

BJP bypoll victory : देशातील पाच विधानसभा आणि एका लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. पश्चिम बंगालमधील दोन्ही प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या उमेदवारांनी रेकॉर्डब्रेक विजय मिळविला आहे. आसाममधील मुस्लिमबहुल लोकसभा मतदारसंघातही भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. भाजपसमोर काँग्रेससह सर्वच विरोधकांचा सुपडा साफ झाला आहे.
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची देशभरात चर्चा होती. नंदीग्राम मतदारसंघ मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक झाली. तर रेजीनगरमधून निवडून आलेले हूमायूं कबीर यांनी राजीनामा दिला होता. अपेक्षेप्रमाणे नंदीग्राममध्ये भाजपचा विजय झाला. तर मुस्लिमबहुल रेजीनगरमधील विजय भाजपसाठी ऐतिहासिक ठरला आहे.
नंदीग्रामध्ये भाजपच्या हसी राणी रथ या तब्बल १ लाख २२ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी अधिकारी यांचाही रेकॉर्ड मोडला. तर रेजीनगरमधील भाजप उमेदवारानेही पाऊण लाख मताधिक्याने विजय मिळवत मुस्लिमबहुल मतदारसंघ काबीज केला आहे. रेजीनगरमध्ये काँग्रेससह ममता तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट आणि डेमोक्रेटिक तृणमूलला दारुण पराभव झाला.
नंदीग्रामध्ये काँग्रेस उेमदवार मिलन प्रधान दुसऱ्या स्थानावर राहिले असले तरी त्यांना सुमारे ४२ हजार मतांपर्यंतच मजल मारता आली. डेमोक्रेटिक तृणमूलला हजार मतांचा आकडाही पार करता आला नाही. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही निवडणूक झाली. त्यामुळे ममतांचा करिष्मा पुन्हा दिसणार का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, तृणमूलच्या दोन्ही गटांसह काँग्रेससह भाजपच्या लाटेत भूईसपाट झाली.
आसामध्येही काँग्रेसची जागा गेली
आसाममधील नागांव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने कमाल करून दाखविली आहे. या मतदारसंघात २०२४ मध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. त्यांनी आसामच्या विधानसभा निवडणुकीआधी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढविली. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने माजी आयएएस देवाशिष शर्मा यांना उमेदवारी दिली.
नागांव हा मतदारसंघही मुस्लिमबहुल आहे. मात्र, तिथेही भाजपने जोरदार मुसंडी मारत इतिहास घडविला. काँग्रेसच्या हातून हा मतदारसंघ निसटला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, सायंकाळी सात वाजेपर्यंत शर्मा यांनी अखेरच्या काही फेऱ्यांपर्यंत तब्बल १ लाख ५७ हजार मतांची विजयी आघाडी घेतली होती. त्यामुळे आता त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता उरली आहे. पुदुद्चेरीमध्येही एका मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात एनडीएच्या उमेदवाराने बाजी मारली.
तमिळनाडू 'विजय'च
तमिळनाडूतील धारापुरम आणि मदुरंतकम या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाचा विजय झाला आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर विजय यांची ही पहिलीच परीक्षा झाली आहे. त्यामध्ये मतदारांनी विजय यांच्यावरच विश्वास दाखविला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.