

Lok Sabha privilege notice : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्यो जोरदार खडाजंगी झाली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याचा आरोप करत काँग्रेसने जोरदार हंगामा केला होता. त्यातच राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान सरकारबाबत वापरलेल्या शब्दांवरून त्यांच्याविरोधात विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस बजावण्याची तयारी सरकारने सुरू केल्याची चर्चा होती. पण सरकार मागे हटल्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे ‘एआय’च्या माध्यमातून कथित अपमानजनक व्यंगचित्र व व्हिडिओ जारी केल्याचे सांगत लोकसभा विशेषाधिकार समितीने थेट काँग्रेसलाच नोटीस बजावली आहे. भाजपचे खासदार विष्णूदत्त शर्मा यांनी केलेल्या तक्रारीनंतर समितीने पहिल्यांदाच हे मोठे पाऊल उचलले आहे.
खासदार शर्मा यांच्या तक्रारीची दखल घेत विशेषाधिकार समितीने काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत तसेच अन्य आठ पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. त्यांना तीन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. तीन दिवसांत म्हणणे सादर न केल्यास सदनाची अवमानना तसेच विशेषाधिकाराचे उल्लंघन झाल्याचे सांगत कारवाई केली जाईल, असे लोकसभा सचिवालयाने नोटिशीत स्पष्ट केले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्देशावरुन व्हिडिओ हटविण्यात आले असून त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या नियमावलीचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. व्हिडिओ जारी करत असताना पक्षाकडून मर्यादेचे उल्लंघन झालेले नाही. मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोपही श्रीनेत यांनी केला आहे.
लोकसभेतील कामकाजादरम्यान अनेकदा लोकसभा अध्यक्ष आणि विरोधी खासदारांमध्ये खटके उडाले होते. तसेच संसदेबाहेरही विरोधकांनी बिर्ला यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. बिर्ला हे केवळ सत्ताधारी खासदारांच्या बाजूने भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून बिर्ला यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.