
New Delhi : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. आता आयोगाने भाजप उमेदवारालाही सोडले नाही. परवेश वर्मा यांच्यावरही आज आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
परवेश वर्मा हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आहे. आपचे उमेदवार व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ते निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून काँग्रेसने माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र व माजी खासदार संदीप दीक्षित यांना उमेदवार दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक हायहोल्टेज बनली आहे.
परवेश वर्मा यांच्यावर आपनेही यापूर्वी गंभीर आरोप केले होते. त्यांच्याकडून पैशांचे वाटप होत असल्याची तक्रार आप नेत्यांनी केली होती. आता वर्मा यांनी मतदारसंघातील वाल्मिका कॉलनीतील नागरिकांना बुटांचे वाटप केल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांच्यावर मंदीर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी पोलिसांना याबाबत पत्र लिहित त्यासोबत दोन व्हिडिओही दिले होते. या व्हिडिओमध्ये वर्मा हे मतदारसंघातील महिलांना बुटांचे वाटप करत असल्याचे दिसत आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे वर्मा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, परवेश वर्मा हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असा दावा आपकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. पण वर्मा यांच्यासह भाजप नेत्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. आपकडून अरविंद केजरीवाल हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार आहेत. तर काँग्रेस आणि भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.