
New Delhi Politics : दिल्ली विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवातही मोठ्या गदारोळाने झाली. नायब राज्यपालांचे भाषण सुरू होण्याआधीच आम आदमी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. भाषणादरम्यान अडथळा निर्माण झाला. संतापलेल्या विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आपच्या सर्व आमदारांना निलंबित करत बाहेरचा रस्ता दाखवला.
आतिशी यांच्यासह सभागृहात उपस्थित असलेल्या आपच्या सर्व 12 आमदारांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आपच्या इतर आमदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून हटवल्याचा दावा करत सरकारविरोधी घोषणा दिल्या. या गोंधळातच नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचे भाषण सुरू झाले.
राज्यपालांच्या भाषणादरम्यान अडथळा निर्माण केल्याच्या कारणास्तव विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी आधी मार्शल्सला बोलवून गोंधळी आमदारांना बाहेर घेऊन जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर एक-एक करत आतिशी यांच्यासह आपच्या 12 आमदारांना निलंबित केले. त्यानंतर आपच्या आमदारांनी सभागृहाबाहेर आंदोलन सुरू केले. आतिशी यांनी सांगितले की, भाजपने आंबेडकरांच्या फोटोच्या जागी मोदींचा फोटो लावला. मुख्यमंत्री कार्यालय, विधानसभा, मंत्र्यांचे कार्यालय सर्व ठिकाणी फोटो बदलले आहेत.
भाजपमध्ये अहंकार निर्माण झाला. मोदी हे आंबेडकरांची जागा घेऊ शकत नाही. आम्ही ते होऊ देणार नाही, असे आतिशी यांनी ठणकावले. दरम्यान, नायब राज्यपालांनी आपल्या भाषणादरम्यान यमुना नदी, प्रदुषण, भ्रष्टाचार मुक्त शासन, अनधिकृत कॉलनींचे नियमितीकरण या पाच मुद्द्यांवर सरकार काम करणार असल्याचे सांगितले. यादरम्यान भाजप आमदारांनी मोदी-मोदी अशी नारेबाजी केली.
आप सरकारच्या कार्यकार्यातील कॅग अहवाल आज विधानसभेत सादर केले जाणार आहेत. जवळपास विविध 14 अहवाल आहेत. आपचे सरकार असताना भाजपकडून हे अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी केली जात होती. या अहवालामध्ये आप सरकारच्या अनियमित कारभाराची माहिती असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. हे अहवाल समोर आल्यानंतर आपचा भांडाफोड होईल, असाही दावा करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.