New Delhi News: मोदी सरकारच्या पहिल्या टर्मपासून ते आजपर्यंत काँग्रेससह विरोधी पक्षांकडून सातत्यानं ईव्हीएमवर गंभीर आरोप करतानाच संशय व्यक्त केला जात आहे.त्यातही 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महाराष्ट्र, बिहार,दिल्ली,पश्चिम बंगाल,यांसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या एकहाती विजयानंतर विरोधकांचा ईव्हीएमविरोध अधिकच तीव्र झाला. विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर नेहमीच शंका उपस्थित केला जाते. तसेच ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही विरोधी पक्षांकडून उचलून धरली जात आहे. मात्र, बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यानंतरही काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं समोर येत आहे.
देशाची राजधानी दिल्लीत एसआयआरच्या प्रक्रिया आणि ‘मत चोरी’च्या आरोपांवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी राजकीय वातावरण तापवले आहे. मात्र,याचदरम्यान, आसाम राज्यातील सिलचर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाचे धक्कादायक अपडेट समोर येत आहे. या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला असून काँग्रेसला मात्र, मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या.
सिलचर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या महापालिकेच्या एकूण 42 जागांपैकी एनडीएनं तब्बल 34 जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे आसाममधील सिलचर महानगरपालिकेची निवडणूक ही ईव्हीएमऐवजी बॅलेटपेपरवर घेण्यात आली होती. याच निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
भाजप आणि आसाम गण परिषद (AGP) यांच्या एनडीए आघाडीने सिलचर महानगरपालिका निवडणुकीत शानदार विजय मिळवला. 133 उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत एनडीएने 42 पैकी 34 जागा जिंकल्या. भाजपने 38 प्रभागांत उमेदवार उभे केले होते, तर त्यांचा सहयोगी पक्ष AGP ने चार प्रभागांत निवडणूक लढवली.
विरोधी पक्ष काँग्रेसनेही 38 प्रभागांत उमेदवार उभे केले होते. याशिवाय 52 अपक्ष उमेदवार आणि सीपीआय(एम)चा एक उमेदवारही निवडणुकीच्या मैदानात होता. या निवडणुकीत 70.22 टक्के मतदान झाले. महानगरपालिकेच्या 42 पैकी 40 प्रभागांत मतदान झाले. उर्वरित दोन प्रभागांत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
सिलचर नगरपालिकेचा दर्जा वाढवून 42 प्रभागांची महानगरपालिका करण्यात आल्यानंतरची ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती. जून 2025 मध्ये सिलचर महानगरपालिकेने कामकाज सुरू केले होते.
सिलचर महानगरपालिकेच्या एकूण 42 जागांपैकी भाजप (BJP) आणि मित्रपक्षांनी (NDA) 34 जागांवर दणदणीत विजय मिळवला (भाजप 33 + एजीपी 1). काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या, तर उर्वरित 6 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या मोठ्या विजयानंतर भाष्य केलं. त्यांनी सिलचर महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाजपला जनादेश दिल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले. तसेच आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी "काँग्रेस बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीतही जिंकू शकत नाही, जनतेने त्यांना नाकारून भाजपच्या विकासकामांवर पुन्हा विश्वास दाखवला असल्याचं म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.