

Ayodhya Ram Mandir Donation Scam : अयोध्येतील राम मंदिर येथे समोर आलेल्या बहुचर्चित देणगी अपहार प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती लागली आहे.
पोलिस तपासानुसार, 2025 मधील महाकुंभ काळात मंदिरात सर्वाधिक देणगी जमा होत असतानाच सर्वात मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार करण्यात आला. या प्रकरणात अटक करण्यात आलेले लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा हे एकमेकांचे मेहुणे असून, त्यांनीच सर्वाधिक रक्कम लंपास केल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाकुंभादरम्यान (Kumbhmela) देश-विदेशातून लाखो भाविक अयोध्येत दाखल झाले होते. त्यामुळे राम मंदिरात विक्रमी देणगी जमा होत होती. याच गर्दीचा आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांचा फायदा घेत आरोपींनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान हेही उघड झाले की, चोरीच्या पैशातून आरोपींनी सहा पेक्षा अधिक मालमत्ता खरेदी केल्या आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश शुक्ला याच्या भावाच्या योग केंद्रावर पोलिसांनी (Police) छापा टाकला असता, चार पेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे ही नोटांची बंडले चादरीत लपवून ठेवण्यात आली होती. यातील एका पेटीवर ‘राम राज्य कोष’ असे लिहिलेले आढळून आले. यावर डिजिटल व्यवहारांसाठी क्यूआर कोडही असल्याचे समोर आले असून, तपास यंत्रणा आता त्या व्यवहारांचाही मागोवा घेत आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या टिन्नू यादव याच्याकडे मंदिरातील देणगी मोजणी कक्षाची किल्ली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तो मंदिर ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांच्या वाहनाचा चालक म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता, तेथूनही मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीसाठी वापरलेली पद्धतही समोर आली आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, आरोपींना देणगी मोजणी कक्षातील CCTV कॅमेऱ्यांचे अचूक लोकेशन माहिती होते. कॅमेऱ्यांच्या नजरेआड असलेल्या जागांचा वापर करून पैसे चोरले जात होते. चोरी करताना एक जण पैसे स्वतःकडे ठेवत असे, तर इतर कर्मचारी त्याला चारही बाजूंनी घेरत असत, जेणेकरून कॅमेऱ्यात कोणतीही संशयास्पद हालचाल स्पष्ट दिसू नये.
तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. देणगी मोजणी कक्षाच्या दोन किल्ल्या होत्या. एक किल्ली टिन्नू यादवकडे, तर दुसरी बँकेकडे असल्याची माहिती मिळाली आहे. या दुहेरी यंत्रणेचा गैरफायदा घेऊन चोरी झाली का, याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली असून, राम मंदिरासारख्या देशाच्या आस्थेच्या केंद्रातच देणगी अपहार झाल्याच्या आरोपांमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.