

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी विधानसभा विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांचे शुक्रवारी, 25 सप्टेंबर रोजी लखनऊ येथील SGPGI रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 8 वेळा आमदार राहिले होते. त्यांच्या निधनाने समाजवादी पक्षासह बलिया जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
राम गोविंद चौधरी गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांच्यावर लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. हृदय आणि किडनीशी संबंधित आजारांमुळे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना SGPGIमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
राम गोविंद चौधरी यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी चळवळीपासून सुरू झाला. मुरली मनोहर टाउन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनातही त्यांनी भूमिका बजावली. आणीबाणीच्या काळात आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.
आणीबाणीनंतरच्या काळात त्यांनी चिलकहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बांसडीह विधानसभा मतदारसंघातूनही आपला राजकीय प्रभाव कायम ठेवला. तब्बल 8 वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
राम गोविंद चौधरी यांनी समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले. मुलायम सिंह यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली. अखिलेश यादव यांच्या सरकारमध्येही ते मंत्री होते. 2017 ते 2022 या काळात त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.