

Census 2027 questions : केंद्र सरकारने पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या जनगणना टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी ४० प्रश्नांची यादी जाहीर केली आहे. त्याबाबतची अधिसूचना शुक्रवारी जारी करण्यात आली आहे. या यादीनुसार, प्रश्नांमध्ये जात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या दर्जाचाही समावेश करण्यात आला आहे. देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या ४० प्रश्नांची अधिसूचना जारी केली आहे. पुढील वर्षी होणारी जनगणना जातनिहाय असेल, असे यापूर्वीच सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार प्रश्न तयार करण्यात आले आहेत. जनगणनेचा पहिला टप्पा १ सप्टेंबरपासून हिमाच्छादित भागांपासून सुरू होणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या देशाच्या महारजिस्ट्रार कार्यालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ४० प्रश्नांच्या या यादीत जातीशी संबंधित प्रश्न १० व्या क्रमांकावर असणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यापैकी कोणता प्रवर्ग आणि त्यातील कोणती जात, अशी विचारणा नागरिकांना केली जाणार आहे. जातीशी संबंधित हा एकमेव प्रश्न असणार आहे. मात्र, त्याआधी नववा प्रश्न तुमचा धर्म कोणता हा असेल.
अन्य कोणते प्रश्न असणार?
जात आणि धर्माशी संबंधित प्रश्नांशिवाय इतर ३८ प्रश्न हे नागरिकांची संपूर्ण वैयक्तिक माहितीशी संबंधित असतील. त्यामध्ये व्यक्तीचे नाव, कुटुंबप्रमुखाशी नाते, लिंग, जन्मतारीख आणि वय, सध्याची वैवाहिक स्थिती, विवाहावेळचे वय, पती किंवा पत्नीचे नाव, घोषित राष्ट्रीयता, वडील, आईची माहिती, दिव्यांगता, मातृभाषा किंवा इतर भाषांचे ज्ञान, साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेची स्थिती ही माहितीही विचारली जाणार आहे.
शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेतल्याची स्थिती, कुठपर्यंत शिकलात, गतवर्षी कधीही कोणते काम केले का, आर्थिक स्थितीची श्रेणी, व्यवसाय, उद्योग किंवा व्यापार किंवा कामाची स्थिती, कामगार श्रेणी, गैर-आर्थिक काम, रोजगाराची स्थिती, कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्याबाबतची माहिती या प्रश्नांच्या माध्यमातून रोजगार-बेरोजगारीची माहिती संकलित केली जाईल.
जन्म ठिकाण, मागील निवासाचे ठिकाण, स्थलांतराचे कारण, मागील स्थलांतरानंतर संबंधित गाव किंवा शहरात राहण्याचा कालावधी, स्थायी निवासाचा पत्ता या प्रश्नांच्या आधारे स्थलांतराच्या संख्येवर प्रकाश टाकला जाईल. जन्मलेल्या एकूण मुलांची संख्या (केवळ विवाहित, विधवा, घटस्फोटितांसाठी), सध्या जिवंत असलेल्या मुलांची संख्या, मागील वर्षभरात जन्म झालेल्या मुलांची संख्या या माहितीच्या आधारे कुटुंबातील सदस्य संख्येची आकडेवारी समोर येणार आहे.
सरकारकडून कोरोना लसीकरणाची माहितीही संकलित केली जाणार आहे. प्रश्नांच्या यादीत ३४ व्या क्रमांकावर कोरोना लसीकरणाचे ठिकाण हा प्रश्न विचारण्यात आला आहे. यामध्ये किती नागरिकांनी कोरोना लस घेतली, हे स्पष्ट होईल. यादीतील शेवटचे सहा प्रश्न बँक खात्यांची एकूण संख्या, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, मतदान ओळखपत्र क्रमांक, पासपोर्ट क्रमांक आणि वाहन चालक परवाना आहे किंवा नाही, याबाबतची माहिती विचारली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.