मुंबई : आगामी लोकसभा (Loksabha) आणि राज्य विधानसभा (Maharashtra Assembly) निवडणुका (Elections) डोळ्यासमोर ठेवून भाजप (BJP) नेतृत्वाने दुरावलेल्या मित्रपक्षांची कसर भरुन काढण्यासाठी भाजपप्रणित आघाडीचा (NDA) विस्तार करण्याचा महत्वाकांक्षी रोडमॅप आखला आहे. याच रोडमॅपमधून आता महाराष्ट्रात शिवसेनेची (Shivsena) जागा राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्ष घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. मनसेने एनडीएमध्ये यावे यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वही आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्राशिवाय पंजाबमध्ये अकाली दलाच्या जागी काँग्रेसमधून बाहेर पडलेले कॅप्टन अमरिंदरसिंग, जम्मू-काश्मीरचे सज्जाद लोन यांच्यासह अनेक प्रादेशिक पक्षांनाही ‘एनडीए’च्या छत्राखाली आणण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेतला. यासोबत मध्यप्रदेशमध्ये गोंडवाना गणतंत्र पक्ष, पश्चिम बंगालमधील ‘भद्र' समाजावर प्रभाव टाकणाऱ्या समविचारी प्रादेशिक पक्षांना ‘एनडीए’बरोबर ठेवण्याचे किंवा नव्याने जोडून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती आहे.
राज ठाकरे भाजपसाठी कितपत व्यवहार्य?
राज ठाकरे यांनी सध्या हाती घेतलेला लाउडस्पीकरचा मुद्दा दिल्लीपर्यंत गाजत आहे. त्यांची शैली आणि त्यांच्याकडे गर्दी खेचण्याचे असलेले कसब पाहता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासूनच मनसेला ‘एनडीए’शी जोडून घेण्यासाठी भाजपचे महाराष्ट्रातील नेतृत्व आग्रही आहे. मात्र राज ठाकरेंना सोबत घेतलयास उत्तर भारतच्या कितपत मतांना फटका बसू शकतो याबाबत पक्षाने काही सर्वेक्षणेही केल्याची माहिती आहे. पण पक्षनेत्यांच्या मते राज ठाकरेंची सध्याची भूमिका ही कसर भरून काढले आणि याच भूमिकेमुळे २०२४ आधी त्यांच्या ‘एनडीए’ प्रवेशाला फारसे अडथळे राहणार नाहीत, असे वातावरण आहे.
पंजाब आणि कश्मिरसाठीही भाजप सरसावले
पंजाबामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग-भाजप आघाडी विधानसभेला अपयशी ठरली असली तरीही राज्यात कॅप्टन यांचा प्रभाव कायम असून त्यांच्याकडे आजही लोकप्रिय नेते म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे २०२४ मध्येही कॅप्टन अमरिंदर यांच्याबरोबरची आघाडी भाजप कायम ठेवावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे मत आहे. याशिवाय सज्जाद लोन यांच्याबरोबर आघाडी केल्यास कलम ३७० रद्द केल्यानंतरही खोऱ्यातील अद्याप कायम असलेली धग कमी होऊ शकेल अशी आशा भाजपला आहे.
एनडीएमध्ये सध्या २७ पक्ष :
भाजपप्रणित एनडीए आघाडीत सध्या २७ पक्ष आहेत. यात संयुक्त जनता दल, अण्णाद्रमुक हे केवळ दोनच मोठे पक्ष आहेत. तर गोव्यातील मगोप, महाराष्ट्रातील रिपब्लिकन (आठवले गट) यांच्यासह उत्तर प्रदेशात निषाद पक्ष व अपना दल, बिहारमध्ये हम, हरियानात दुष्यंत चौटाला यांचा जेजेपी, झारखंडमधील आजसू या पक्षांचा एनडीएमध्ये समावेश आहे. यात आता आणखी मनसे, अमरिंद सिंग यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.