

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता स्थापन केली असून, हजारो नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत. काबूलच्या (Kabul) विमानतळावर हजारो जणांचे लोंढे धडकत आहेत. काबूल विमानतळावरून सर्व व्यावसायिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद करण्यात आली असून, भारतानेही आपल्या विमानांसाठी पर्यायी मार्ग निवडला आहे.
काबूल विमानतळावर देश सोडून जाण्यासाठी हजारो नागरिक येत आहेत. यामुळे विमानतळावर गोंधळाची स्थिती आहे. अखेर काबूल विमानतळावरील सर्व व्यावसायिक उड्डाणे रद्द केल्याची घोषणा करण्यात आली आहे. विमानतळावर गोंधळ उडाला असून, लोकांचा लोंढा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर अफगाणिस्तानने आपली हवाई हद्दही बंद केली आहे. अफगाणिस्तानने हवाई बंद केल्याने भारताने आपल्या विमानांसाठी पर्यायी मार्ग निवडला आहे. अमेरिकेहून दिल्लीकडे येणारी विमाने आता काबूलमार्गे जाणार नाहीत. ही विमाने दोहा अथवा संयुक्त अरब अमिरातीमार्गे येतील.
अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेले अमेरिकी सैनिक विमानतळाची सुरक्षा करीत आहेत. लोकांचा लोंढा विमानतळावर येत असून, त्याला रोखणे अमेरिकी सैनिकांनी अवघड जात आहे. काबूल विमानतळावर उभ्या असलेल्या विमानात बसण्यासाठी गर्दी केलेल्या प्रवाशांचा व्हिडीओ समोर आला आहे. विमानात बसण्यासाठी लोक धक्काबुक्की करीत आहेत. त्याचबरोबर विमानाला लोंबकळत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विमानाच्या जिन्याला लोंबकळून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. एखाद्या गर्दीच्या बसस्थानकासारखी काबूल विमानतळाची अवस्था झाली आहे. लोकांचे लोंढे विमानतळावर येत आहेत. परंतु, देश सोडून बाहेर जाण्यासाठी विमानात बसण्यास अनेकांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे.
तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत. ते ताजिकिस्तानमध्ये आश्रयास गेले आहेत. तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो.
तालिबानच्या दहशतीसमोर अफगाणिस्तान सरकार अखेर झुकले आहे. तालिबान्यांनी रविवारी (ता.15) सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले आहेत. सर्वबाजूने काबूलला घेरण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अशरफ घनी यांनी देश सोडला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.