

Student protest update : कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांतील विद्यार्थी, तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टाच्या एका अंतरिम आदेशानंतर सीजेपीने संताप व्यक्त केला आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास पार्टीने पुन्हा एकदा देशभरात आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सीजेपीच्या आंदोलनाशी संबंधित जनहित याचिकांवर सुनावणी झाली. यावर सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतरिम आदेशामुळे संपूर्ण देशात धोक्याची घंटा वाजली पाहिजे. आधीपासून नोंद असलेल्या एफआयआर कायम ठेवण्याची आणि त्यांचा तपास सुरू ठेवण्याची परवानगी सरकारला देण्यात आली असून ही चिंतेची बाब असल्याचे दास यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने २५ जुलैला युवकांना दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात हा आदेश असल्याचे दास म्हणाले आहेत. आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले जातील, आंदोलनात शांततेत सहभागी झालेल्या कुणालाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष केले जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आता केंद्र सरकार आणि भाजपशासित राज्ये, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत आंदोलनकर्त्यांविरोधातील एफआयआर कायम ठेवून त्यांचा छळ करतील, असा आरोप दास यांनी केला आहे.
सरकारच्या वकिलांनी कोर्टात या अंतरिम आदेशाला कोणताही विरोध केला नाही, ही अधिक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कोर्टाचा हा आदेश आम्हाला अस्वीकार्य आहे. कोर्टाने सरकारला एफआयआर वर कारवाई सुरूच ठेवण्याचा कोणताही सक्तीचा आदेश दिलेला नाही, असा दावा करणे म्हणजे आदेशाचा जाणूनबुजून चुकीचा अर्थ लावण्यासारखे असल्याची नाराजीही दास यांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीची मुदत आज संपत आहे. आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व एफआयआर मागे न घेतल्यास आणि आश्वासनांची पुर्तता न केल्यास आमच्याकडे देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसेल. शब्द न पाळणाऱ्या सरकारने देशातील युवकांनी शांत राहावे, अशी अपेक्षा ठेवू नये, असा अल्टीमेटम दास यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.