

BJP vs Congress South India : उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सत्ता काबीज केलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीतही आपली जादू दाखविता आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा करिष्मा तमिळनाडू व केरळमध्ये चालला नाही. मात्र, काँग्रेससाठी ही निवडणूक पुन्हा आपला दबदबा निर्माण करणारी ठरली आहे.
दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ हा पाच प्रमुख राज्ये आहेत. आतापर्यंत काँग्रेसने पाचही राज्यांत सत्तेची फळे चाखली आहेत. दक्षिणेत प्रादेशिक पक्षांचा उदय काँग्रेसची डोकेदुखी वाढवत गेला. त्यामुळे पाचपैकी एकाही राज्यात सत्ता नसल्याचा प्रसंगही काँग्रेसला पाहावा लागला.
सध्या दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यामध्ये आता केरळची भर पडली आहे. केरळमध्ये काँग्रेस दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे आता पाचपैकी तीन राज्यांत काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचे सरकार असून तमिळनाडूमध्ये थलापती विजय यांच्या टीव्हीके सत्तेत बसणार आहे.
दक्षिण भारतात सत्ता काबीज करण्यासाठी किंवा आपली ताकद वाढविण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. मात्र, या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. दुसरीकडे काँग्रेसने दक्षिण भारतात आपले वर्चस्व वाढवत चालविले आहे. तमिळनाडूमध्येही टीव्हीकेकडून सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसला सोबत घेतले जाऊ शकते. असे झाल्यास पाचपैकी चार राज्यांत काँग्रेस सत्तेत असेल.
उत्तर भारतात दयनीय अवस्थेत असलेल्या काँग्रेससाठी दक्षिण भारत जणू संजीवनी ठरत आहे. केरळमध्ये आजच्या विजयाने निश्चितच पक्षाचा आत्मविश्वास दुणावेल, हे तितकेच खरे असले तरी केंद्रात सत्ता काबीज करण्यासाठी तेवढे पुरेसे नाही. पंतप्रधान मोदींचा करिष्मा उत्तर भारतासह ईशान्येकडील राज्यांमध्ये कायम आहे. मोदी ब्रँडने या भागात विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. दक्षिण भारताने हा ब्रँड स्वीकारला नसला तरी भाजपच्या केंद्रातील सत्तेवर त्याचा परिणाम होत नाही.
उत्तर भारतातील केवळ हिमाचल प्रदेश या एकाच राज्यामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे. तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सत्ता आहे. अन्य राज्यांमध्ये स्थिती भक्कम करण्यासाठी काँग्रेसला नव्या समीकरणांना जन्म द्यावा लागणार आहे. तमिळनाडूमध्ये विजय यांचा उदय महत्वाचा मानला जात आहे. ते स्वत:ला धर्मनिरपेक्ष मानतात. त्यांना इंडिया आघाडीत घेण्याचा प्रयत्न काँग्रेसला करावा लागेल. राष्ट्रीय पातळीवर त्याचा काही प्रमाणात काही होईना परिणाम होऊ शकतो. दक्षिणेतील चार राज्यांच्या जोरावर उत्तर भारतात पाय रोवताना तेथील प्रादेशिक पक्षांनाही तेवढेच महत्व द्यावे लागेल. त्यांना ताकद द्यावी लागेल.
दक्षिण भारतामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा फारसा प्रभावी ठरत नसल्याचे आतापर्यंतच्या निवडणुकांवरून दिसून आले आहे. त्याचाच फायदा काँग्रेसला होत असल्याचे निरीक्षण आहे. उत्तर भारतात मात्र हिंदुत्व, हिंदी हे मुद्दे भाजपसाठी ट्रम्प कार्ड आहे. त्याचा विचार करून काँग्रेसला नव्याने रणनीती आखावी लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.