New Delhi : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसला दहा वर्षांनी विरोधी पक्षनेतेपद मिळाले. पण राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. राज्यसभेतील काँग्रेसच्या दोन जागा कमी झाल्या असून आणखी दोन जागा कमी झाल्यास वरिष्ठ सभागृहातील मल्लिकार्जून खर्गे यांनी विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकते.
काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल आणि दीपेंद्र सिंह हुडा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्याआधी त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 26 पर्यंत खाली आले आहे. भाजप 90 सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठ एकूण सदस्यांच्या दहा टक्के संख्याबळ आवश्यक असते. त्यानुसार ज्या पक्षाकडे 25 खासदार असताना त्या पक्षाला हे पद मिळते. लोकसभा निवडणुकीआधी काँग्रसचे 28 सदस्य होते. आता हा आकडा 26 पर्यंत खाली आला आहे. राज्यसभेतील आणखी दोन सदस्य निवृत्त झाल्यास किंवा काही कारणांमुळे त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यास खर्गेंकडील हे पद जाऊ शकते.
वेणुगोपाल हे राजस्थान तर हुडा हे हरियाणातून राज्यसभा सदस्य होते. या दोन्ही राज्यांतील विधानसभेच्या आमदारांचे संख्याबळ पाहिल्यास दोन्ही जागांवर काँग्रेसचे सदस्य निवडून येण्याची शक्यता कमी आहे. राजस्थानमध्ये भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. तर हरियाणामध्ये 46 आमदारांचे संख्याबळ नसले तरी भाजप इतर आमदारांना सोबत घेऊन किंवा काँग्रेसचे आमदार फोडून उमेदवार निवडून आणू शकते, अशी चर्चा आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने या राज्यांतून काँग्रेसचा एक सदस्य सहजपणे निवडून येऊ शकतो. बीआरएसमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले केशव राव यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
विरोधी पक्षनेतेपद टिकवून ठेवण्यासाठी ही काँग्रेसची रणनीती मानली जात आहे. या जागेवर लवकरच निवडणूक होऊ शकते. तिथून काँग्रेसला उमेदवार निवडून आणण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ 27 पर्यंत वाढेल आणि विरोधी पक्षनेतेपद अधिक मजबूत होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.