Jharkhand Election Results 2024 Live Updates: झारखंड विधानसभा निवडणुकीत पुन्हा विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीच लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये झालेल्या थेट लढतीत आतापर्यंतच्या कलानुसार इंडिया आघाडीने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर एनडीएला 30 पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहे.
इंडिया आघाडीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवली. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये आजसू आणि संयुक्त जनता दल या पक्षांचा समावेश होता.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सकाळी साडे दहा वाजेपर्यंत राज्यातील सर्व 81 जागांचे जागांचे कल हाती आले असून त्यामध्ये सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला 32 जागांवर आघाडी मिळाली आहे. मित्रपक्ष काँग्रेसला 12, आरजेडला सहा कम्युनिस्ट पक्षाला दोन जागांवर आघाडी मिळाली आहे. आघाडीने 41 हा बहुमताचा आकडा पार केला आहे.
एनडीएमध्ये भाजपचे 25 उमेदवार आघाडीवर आहेत. तर आजसू पक्षाच्या दोन आणि जनता दलाच्या एका उमेदवाराला आघाडी मिळाली आहे. झाऱखंड लोकतांत्रिक क्रांतीकारी मोर्चाचा एक आणि एका अपक्ष उमेदवाराला आघाडी मिळाली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात पुन्हा इंडिया आघाडीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, निवडणुकीआधी भाजपने माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना आपल्याकडे खेचले होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा प्रभाव पडू शकतो, अशी आशा भाजपला होती. मात्र, निकालाचे कल हाती येत असताना त्याचा काहीही फरक पडला नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीआधी हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. कथित भूखंड घोटाळ्यावरून भाजपने त्यांना कोंडीत पकडले होते. घुसखोरी आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा एनडीएकडून प्रकर्षाने मांडण्यात आला होता. मात्र, त्याचा फारसा परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.