

Tamil Nadu election results 2026 : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मातब्बरांना धक्का दिला आहे. सुपरस्टार विजय यांच्या तमिलगा वेट्टरी कडघम (TVK) या पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक लढवूनही सत्ता काबीज करण्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार विजय यांच्या पक्षाचे १०६ उमेदवार आघाडीवर आहेत. पक्षातील नेत्यांनी स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे. त्यातच विजय यांच्या वडिलांच्या एका विधानाने तमिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट आणला आहे.
विजय यांनी सत्ताधारी डीएमकेविरोधात दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे दिसत आहे. अद्याप टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठता आलेला नसल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र, डीएमके आणि एडीएमके वगळता अन्य कोणत्याही पक्षाला दुहेरी आकडा गाठता आलेला नाही.
टीव्हीके यांना सत्ता मिळविण्यासाठी एडीएमके किंवा अन्य छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागू शकते. मात्र, एडीएमकेची भाजपसोबत आघाडी आहे. विजय यांनी यापूर्वीच आपण धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत त्याविरोधातील पक्षांसोबत आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे इतर छोट्या पक्षांशिवाय विजय यांना पर्याय नाही.
विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी मात्र थेट काँग्रेसलाच सत्तेत येण्याची ऑफर देत खळबळ उडवून दिली आहे. खरेतर काँग्रेसही सध्या सत्ताधारी डीएमकेच्या आघाडीत आहे. अशावेळी काँग्रेसला ऑफर देत त्यांनी आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने इतर पक्षांना समर्थन देत आपली राजकीय ताकद कमी करून घेतली आहे. आता त्यांच्यासमोर स्वत:ला मजबूत करण्याची संधी आहे.
काँग्रेसचा गौरवशाली इतिहास असून एक पंरपरा आहे. पण एवढा मजबूत वारसा असून पक्ष इतका कमकुवत कसा झाला? असा प्रश्न उपस्थित करत चंद्रशेखर म्हणाले, याचे कारण आहे सत्तेत नसणे. एखादा पक्ष जेव्हा सतत इतरांना पाठिंबा देतो, तेव्हा त्या पक्षाचा जनाधार कमी होत जातो.
काँग्रेसला आम्ही ताकद देऊ. विजय काँग्रेसला ताकद देण्यासाठी तयार आहेत. काँग्रेसला ही सत्ता मिळाली तर ते आपली जुनी ओळख अधिक ताकदीने परत मिळवू शकतात. काँग्रेसला या संधीचा वापर करून घ्यायला हवा, असे म्हणत चंद्रशेखर यांनी एकप्रकारे काँग्रेसला सत्तेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. काँग्रेसला राज्यात चार जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विजय यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही मुळ काँग्रेस आपल्यासोबत असल्याचे विधान केले होते. केवळ तमिळनाडूतील काँग्रेस एम. के. स्टॅलिनसोबत आहे, असेही विजय म्हणाले होते. त्यामुळे विजय हे काँग्रेसला सोबत घेण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, अद्याप काँग्रेसकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.