Congress government : मागील काही महिन्यांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. तर सिध्दरामय्या मात्र आपणच पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे सांगत आहेत. एकीकडे दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असताना आता भाजप काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी रणनीती आखत असल्याचे उघड झाले आहे.
राज्यातील भ्रष्ट काँग्रेस सरकार पाडण्याचा संकल्प करा, असे आवाहन खुद्द केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. बंगळूरच्या पॅलेस ग्राऊंडवर आज राज्य भाजप कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीत बोलताना शेखावत यांनी कर्नाटकातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे गांभीर्याने विश्लेषण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री निवडीसाठी दहा दिवस चर्चा चालवून काँग्रेसने लोकशाहीचा अपमान केला. अद्यापही खुर्चीच्या राजकारणामुळे प्रशासनावर परिणाम होत असल्याचे शेखावत म्हणाले. वाल्मिकी समाज विकास महामंडळातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा उल्लेख करत, स्वतः मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार मान्य केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली असून, युवकांना रोजगार मिळत नाही. ड्रग्ज माफिया वाढले आहेत, अशी टीका शेखावत यांनी केली. यावेळी त्यांनी राजकारणातील ५० वर्षे पूर्ण केलेल्या माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे अभिनंदन करताना त्यांना ‘कर्नाटक भाजपचे भीष्म पितामह’ असे संबोधले.
राज्य भाजप प्रभारी आणि राष्ट्रीय महासचिव राधा मोहनदास अग्रवाल यांनी पुढील निवडणुकीत कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. इतर राज्यांतील निवडणुकांसाठी कर्नाटकातील निधीचा गैरवापर होत आहे. काँग्रेस सरकारबद्दल जनतेत नाराजी आहे. धर्मनिरपेक्ष जनता दल (धजद) सोबत आम्ही आघाडीत असून, दोन्ही पक्ष एकत्रितपणे काँग्रेस सरकारविरोधात लढतील, असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत ५० वर्षांची राजकीय कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल येडियुराप्पा यांचे अभिनंदन करणारा ठरावही मंजूर करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.