Jammu Kashmir News : भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसताना दिसत आहे. यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती आणि सर्व जागांवर उमेदवार जाहीर करणार अशी घोषणाही केली होती. आता जम्मू-काश्मीरमध्येही इंडिया आघाडीत धुसफूस असल्याची चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)
पीडीपी पक्षप्रमुख आणि जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "नॅशनल काॅन्फरन्सच्या असहकार्यामुळे काश्मीरच्या तीनही लोकसभा जागांवर पीडीपीकडे उमेदवार उभे करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मेहबूबांच्या या विधानावरून इंडिया आघाडीत मोठी धुसफूस आणि समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नॅशनल कॉन्फरन्सने सर्वच्या सर्व तीन जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. नॅशनल कॉन्फरन्सने 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (इंडिया आघाडी) मध्ये जम्मूच्या दोन जागा काँग्रेससाठी सोडल्या. "नॅशनल कॉन्फरन्सने आमच्याकडे उमेदवार उभे करण्याशिवाय आणि निवडणूक लढवण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवलेला नाही," असे मेहबूबा मुफ्ती यांनी माध्यमांना सांगितले.
पाटणा ते दिल्लीतील (Delhi) रामलीला मैदानापर्यंत झालेल्या इंडिया अलायन्सच्या सभा आणि रॅलींमध्ये मेहबूबा सहभागी झाल्या आहेत. मुफ्ती या प्रत्येक स्टेजवर उपस्थित आहेत. फारुख अब्दुल्लाही त्यांच्या नॅशनल काॅन्फरन्स पक्षाचे नेतृत्व करताना दिसत आहेत. मात्र, जागावाटपावर तीनही जागांवर ताळमेळ होताना दिसत नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या एकूण पाच जागा आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे तिसऱ्यांदा उधमपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी काँग्रेसने चौधरी लाल सिंग यांना उमेदवारी दिली आहे. डेमोक्रॅटिक आझाद पक्षाकडून (डीपीएपी) माजी मंत्री जी.एम. सरुरी यांना मैदानात उतरवल्याने ही लढत तिरंगी झाली आहे.
2019 च्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत जितेंद्र सिंह यांनी उधमपूर लोकसभा जागा जिंकली होती. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन जम्मू -काश्मीर संस्थानचे महाराजा हरि सिंह यांचे नातू विक्रमादित्य सिंह यांचा 3,53,272 मतांच्या फरकाने पराभव केला. त्यापूर्वी जितेंद्र सिंह यांनी 2014 च्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांचा 60,976 मतांनी पराभव केला होता. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या काळात त्यांना पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री करण्यात आले होते.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.