Delhi News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या महिन्याच्या अखेरीस मुंबईत 'इंडिया' आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी काँग्रेसकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली आहे. त्यासोबतच देशातील जनतेच्या दबावामुळे सर्वच विरोधी पक्ष एकत्रित आले असल्याचे त्यांनी सांगितले. गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा केली असली तरी इंडियातील घटक पक्षाकडून अजून कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीत किंवा अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
काँग्रेसने २०१४ साली केलेल्या चुकांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आले आहे, असे म्हणत गेहलोत यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली. देशातील जनतेच्या दबावामुळे सर्वच विरोधी पक्ष एकत्रित आले आहेत. हे सर्व विरोधी पक्ष एक दिलाने एकत्रित आले आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वत्र इंडियाची जादू चालणार, असेही गेहलोत यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘इंडिया’ आघाडीवर भाष्य करताना गेहलोत म्हणाले की, "प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. परंतु सध्या देशातील परिस्थितीमुळे सर्व पक्षांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. जनतेनेच असा दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची युती झाली आहे."
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए ५० टक्के मतांसह सत्तेत येईल, या दाव्यांबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे कधीही साध्य करू शकणार नाहीत. ते जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांना असं करता आलं असतं. पण आता त्यांना ५० टक्के मतं मिळू शकत नाहीत. याउलट त्यांच्या मतांची टक्केवारी आणखी कमी होईल. त्यामुळे २०२४ मध्ये पंतप्रधान कोण बनेल? हे आगामी लोकसभा निवडणुकांचे निकालच ठरवतील, असेही गेहलोत म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.