

RBI Monetary Policy : ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर 6.09 टक्क्यांवर पोहोचला. गेल्या दोन वर्षातील महागाईचा हा सर्वोच्च स्तर असून रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या सहा टक्क्यांची मर्यादा देखील महागाईने ओलांडली.
यामुळे व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय (Central Government) सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकतीच महागाई दराच्या संदर्भातील आकडेवारी जाहीर केली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर म्हणजे सर्वसामान्य ग्राहक दैनंदिन वापरातील वस्तू आणि सेवांसाठी किती अधिक पैसे मोजत आहेत, हे दर्शवणारा दर. अन्नधान्य, कपडे, इंधन, घरभाडे आणि आरोग्य यांसारख्या वस्तू व सेवांच्या किमतींमध्ये ठरावीक कालावधीत झालेली वाढ किंवा घट या निर्देशांकाद्वारे मोजली जाते. महागाईमुळे सामान्य माणसाच्या खर्चावर किती परिणाम होत आहे, हे महागाई दरातून समजते.
दसरा-दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने सर्वसामान्यांनी गॅस सिलिंडर तसेच किराणा माल खरेदी करताना महागाईच्या झळा अनुभवल्या. महाग असले तरी कमी-अधिक प्रमाणात का होईना सामान घ्यावेच लागते अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. कारण ग्राहक किंमत निर्देशाकात सुमारे 40 टक्के वाटा अन्नधान्याच्या वाढत्या किमतीचा आहे. महागाई अन्नधान्यापुरतीच मर्यादित नसून ऊर्जा आणि कच्च्या मालाच्या किमती सुद्धा वाढत आहेत. वाहतूक महागाई दर 5.84 टक्क्यांवर पोहोचला आहे.
त्यातच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आता जास्त वाटणाऱ्या अन्नधान्यांच्या किमती पुढील काही महिन्यांत आणखी वाढण्याचा अंदाज आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा व्याजदरात 25 आधारबिंदूंची म्हणजे 0.25 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबरमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ करून तो 5.50 टक्क्यांवर नेला होता. आता ऑक्टोबरमधील किरकोळ महागाईचा दर 6.09 टक्क्यांवर पोहोचल्याने व्याजदर वाढीची शक्यता अधिक बळावली आहे. पुन्हा 25 आधार बिंदूंची वाढ झाल्यास रेपो दर 5.75 टक्क्यांवर जाईल. याचा परिणाम गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जांच्या व्याजदरांवर तसेच मासिक हप्त्यांवर होऊ शकतो. मात्र, हा अर्थतज्ज्ञांचा अंदाज असून अंतिम निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत घेतला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.