

Congress Parliament strength : मागील १२ वर्षांत अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची वाताहत झाली आहे. अनेक राज्यांमधील सत्ता गेल्याने तसेच आमदारांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने राज्यसभेतील सदस्यांचा आकडाही खूप कमी झाला आहे. आता गुजरातमध्येही काँग्रेसला झटका बसणार आहे. मागील ६६ वर्षांनंतर पहिल्यांदाच असे घडणार आहे.
गुजरातमध्ये २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सुपडा साफ केला होता. काँग्रेसचे केवळ १७ उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतरही पाच आमदारही भाजपमध्ये गेले. त्यामध्ये सध्या काँग्रेसचे राज्यात केवळ १२ आमदार आहेत. त्याचा परिणाम आता आगामी राज्यसभा निवडणुकीवर होणार आहे.
शक्ती सिंह गोहिल हे गुजरातमधून राज्यसभेत निवडून गेलेले काँग्रेसचे एकमेव सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ २१ जून रोजी संपत आहे. त्यांचा कार्यकाळ संपताच गुजरातमधून निवडून जाणारा एकही राज्यसभा सदस्य काँग्रेसचा नसेल. मागील ६६ वर्षांनंतर हे पहिल्यांदाच घडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी ही मोठी नामुष्की असेल.
सध्याची विधानसभेची स्थिती पाहता राज्यसभेत सदस्य निवडून आणणे काँग्रेससाठी अशक्य आहे. भाजपचे विधानसभेत १६२ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे चार सदस्य सहज निवडून येऊ शकतात. काँग्रेसने आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष किंवा अपक्षांची मदत घेतली तरी त्यांचा एकही सदस्य निवडून जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.
जून महिन्यात गोहिल यांच्यासह भाजपचे खासदार नरहरी अमीन, राम मोकरिया आणि रामिलाबेन बारा यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यासाठी मे-जून महिन्यात निवडणूक होईल. अन्य काही राज्यांतही राज्यसभेची निवडणूक होणार आहे. सध्या अनेक राज्यांमध्ये सत्ता असल्याने राज्यसभेत भाजप एकहाती बहुमताजवळ पोहोचली आहे.
लोकसभेतही काँग्रेसचा एकच सदस्य आहे. गनीबेन ठाकोर या २०२४ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या एकमेव खासदार आहेत. भाजपने २६ पैकी २५ जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे संसदेत गुजरातचे प्रतिनिधित्व करणारा काँग्रेसचा एकच सदस्य असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.