

CJI Surya Kant news : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर हैद्राबादमधील NALSAR या विधी विद्यापीठाबाबतचा वाद समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाला निमंत्रित करण्यास जोरदार विरोध केला होता. त्यानंतर गुरूवारी बार कौन्सिल ऑफ इंडियाने २०२६ च्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना वकिलीसाठी नोंदणी करण्यास बंदी घालण्याचा आदेश काढल्याने खळबळ उडाली होती.
बार कौन्सिलच्या या आदेशाला देशभरातून प्रचंड विरोध झाल्याने मध्यरात्री हा आदेश मागे घ्यावा लागला. भाजपचे राज्यसभेचे खासदार मनन कुमार मिश्रा हे कौन्सिलचे अध्यक्ष आहे. त्यांनीच मध्यरात्री सोशल मीडियात पोस्ट करत याबाबत घोषणा केली. मात्र, त्यांच्या या आदेशाचे पडसाद शुक्रवारी सुप्रीम कोर्टात उमटले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या आदेशावरून तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना झापले आहे.
विद्यार्थ्यांविरोधात कोणतीही दंडात्मक किंवा प्रशासकीय कारवाई करू नये, असे आदेश सरन्यायाधीशांनी दिले आहेत. बार कौन्सिलच्या आदेशाविरोधात ज्येष्ठ विधिज्ञ के. परमेश्वर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान CJI सूर्यकांत यांनी विद्यार्थ्यांच्या विरोधावर आपली भूमिकाही स्पष्ट केली. तसेच त्यांनी मिश्रा यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.
सरन्यायाधीश म्हणाले, विद्यार्थ्यांना शांततेत आपली भूमिका मांडण्याचा आणि विरोध दाखविण्याचा पूर्ण अधिकार आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत मला पत्र लिहिले होते. हा विद्यार्थी आणि माझ्यातील विषय आहे. यामध्ये BCI ने विनाकारण दखल देणे योग्य नाही. मी विद्यार्थी असताना आंदोलनांमध्ये सक्रीयपणे सहभागी झालो होतो. युवक शांततेत आवाज उठवत असतील तर त्यांना ते स्वातंत्र्य आहे. बीसीआयने यामध्ये लुडबुड करण्याची गरत नाही. आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत, असे शब्दांत सरन्यायाधीशांनी आपली नाराजी व्यक्त केली.
सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी बीसीआय आणि अध्यक्ष मनन मिश्रा यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, मिश्रा यांनी विद्यार्थ्यांवर बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून त्याविरोधात थेट आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तासाभरातच मिश्रांनी यांनी आपल्या निर्णयात बदल करत केवळ चौकशीचे आदेश काढले. मात्र, त्यालाही विरोध झाल्यानंतर संपूर्ण आदेशच मागे घ्यावा लागण्याची नामुष्की मिश्रा यांच्यावर ओढविली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.