

belagavi news : शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना सोमवारी (ता. २७) घडली. या प्रकारामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
बेळगावातील संगोळी रायण्णा चौक येथील काँग्रेस भवनात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) निरीक्षक मनोज चव्हाण, आमदार राजू सेठ यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चर्चा सुरू असताना माजी आमदार रमेश कुडची यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. याचवेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही क्षणांतच हा वाद अधिक तीव्र होत हाणामारीपर्यंत पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या गोंधळात माजी आमदार रमेश कुडची यांचे निकटवर्तीय हेमंत लिंगाडे यांच्यावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेमुळे बैठकीत काही काळ मोठा गदारोळ निर्माण झाला आणि कामकाज ठप्प झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने काँग्रेस भवनात दाखल झाले. संबंधितांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या घटनेबाबत तक्रार दाखल होते का आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जाते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मतभेदांची चर्चा ‘व्हायरल’ शहराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या या गोंधळामुळे बेळगावातील काँग्रेसअंतर्गत मतभेदांची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. या बैठकीच्या वादावादीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
काँग्रेस भवनमधील शहराध्यक्ष निवड प्रक्रियेत कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. मात्र, कोणावरही हल्ला झालेला नाही. हे तात्त्विक मतभेद आहेत. कोणताच गैरप्रकार घडलेला नाही.
- राजू सेठ, आमदार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.