

IPS success story : महाराष्ट्रातील ठाणे येथील IPS अधिकारी अभिजीत पाटील हे सध्या आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे गाजत आहेत. त्यांनी आपल्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये कुख्यात गँगस्टर्सच्या मुसक्या आवळत त्यांचे नेटवर्क उध्वस्त केले आहे. पण ही कामगिरी त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर राजस्थान आणि हरियाणा या राज्यांच्या सीमेवर केली आहे.
अभिजीत पाटील हे मुळचे ठाण्याचे असले तरी ते राजस्थान केडरचे २०२३ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग राजस्थानातील चूरू या जिल्ह्यात मिळाली आहे. ते सध्या चुरू जिल्ह्यातील राजगढ सर्कलचे सहायक पोलीस अधिक्षक आहेत. त्यांच्याकडे अँटी गँगस्टर टास्क फोर्सचे प्रमुखरपदही आहे. दोन राज्यांच्या सीमेवरील हा परिसर गँगस्टर्सचा गड मानला जात होता. पण पाटील यांच्या सुनियोजित मोहीमेमुळे त्यांच्या नेटवर्कला हादरा बसला आहे.
केवळ २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक करत आयपीएस बनलेल्या अभिजीत पाटील यांनी जेमतेम १० महिन्यांतच आतच आपला धडाकेबाज बाणा दाखवून दिला आहे. अभिजीत पाटील यांनी 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात असलेला संपत नेहरा हा राजगढमधील कलोरी गावचा आहे. त्यामुळे राजगढ परिसरात बिश्नोई गँग आणि सुजानगढ, सरदारशहर, रतनगढ आणि चुरूमध्ये रोहित गोदारा गँगचे वर्चस्व आहे.
दोन्ही टोळ्या वर्चस्वातून वारंवार भिडायच्या. गोळीबार, हत्या हे सतत चालायचे. पण मागील दहा महिन्यांत गोळीबाराची एकही घटना नाही. प्रो. अॅक्टिव्ह पोलिसिंगमुळे इथे कुणाचाही खून झालेला नाही, असे पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी सुरूवातीच्या काळात सोशल मीडियात गँगस्टर संस्कृतीला मदत करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. अनेकांची खाती बंद करण्यात आली. त्यानंतर अवैध हत्यारांकडे मोर्चा वळविला. यामध्ये ८० हून अधिक आरोपींना अटक केली.
गँगस्टर्सना पैसा पुरविणाऱ्या नेटवर्कला हादरे देण्यास सुरूवात केली. प्रमुख तीन आरोपींना अटक केली. गुंडांना बनावट सीम कार्ड देणारे जाळे मोडून काढले. गँगस्टरला मदत करणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तुरुंगात डांबले, अशी माहिती पाटील यांनी 'एनडीटीव्ही'शी बोलताना दिली. राजगढमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत एकही हत्येचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे तसेच अवैध दारूची तस्करी थांबल्याचेही पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.