नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसवरील (Punjab) संकट अद्याप टळलेले नाही. प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिध्दू (NavjotSingh Sidhu) यांची वर्णी लागल्यापासून हे वादळ उठलं आहे. त्यानंतर अमरिंदरसिंग (AmarinderSingh) यांचं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर हे संकट अधिकच गडद झालं आहे. आता काँग्रसेनं (Congress) आणखी एक मोठं पाऊल टाकत राज्याचे प्रभारी बदलले आहेत.
पंजाब काँग्रेसमध्ये अमरिंदरसिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वाद सुरू होता. सुरवातीपासून दोघांमध्ये समझोता घडवण्याचा प्रयत्न राज्याचे प्रभारी या नात्याने हरीश रावत (Harish Rawat) करीत होते. त्यांना यात यश आले नव्हते. आता अमरिंदरसिंग यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करून सगळ्यांनाच धक्का दिला आहे. याचबरोबर भाजपशी आघाडीचे संकेतही त्यांनी दिले आहेत. कॅप्टन यांनी काँग्रेसला धक्का दिल्यानंतर पंजाबच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती रावत यांनी हाय कमांडकडे केली होती.
रावत यांची ही विनंती हाय कमांडने मान्य केली असून त्यांच्या जागी हरीश चौधरी (Harish Chaudhary) यांच्याकडे प्रभारीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांतील पंजाब काँग्रेसमधील हा तिसरा मोठा बदल आहे. चौधरी हे राजस्थानमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पंजाबमधील वाद वाढल्यानंतर रावत यांनी काही दिवसांपूर्वीच अंग काढून घेतलं होतं. तेव्हापासून चौधरी यांच्याकडे समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती. रावत यांना पदावरून मुक्त करण्यात आले आहे.
रावत यांनी यासाठी उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीचे कारण दिले होतं. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते की, मला आता उत्तराखंडवर लक्ष द्यावे लागणार आहे. निवडणुका जवळ आल्या असून, अतिशय कमी वेळ राहिला आहे. पंजाब आणि उत्तराखंडमध्ये पुढील वर्षाच्या सुरवातीला निवडणुका होत आहेत. दोन्हीकडे वेळ देणे मला शक्य नाही. याआधीही ऑगस्ट महिन्यात याबाबत पक्ष नेतृत्वाला विनंती केली होती. त्यामुळे मला आता पक्षाने प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे.
अमरिंदरसिंग काढणार नवा पक्ष
अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रविन ठुकराल यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. अमरिंदरसिंग यांनी अजून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. पण त्यांनी यापूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. ठुकराल यांनी ट्विट करत त्याबाबत स्पष्ट संकेत दिले. 'पंजाबच्या भविष्याची लढाई आता सुरू झाली आहे. पंजाबमधील लोकांच्या सेवेसाठी तसेच मागील वर्षभरापासून आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी माझ्या राजकीय पक्षाची घोषणा लवकरच केली जाईल,' असे ठुकराल या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.