

Om Birla news : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. सुरूवातीला ६० हून आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यानंतर काही दिवसांतच २० खासदारांनी स्वतंत्र गट करत एनसीपीआय या प्रादेशिक पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला. तसा पत्रव्यवहार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करण्यात आला आहे.
ओम बिर्ला यांच्याकडून तृणमूलच्या गटाला अद्याप अधिकृत मान्यता दिलेली नाही. त्यामुळे याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यातच शुक्रवारी तृणमूलचे लोकसभेतील चार खासदारांनी बिर्ला यांची दिल्लीत भेट घेतली. या खासदारांमध्ये पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी, महुआ मोइत्रा आणि सौगत रॉय यांचा समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
तृणमूलच्या २० खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या पत्राआधी अभिषेक बॅनर्जी यांच्यामार्फतही एक पत्र बिर्ला यांना देण्यात आले होते. पक्षाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार बिर्ला यांच्याकडून शुक्रवारी बॅनर्जी यांना वेळ दिला होता. त्यानुसार चार खासदारांनी बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीत पक्षाची बाजू त्यांच्याकडून बिर्ला यांच्यासमोर मांडण्यात आली.
बिर्ला यांच्या हाती निर्णय
आता अभिषेक बॅनर्जी यांनी बाजू मांडल्यानंतर ओम बिर्ला यांच्या हाती २० खासदारांचे भवितव्य आहे. बिर्ला यांच्याकडून २० खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता दिली जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. या निर्णयावर शिवसेनेच्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाचाही निर्णय अवलंबून असणार आहे.
शिवसेनेत फूट
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. या खासदारांनी बिर्ला यांना तसेच पत्र दिल्याची चर्चा आहे. त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या खासदारांनी अध्यक्षांना पत्र दिले असल्यास तृणमूल काँग्रेसबाबत घेतलेला दुसरी बाजू ऐकून घेण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेसाठीही घ्यावा लागेल. त्यामुळे आता बिर्ला काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.