Ranchi News : झारखंड विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार असून त्याआधीच काँग्रेस झटका बसला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराची वेळ संपल्यानंतर जाहीरनामा प्रसिध्द केल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
काँग्रेसने आचारसंहितेचा भंग केल्याचे झारखंड निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. पक्षाकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आता आयोग काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
काँग्रेसने मंगळवारी सायंकाळी जाहीरनामा प्रसिध्द केला होता. यामध्ये झारखंडमधील लोकांना सात मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. यामध्ये महिलांना महिन्याला 2500 रुपये, 450 रुपयांत गॅस सिलिंडर, प्रत्येक व्यक्तीला सात किलो रेशनिंग, 10 लाख नोकऱ्या आणि 15 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा अशी आश्वासने देण्यात आली आहेत.
प्रचाराची वेळ संपल्यानंतर हा जाहीरनामा प्रसिध्द कऱण्यात आल्याने भाजपने टीका केली होती. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर संविधान आणि निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या देशात असा एक पक्ष आहे जो सातत्याने संविधानांचे उल्लंघन करत आहे. मतदानाच्या आधी 48 तासांचा सायलेंट पिरियड असतो, असे पात्रांनी सांगितले.
निवडणुकीआधी 48 तासांत कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचार करता येत नाही. तसेच जाहीरनामाही प्रसिध्द करता येत नाही. कोणताही बडा नेता यादरम्यान प्रचारसभा घेऊ शकत नाही. या नियमापासून कुणीही अनभिज्ञ नाही. राहुल गांधी निवडणूक आयोगाला महत्व देत नाहीत. ते नेहमीच निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलतात, अशी टीका पात्रा यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.