Congress News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा सध्या उत्तर भारतात सुरू आहे.यात्रेचा संघर्षमय प्रवास सुरु असतानाच दक्षिणेत काँग्रेसच्याच खासदारांनी भारत जोडण्याऐवजी थेट तोडण्याची भाषा केली आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश यांनी दक्षिण भारत हा स्वतंत्र देश करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भाजपच्या निशाण्यावर आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) नी गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे भाऊ खासदार डी के सुरेश यांनी केंद्र सरकार दक्षिण भारतातील राज्यांकडून मिळणारा कराचा पैसा उत्तर भारताकडे वळवत असल्याचा आरोप केला.
तसेच केंद्राच्या या भूमिकेमुळे दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होत असून या राज्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दक्षिण भारताला स्वतंत्र राष्ट्र जाहीर करावे, अशी वादग्रस्त मागणी त्यांनी केंद्राकडून होणाऱ्या असमान निधी वाटपावरून केली आहे. खासदार सुरेश यांच्या या विधानावर भाजपने मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे.
खासदार डी. के. सुरेश पुढे म्हणाले, केंद्र सरकारला आमची विनंती आहे,आम्हाला जो पर्याप्त निधी दिला जाणार आहे, तो निधी पूर्णपणे आम्हाला मिळाला तर तो पुरेसा आहे. यामध्ये केंद्राने जीएसटी, सीमाशुल्क आणि प्रत्यक्ष कराच्या माध्यमातून मिळणारा संपूर्ण निधी संबंधित राज्यांना द्यायला हवा. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. शिवाय विकासाच्या निधीतील आमचा वाटा हा उत्तर भारतीय राज्यांकडे वळवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच असे करून केंद्र सरकार दक्षिणेतील राज्यांवर अन्याय करत आहे. परंतु, हाच प्रकार सुरू राहिला तर दक्षिण भारताच्या हितासाठी स्वतंत्र राष्ट्राचा मुद्दा हा अधिक जोर धरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
डीके सुरेश यांच्या वादग्रस्त विधानावर भाजप मात्र चांगलीच आक्रमक झाली आहे. एकीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत, आणि दुसरीकडे त्यांचेच खासदार भारत जोडण्याऐवजी तोडण्याची भाषा करत आहेत. काँग्रेसच्या याच मानसिकतेमुळे देशाची फाळणी झाली होती, अशी सडकून टीका भाजपचे कर्नाटकातील विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आर अशोक यांनी केली आहे.
दरम्यान, डी के सुरेश यांनी खासदारकीची शपथ घेताना भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षण करण्याचा उल्लेख केला असेल. मात्र, ते जर देश तोडण्याची भाषा करत असतील तर हा देशाच्या संविधानाचा अपमान होत नाही का? असा सवाल भाजप नेते अशोक यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांना ट्विटरवरून केला आहे. तसेच खासदार सुरेश यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.