध्याचं चित्र आहे.