

New Delhi News: कॉक्रोच जनता पार्टीकडून गेल्या काही महिन्यांपासून राजधानी दिल्लीसह देशभरात आंदोलनं, मोर्चे, पत्रकार परिषदा, सोशल मीडिया असं मिळेल त्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयोगाविरोधात रान पेटवलं जात आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा सीजेपीनं जंतर मंतरवर बंदी असतानाही आंदोलनाची हाक दिली होती. त्यावेळी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर संस्थापक अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेतलं होतं.सीजेपीच्या लढ्याला दिल्ली पोलिसांकडून एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहे. अशातच आता दिल्ली उच्च न्यायालयानं रांका आणि दास यांच्याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
दिल्ली उच्च न्यायालयानं सीजेपीच्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी घेतली. दिल्ली कोर्टानं या सुनावणीदरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार असलेल्या रांका आणि दास यांना फटकारलं आहे. सीजेपीच्या वकिलांनी दोघांच्याही वयाचा संदर्भ दिल्यानंतर न्यायालयानं तुमच वय पाहता तुम्ही जेन झी नसल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यास बंदी असताना सीजेपीच्या सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी गेटवरून उड्या मारत जात तिथे जोरदार घोषणाबाजी केली होती. यानंतर या दोन्ही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या पोलिस आणि न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
या निर्णयाविरोधातच दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या वयाविषयी विचारणा केली. त्यावर त्यांच्या वकिलांनी सौरव दास हे 27 आणि आशुतोष रांका हे 31 वर्षांचे असल्याचं म्हटलं आहे. यानंतर न्यायालयानं ते 'जनरेशन झेड' नसल्याचं म्हटलं. तसेच प्रौढ नागरिक असूनही त्यांच्याकडून नियमांचं अशाप्रकारे उल्लंघन अपेक्षित नाही, असा इशाराही दिला.
सौरभ दास आणि आशुतोष रांका या दोन्ही नेत्यांनी आपल्या जामीनपत्रातील अटी व शर्तींचं उल्लंघन आणि बॅरिकेड्स तोडल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. त्यांनी शांततेचा करार मोडला आणि प्रतिबंधित परिसरात लोकांना एकत्र येण्याचं आवाहन केल्याचा आरोप केला आहे. यामुळे न्यायालयानं त्यांची न्यायालयीन कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती.
अभिजीत दिपके आणि सीजेपीच्या आत्तापर्यंतच्या लढ्यात 'जेन झीं'चं योगदान सर्वात मोठं राहिलं आहे. मात्र, एकीकडे जेन झींना डोळ्यांसमोर ठेवत सुरू केलेला लढा अडचणीत आला असतानाच कोर्टानंही त्यांना धक्का दिला आहे. कोर्टानं दास आणि रांका यांना तुम्ही जेन झी नसल्याचं निरीक्षण नोंदवल्यामुळे पुढे काय होणार याचीच जोरदार चर्चा होती. मात्र, दिपकेंनी सोशल मीडियावरील x प्लॅट फॉर्मवर एक नवी पोस्ट शेअर करत न्यायालयाच्या टिप्पणीला उपरोधिक टोला लगावला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करताना इंग्रजी भाषेत एक कॅप्शन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो पोस्ट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीजेपीच्या पहिल्या आंदोलनादरम्यान इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करतानाच जेन झींना साद घातली होती.
त्याच व्हिडीओतील एक स्क्रीनशॉट दिपकेंनी पोस्ट केला आहे. दिपकेंनी मोदींच्या स्क्रिन शॉटला ‘जेन झी म्हणून पात्र ठरणारी एकमेव व्यक्ती’ ही न्यायालयाच्या ‘तुम्ही जेन झी नाहीत’ या टिप्पणीवर उपरोधिक भाष्य करणारी कॅप्शनही दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.