

Global Energy Crisis News: जगभरात सुरू असलेल्या इंधन संकटामुळे अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. अपुऱ्या पुरवठ्यामुळे काही ठिकाणी पेट्रोल- डिझेलसाठी रांगा लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये अन्य देश यावर काय उपाययोजना करीत आहेत, हे जाणून घेऊयात
मध्यपूर्वेतील संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. जगभरात वाढलेल्या इंधन संकटामुळे अनेक देशांनी आता कठोर ऊर्जा बचत उपाय लागू करण्यास सुरुवात केली आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारांकडून वर्क फ्रॉम होम, इंधन रेशनिंग, एसी वापरावर निर्बंध, शाळा ऑनलाइन आणि वाहन वापरावर नियंत्रण अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये इंधन दर झपाट्याने वाढल्यानंतर सरकारने ‘नॅशनल फ्युएल सिक्युरिटी प्लॅन’ लागू केला आहे. इंधनावरील कर ५० टक्क्यांनी कमी करण्यात आला. काही राज्यांमध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात आली आहे. भविष्यात परिस्थिती गंभीर झाल्यास इंधन रेशनिंग लागू करण्याची तयारीही सुरू आहे.
फिलिपाईन्सने राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे. देशाकडे मर्यादित इंधनसाठा उरल्याने सरकारने वीज आणि इंधन वापरावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानने सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये कपात केली असून ऊर्जा बचतीसाठी विविध निर्बंध लागू केले आहेत. काही ठिकाणी वर्क फ्रॉम होमचाही पर्याय वापरला जात आहे. ऊर्जा बचतीसाठी सरकारने मोठे निर्बंध लागू केले आहेत. बाजारपेठा रात्री ८ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनेक सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील इंधन वापर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शाळा-कॉलेज ऑनलाइन करण्याबाबतही सरकार विचार करत आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत.
श्रीलंकेत परिस्थिती आणखी गंभीर बनली असून सरकारने ऊर्जा बचतीसाठी चार दिवसांचा कामाचा आठवडा लागू केला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये दुपारी ३ नंतर एसी बंद ठेवण्याचे आदेश आहेत. काही भागांत रात्री स्ट्रीट लाईट बंद ठेवण्यात येत आहेत. पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी QR कोड आधारित प्रणाली लागू करण्यात आली आहे.
बांग्लादेशमध्ये वीज निर्मितीसाठी डिझेलचा वापर थांबवण्यात आला आहे. कार्यालयांच्या वेळेत कपात करण्यात आली असून एसीचे तापमान २५ अंशांवर निश्चित करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यावर सरकार भर देत आहे.
चीनने तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे. सौरऊर्जेला प्रोत्साहन देत देशांतर्गत तेल उत्पादनही वाढवण्यात आले आहे. भविष्यातील संकट लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात तेलसाठाही तयार करण्यात आला आहे.
नेपाळमध्ये इंधन बचतीसाठी आठवड्यात दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारी वाहनांसाठी इंधन कोटा लागू करण्यात आला असून कारपूलिंगला प्रोत्साहन दिले जात आहे. पेट्रोल-डिझेलवरील करातही कपात करण्यात आली आहे.
न्यूझीलंडने राष्ट्रीय इंधन अलर्ट सिस्टम सुरू केली आहे. सरकारने आपत्कालीन तेलसाठा बाजारात आणला असून नागरिकांना इंधनाचा संयमाने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
ब्रिटनमध्ये जेट फ्युएल संकट तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारसमोर इंधन रेशनिंग, वेगमर्यादा कमी करणे आणि खासगी जेटवर निर्बंध आणण्याचे प्रस्ताव आहेत.
क्यूबामध्ये इंधन टंचाईमुळे शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यात आली आहेत. सार्वजनिक वाहतूक मोठ्या
जॉर्डन, इजिप्त, इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, पनामा आणि टांझानिया यांसारख्या देशांनी वाहन वापरावर निर्बंध आणले आहेत. अनेक ठिकाणी कारपूलिंग सक्तीचे करण्यात आले असून काही देशांनी अधिकृत प्रवासांवर तात्पुरती बंदी घातली आहे. काही भागांमध्ये शाळा ऑनलाइन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मलेशिया, थायलंड, सिंगापूर आणि श्रीलंका या देशांनी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरील एसीचे तापमान निश्चित केले आहे. काही देशांनी सरकारी कार्यालयांमध्ये एसी वापरावरच बंदी आणली आहे. सिंगापूरमध्ये नागरिकांना एसीऐवजी पंख्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या कोविडसारखा पूर्ण लॉकडाऊन बहुतांश देशांमध्ये लागू करण्यात आलेला नाही. मात्र काही देशांनी इंधन बचतीसाठी अप्रत्यक्ष निर्बंध सुरू केले आहेत. वर्क फ्रॉम होम, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, सरकारी कार्यालयांचे कमी तास, वाहन वापरावर मर्यादा असे उपाय अनेक देशांमध्ये सुरू आहेत. भारतात लॉकडाऊनच्या अफवा फेटाळण्यात आल्या असून सरकारने इंधनसाठा पुरेसा असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारताने सध्या इंधनसाठा सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. मात्र इंधनाचा संयमाने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.